प्रेमळ, नम्र आणि संतांविषयी अपार भाव असलेले देहली येथील सनातनचे ११५ वे समष्टी संत पू. संजीव कुमार (वय ७१ वर्षे) !
देहली येथील साधकांनी पू. संजीव कुमार यांची उलगडलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
१. श्री. अभय वर्तक
१ अ. निर्मळ मन
‘सर्वसामान्यतः व्यावसायिक ‘धूर्त आणि इतरांना बोलण्यात गुंगवणारे’, असे असतात. पू. संजीव कुमार मोठे व्यावसायिक असूनही त्यांच्या बोलण्यात निर्मळता जाणवते. त्यांचा ‘मला अधिक कळते’, असा आविर्भाव कधीच नसतो. त्यांना एखादी गोष्ट पटली नाही, तर ते लगेच मोकळेपणाने सांगतात. त्यांच्या बोलण्यात अहंचा जराही लवलेश नसतो.
१ आ. सहजता आणि विनम्रता
१ आ १. मोठे उद्योजक असूनही सर्वसामान्य साधकाशी मित्राप्रमाणे वागणे : वर्ष २००८ मध्ये मी प्रथमच देहली येथे गेलो. तेव्हा मला समजले, ‘देहलीतील एक मोठे उद्योजक सनातन संस्थेचे साधक आहेत आणि माझी निवासव्यवस्था त्यांच्याकडे आहे.’ तेव्हा मला थोडा ताण आला; मात्र मी पू. संजीव कुमार यांना भेटल्यावर त्यांच्यातील सहजता आणि विनम्रता पाहून काही क्षणांतच माझ्या मनावरील ताण निघून गेला. ‘पू. संजीव कुमार माझे मित्र केव्हा झाले ?’, ते माझ्या लक्षातच आले नाही. वास्तविक ते एक मोठे उद्योजक असून मी एक सर्वसामान्य साधक आहे, तरीही ते माझ्याशी एखाद्या मित्राप्रमाणे वागतात.
१ आ २. नम्रता अंगी भिनलेले पू. संजीव कुमार ! : पू. संजीव कुमार यांचा व्यवसाय पुष्कळ मोठा आहे. खाण व्यवसाय, बांधकाम अशा अनेक क्षेत्रांत त्यांच्या व्यवसायाचा मोठा व्याप आहे. शेकडो लोक त्यांच्याकडे कामाला आहेत. एवढा मोठा व्यवसाय असलेले समाजातील व्यावसायिक छाती फुगवून क्षणोक्षणी दिखाऊपणा करतात; मात्र पू. संजीव कुमार यांची आठवण झाल्यावर माझ्या डोळ्यांसमोर विनम्रतेच्या मुद्रेतील त्यांचा चेहरा येतो. त्यांच्यातील विनम्रतेचा अनुभव त्यांच्या वागण्यातून प्रत्येक साधकाला येतो. ते स्वतः साधकांना चहा करून देतात. ते मनमोकळेपणाने कुणाशीही गप्पा मारतात आणि सतत शिकण्याच्या स्थितीत असतात. ते विनम्रतेचे मूर्तीमंत उदाहरण आहेत.
१ इ. साधकांना सहजतेने साहाय्य करणारे पू. संजीव कुमार !
१ इ १. पू. संजीव कुमार यांनी देहली येथील वातावरणात ‘प्रसार आणि संपर्क कसे करायचे ?’, हे प्रत्यक्ष शिकवणे : सनातन संस्थेचे साधक पुष्कळ साधे रहातात. देहली येथील वातावरण भारतभरातील अन्य कोणत्याही शहरातील वातावरणापेक्षा फार वेगळे आणि अधिक व्यावसायिक आहे. देहलीच्या वातावरणात ‘प्रसार किंवा संपर्क कसे करायचे ?’, हे पू. संजीव कुमार यांनी मला प्रत्यक्ष शिकवले. त्याचा मला पुष्कळ लाभ झाला. माझे सातत्याने देहली येथे येणे होत होते. प्रत्येक वेळी मला पू. संजीव कुमार यांचे पुष्कळ साहाय्य झाले.
१ इ २. साधकांना सर्वतोपरी साहाय्य करण्यासाठी सदैव तत्पर असणे : देहली क्षेत्रात प्रसारसेवा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात साधनांची आवश्यकता असते. पू. संजीव कुमार सनातन संस्थेसाठी ‘वाहने, वाहनदुरुस्ती, वस्तू खरेदी, साहित्याची ने-आण करणे, वैद्यकीय सुविधा आणि आहार’, यांसाठी जे साहित्य लागेल किंवा जेथे साहाय्य लागेल, ते सर्व उपलब्ध करून देण्यासाठी सदैव तत्पर असतात. ते जणू सेवेची संधी मिळण्याची वाटच पहात असतात. त्यांचे वागणे साधकांसाठी आदर्शवत आहे.
१ ई. आश्रमासाठी एखादी वस्तू अर्पण करतांना असलेला भाव
पू. संजीव कुमार यांनी आश्रमासाठी एक चारचाकी अर्पण केली. एकदा मी त्यांना सहज म्हणालो, ‘‘आपण दिलेली चारचाकी छान सेवा करत आहे.’’ तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘ते श्री गुरूंचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) वाहन आहे. ते माझे कुठे आहे ?’’ ‘एखादी वस्तू श्री गुरूंना अर्पण केल्यावर त्याविषयी कसा भाव असावा !’, याचा आदर्श पू. संजीव कुमार यांनी साधकांसमोर ठेवला आहे.
१ उ. संतांप्रती असलेला भाव
१ उ १. सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्याप्रती शिष्यभाव ! : श्री गुरुकृपेने मला सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांना पू. संजीव कुमार आणि पू. (सौ.) माला कुमार यांच्या घरी घेऊन जाण्याची सेवा अनेक वेळा लाभली. ‘सद्गुरु पिंगळेकाका घरी येणार’, असे कळल्यावर या संत दांपत्याला आकाश ठेंगणे वाटू लागते. त्यांना ‘सद्गुरु पिंगळेकाकांसाठी किती आणि काय करू !’, असे होते. तेव्हा त्यांच्या तोंडवळ्यावर शरणागतभाव आणि शिष्यभाव असतो. ‘संतांप्रती भाव कसा असायला हवा !’, हे मला त्यांच्याकडून शिकायला मिळते.
१ उ २. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्याप्रती शब्दातीत भाव ! : पू. संजीव कुमार यांचा श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्याप्रती शब्दातीत भाव आहे. ते नेहमी श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांची आठवण काढतात. त्यांच्या ध्यानी-मनी सतत गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ असतात. ‘पू. संजीव कुमार यांच्या कुटुंबावर श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांचा अखंड कृपावर्षाव होत असतो’, असे मला नेहमी जाणवते.
१ ऊ. संतांचा विश्वास संपादन करणे
‘देहली सेवाकेंद्रासाठी काहीही खरेदी करणे’, इत्यादी गोष्टींसाठी ‘पू. संजीव कुमार यांचे मत घेतले का ?’, असे एक संत आम्हाला विचारतात. यातून ‘संतांचा पू. संजीव कुमार यांच्यावर केवढा विश्वास आहे !’, ते लक्षात येते.
‘गुरुदेवांनी मला अशा दिव्य व्यक्तीमत्त्वाच्या सहवासात ठेवले’, याबद्दल मी त्यांच्या श्री चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
(११.१.२०२२)
२. श्री. प्रणव मणेरीकर (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के)
२ अ. आपुलकीचे वागणे
‘पू. संजीव कुमार यांच्या घरी गेल्यावर ‘मी एखाद्या परक्या व्यक्तीच्या घरी आलो आहे’, असे मला कधीच वाटत नाही. मला त्यांच्या बोलण्यात नेहमी आपलेपणा जाणवतो.
२ आ. अहंशून्यता
पूर्वी देहलीतील साधकांचा सत्संग पू. संजीव कुमार यांच्या घरी होत असे. त्यांचे घर दुसर्या माळ्यावर आहे. साधक परत जायला निघाल्यावर ते प्रत्येक वेळी त्यांना गाडीपर्यंत पोचवायला जातात.
३. कु. पूनम चौधरी
३ अ. प्रीती
३ अ १. साधकांसाठी स्वतः चहा करणे : ‘पू. संजीव कुमार यांच्या घरी कधीही सत्संग किंवा काही सेवा असेल, तेव्हा ते सर्वांसाठी चहा करतात. ते अतिशय सधन आहेत. त्यांच्याकडे घरातील सर्व कामे करण्यासाठी नोकर आहेत, तरीही पू. संजीव कुमार स्वतःच साधकांसाठी चहा करतात.
३ अ २. पू. संजीव कुमार घरी नसतांना साधिका सेवेसाठी त्यांच्या घरी गेल्यावर ‘तिच्यासाठी चहा आणि अल्पाहार’, याची व्यवस्था केली नाही’, याची खंत वाटणे अन् ‘साधिकेसाठी चहा आणि अल्पाहार’, याची व्यवस्था करणे : एकदा मी पू. संजीव कुमार यांच्या घरी सेवेसाठी गेले होते. तेव्हा पू. संजीव कुमार घरी नव्हते. त्यांनी मला दुपारी भ्रमणभाष करून सांगितले, ‘‘मी तुमच्यासाठी ‘चहा आणि अल्पाहार’ याची व्यवस्था केली नाही. माझी चूक झाली.’’ त्यांनी माझी क्षमा मागून माझ्यासाठी ‘चहा आणि अल्पाहार’ याची व्यवस्था केली. या चुकीसाठी त्यांनी ‘काही दिवस आवडीचे पदार्थ खाणार नाही’, असे प्रायश्चित्त घेतले. त्यांनी ही चूक व्यष्टी साधनेच्या आढावा सत्संगात सांगितली. प्रत्यक्षात ‘त्यांनी ती व्यवस्था करायला हवी’, असे नाही. त्यांच्यातील साधकांप्रतीच्या प्रीतीमुळे ते ती व्यवस्था करतात.’
– कु. पूनम चौधरी, देहली सेवाकेंद्र, देहली. (२३.१२.२०२१)