आसाममधील सोनारी महापालिका क्षेत्रातील गोमांस विक्रीवरील बंदीवर गुवाहाटी उच्च न्यायालयाकडून नोटीस

गौहत्ती (आसाम) – गुवाहाटी उच्च न्यायालयाने आसाममधील सोनारी महानगरपालिका क्षेत्रातील गोमांस विक्रीवरील पूर्ण बंदीला आव्हान देणार्‍या याचिकेवर महापालिकेला नोटीस बजावली आहे. मुजीब रोहमन आणि अन्य एकाने प्रविष्ट केलेल्या याचिकेवर सुनावणी करतांना न्यायालयाने हा आदेश दिला. महापालिकेने ‘आसाम कॅटल प्रिझर्वेशन अ‍ॅक्ट’च्या कलम ८ नुसार १५ जुलै २०२२ पासून महापालिका क्षेत्रात गोमांस विक्रीच्या व्यवसायावर पूर्णपणे बंदी घातली आहे.

याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे की, या परिसरात त्यांचा व्यवसाय त्यांच्या पूर्वजांच्या काळापासून चालू आहे. संबंधित कायदादेखील संपूर्ण बंदीचा विचार करत नाही. या कायद्यानुसार व्यवसाय करण्यासाठी दुसरी योग्य जागा दिल्याखेरीज पूर्ण बंदी घालण्याचा विचार केला जात नाही.