उतारवयातही अत्यंत आवडीने सेवा करणार्या सातारा रस्ता, पुणे येथील ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती प्रभावती चंद्रकांत मेहता (वय ९१ वर्षे) !
९.७.२०२२ या दिवशी श्रीमती प्रभावती चंद्रकांत मेहता, पुणे (वय ९१ वर्षे) यांनी ६५ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित करण्यात आले. त्यांची मुलगी सौ. अंजली मेहता (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ६४ वर्षे) यांना त्यांच्या आई श्रीमती प्रभावती मेहता यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
१. आनंदी
‘माझी आई श्रीमती प्रभावती चंद्रकांत मेहता (वय ९१ वर्षे) पुष्कळ आनंदी आणि नेहमी हसतमुख असते.
२. नीटनेटकेपणा
तिला तिच्या गादीवरील चादरीला एकही सुरकुती पडलेली आवडत नाही. ती स्वतः उठून चादर नीट करून मगच गादीवर बसते.
३. आवड – नावड नसणे
ती कधीही ‘मला एखादा पदार्थ करून दे’, असे म्हणत नाही. मी तिला जे करून देते, ते ती आनंदाने खाते. तिला खाण्या-पिण्याची कसलीही इच्छा राहिली नाही.
४. घरी येणार्यांचे आदरातिथ्य करण्यास सांगणे
आईने आयुष्यभर सगळ्यांची सेवा केली आहे. तिने घरी आलेल्या पाहुण्यांना कधीही विन्मुख पाठवले नाही. आता तिचे वय ९१ वर्षे आहे. तिला कुणी परिचित किंवा नातेवाईक भेटायला येतात, तेव्हा ती आम्हाला त्यांना खाऊ द्यायला सांगते. आम्ही त्यांना खाऊ दिल्यावर तिला समाधान वाटते.
५. सेवेची तळमळ
आई माझ्या घराच्या शेजारीच रहाते. वर्ष २००९ पासून आम्ही सनातनच्या उदबत्तीचे उत्पादन करण्यास आरंभ केला. तेव्हापासून आई उदबत्तीची सेवा करायला यायची. तिला सेवेची पुष्कळ आवड आहे. ‘सेवा करायला मिळावी’, यासाठी ती घरातील कामे लवकर आवरून सकाळी १० वाजता सेवेसाठी येत असे. ती ‘उदबत्ती पाकिटात भरणे आणि उदबत्तीचे खोके सिद्ध करणे’, या सेवा करायची. जवळजवळ वर्ष २०१६ पर्यंत तिने उदबत्तीची सेवा आनंदाने केली.
६. सद्गुरु सत्यवान कदम यांनी आईचे कौतुक करणे
पू. सत्यवानदादा (आताचे सद्गुरु सत्यवान कदम) संतपदी विराजमान झाल्यानंतर एकदा आमच्या घरी आले होते. तेव्हा आईकडे पाहून पू. सत्यवानदादा म्हणाले होते, ‘‘यांची पूर्वजन्मीची साधना आहे; म्हणून त्या सतत हसतमुख आणि आनंदी आहेत.’’
७. अनुसंधानात असणे
ती सतत ‘शिव, शिव, शिव, शिव’, असे म्हणते.’
– सौ. अंजली सुरेशचंद्र मेहता (श्रीमती प्रभावती मेहता यांची मुलगी आणि होमिओपॅथी वैद्य प्रवीण मेहता यांची बहीण), धनकवडी, पुणे. (१९.४.२०२२)
सतत आनंदी असणार्या श्रीमती प्रभावती चंद्रकांत मेहता !
‘माझी आई श्रीमती प्रभावती चंद्रकांत मेहता हिचा एक डोळा काढलेला आहे, तसेच तिला मुळीच ऐकायला येत नाही. तिला काही सांगायचे असेल, तर ते लिहून दाखवावे लागते. कोरोना महामारीच्या काळामध्ये तिला कोणताही त्रास झाला नाही. तिला व्यक्तींची ओळख किंवा नाव सांगता येत नाही; परंतु असे असूनसुद्धा ती नेहमी आनंदी असते. ती आनंदाने टाळ्या वाजवून गाणी म्हणत असते. तिच्या तोंडवळ्यावर कोणताही ताण अथवा काळजी दिसून येत नाही. ती तिच्याच आनंदामध्ये मग्न असते. ‘तिची आध्यात्मिक पातळी वाढली आहे’, असे जाणवते.’
– होमिओपॅथी वैद्य प्रवीण मेहता, पुणे (१५.१२.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |