चित्रपटातील गुरुपूजनाचे दृश्य पाहून राजकीय मंडळींनी केली नेत्यांची पाद्यपूजा !
मुंबई, १७ जुलै (वार्ता.) – ‘आध्यात्मिक प्रगतीसाठी योग्य मार्गदर्शन करून मोक्षाचा मार्ग दाखवणारे’, असे गुरूंचे महत्त्व हिंदु धर्मात आहे. त्यामुळे शिक्षण, राजकारण यांसह विविध क्षेत्रांतील स्वत:च्या मार्गदर्शकांना गुरुस्थानी मानून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची प्रथा भारतीय संस्कृतीमध्ये आहे. यावर्षी मात्र नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘धर्मवीर’ या चित्रपटातील गुरुपूजनाचे दृश्य पाहून काही राजकीय मंडळींनी त्यांच्या नेत्यांचे गुरुपूजन करून त्याचे ‘व्हिडिओ’ सामाजिक माध्यमांवर प्रसारित केले आहेत.
काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये आनंद दिघे गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची, तर सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांचे राजकीय गुरु आनंद दिघे यांची पाद्यपूजा करत असल्याचा प्रसंग दाखवण्यात आला आहे. हा प्रसंग पाहून काही राजकीय मंडळींनी धर्मवीर चित्रपटातील ‘भेटला विठ्ठल’ हे गुरुपूजनाच्या प्रसंगातील गाणे लावून राजकीय नेत्यांची पाद्यपूजा केली आहे. याविषयी सामाजिक माध्यमांतून टीका करण्यात आली आहे.
‘राजकारणातील गुरु तात्पुरते असतात. कधी पक्ष पालटतील सांगता येत नाही’, ‘चित्रपट बघून कुणाचेही पाय धरण्यापेक्षा सकाळी नियमित देवाला नमस्कार करा’, अशा अनेक प्रतिक्रिया सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाल्या आहेत.
संपादकीय भूमिकाराजकीय लाभासाठी नव्हे, तर आध्यात्मिक लाभ होण्यासाठी गुरुपूजन करा ! |