विशाळगड येथील ढासळलेल्या बुरुजाचे दगड उचलण्यास साहाय्य करावे !
पुरातत्व विभागाचे सह्याद्री प्रतिष्ठान संघटनेला आवाहन
पुणे – कोल्हापूर येथील राज्य संरक्षित स्मारक असलेल्या विशाळगडाच्या प्रवेशमार्गाजवळील बुरुजाचा भाग गेल्या काही दिवसांत झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे ढासळला असून बुरुजाचे दगड प्रवेशमार्गाजवळ पडलेले आहेत. त्यामुळे गडावर जाणार्या पर्यटकांना अडचण निर्माण होत आहे. सद्यस्थितीत रस्त्यावरील दगड उचलून एका बाजूला ठेवण्यात आले आहेत; पण ते रस्त्यालगतच्या दरीत पडण्याचीही शक्यता आहे. येणार्या-जाणार्यांची असुविधा होऊ नये, तसेच येथील दगड भविष्यात जतन किंवा दुरुस्ती यांसाठी पुन्हा उपयोगात यावेत; म्हणून गडाच्या वरील मोकळ्या जागेत ठेवण्यासाठी साहाय्य मिळावे आणि या कामी तातडीची मोहीम राबवण्यात यावी, असे आवाहन पुरातत्व विभाग, पुणे यांच्या वतीने सह्याद्री प्रतिष्ठान या संघटनेला निवेदनाद्वारे करण्यात आले आहे. (आतापर्यंत गड-दुर्गांच्या रक्षणकार्यात कामचुकारपणा करणार्यांना बडतर्फच करायला हवे ! – संपादक)
या निवेदनात पुढे म्हटले आहे की, तुमची संस्था गड-दुर्गांच्या कामासाठी नेहमी पुढे असते. संस्थेच्या वतीने आजपर्यंत गड-दुर्गांशी अनेक मोहिमा महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत यशस्वीरित्या राबवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे पुरातत्व विभागास साहाय्य होते. (अनेक स्थानिक संघटना स्वच्छता मोहीम, गडदुर्ग पावित्र्यरक्षण मोहीम नेहमीच राबवतात. अशा संघटनांच्या प्रतिनिधींना अधिकारी किंवा कर्मचारी म्हणून नेमल्यास पुरातत्व विभागाची फलनिष्पत्ती वाढेल ! – संपादक)
संपादकीय भूमिकापुरातत्व विभागाने असे आवाहन करणे म्हणजे दायित्व झटकण्याचाच प्रकार होय ! या विभागाकडून गड-दुर्गरक्षणाचे कार्य होणार नसेल, तर पुरातत्व विभागाचा पांढरा हत्ती पोसायचा कशाला ? |