‘कोटी कोटी कृतज्ञता’ असे का म्हटले जाते ?
साधक किंवा भक्त कृतज्ञता व्यक्त करतांना शेवटी ‘देवा, आपल्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !’, असे म्हणतात. ‘कोटी कोटी कृतज्ञता’ याचा अर्थ काय आहे ? ‘कोटी कोटी कृतज्ञता’ असा शब्दप्रयोग आपण का करतो ?, याचा विचार केला आहे का ?
सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत देव आपल्यासाठी करत असलेल्या प्रत्येक छोट्या गोष्टीविषयी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अपुरीच आहे. आपल्या प्रतिदिनच्या जगण्यातील, तसेच आयुष्यातील अनेक प्रसंग, घटना; किंबहुना प्रत्येकच गोष्टीविषयी कोटी कोटी म्हणजे अनंत कोटी वेळा कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती न्यूनच पडेल; म्हणून तर ‘कोटी कोटी कृतज्ञता’ असा शब्द वापरला जातो !
१. शरिराच्या सुनियंत्रित चालणाऱ्या सर्व कार्यासाठी कृतज्ञता हवी !
आपल्या शरिराचे कार्य कसे चालते ? माझा श्वास आणि हृदय कसे चालते ? माझे त्यांच्यावर नियंत्रण आहे का ? मला भूक कशी लागते ? मी कोणत्याही प्रकारचे अन्न ग्रहण केले, तरी त्यातून रक्त, मज्जा, रस, मांस, अस्थी, मेद इत्यादी कसे सिद्ध होते ? त्यांवर माझे काही नियंत्रण आहे का ? शरिरातील अन्य सर्व कृती कशा होतात ? त्यांवर माझे काहीच नियंत्रण नसतांना या कृती व्यवस्थित आणि अखंडपणे होत आहेत. यांवर भगवंताचे पूर्ण नियंत्रण आहे. यासाठी किती कृतज्ञता व्यक्त केली, तरी अल्पच ठरेल !
२. सृष्टी आणि निसर्ग यांनी दिलेल्या सर्व गोष्टींसाठी कृतज्ञता हवी !
सृष्टीची निर्मिती कशी आहे ? वेगवेगळी झाडे, रंगीबेरंगी सुवासिक फुले, विविध प्रकारच्या चवी असणारी फळे, विविध प्रकारची धान्ये हे सर्व देवाने आपल्यासाठी निर्माण केले आहे. व्यवहारात १ लिटर शुद्ध पाणी खरेदी करण्यासाठी १५ ते २० रुपये मोजावे लागतात. देवाने हवा, पाणी आणि प्रकाश दिला नसता, तर आपण जगू शकलो असतो का ? हे सर्व विनामूल्य मिळत असतांना आपण किती वेळा त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करतो ? या सर्वांसाठी प्रत्येक क्षणी आपण कृतज्ञता व्यक्त करायला हवी !
३. जगभरातील देशांच्या तुलनेत भारतियांची स्थिती समाधानी असल्यासाठी कृतज्ञता हवी !
आज जगभरातील अनेक देशांमध्ये अराजकसदृश स्थिती आहे. अमेरिकेसारख्या श्रीमंत देशात नीतीमत्ता एवढी रसातळाला गेली आहे की, तेथील नागरिकांना मनःशांती मिळत नाही. इस्लामी देशांत क्रूरतेची परिसीमा गाठली गेली आहे, तर आफ्रिकी देशांमध्ये पराकोटीची गरिबी आहे. तुलनेत अजूनही जे थोडेफार समाधानी जीवन भारतात आहे, ते केवळ देव, संत आणि गुरु यांच्या कृपेमुळेच आहे.
४. ऋषीमुनी, द्रष्टे संत आणि गुरु सूक्ष्मातून लढून भारताचे रक्षण करत असल्याने त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे !
४ अ. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी भारतविरोधी शक्तींपासून देशाचे संरक्षण करण्यासाठी महर्षि अरविंद स्वत: सूक्ष्मातून युद्ध लढले.
४ आ. द्रष्ट्या संतांनी लिहिलेले लेख आणि ग्रंथ यांतून असे लक्षात येते की, भारतावर आलेल्या अनेक नैसर्गिक आपत्ती, तसेच युद्धसदृश निर्माण झालेली परिस्थिती हिमालयात तपश्चर्या करत असणाऱ्या तपस्वींच्या तपोबलामुळे थांबवली गेली आहे.
४ इ. आज भारतात गुन्हेगारी, भ्रष्टाचार, महिलांवरील अत्याचार, भारतविरोधी कारवाया आदींचे प्रमाण पुष्कळ वाढल्याने, तसेच प्रजा साधना करत नसल्याने रज-तमाचे प्रचंड प्राबल्य आहे. अशाही स्थितीत भारतातील जनता जी काही थोड्या फार प्रमाणात सुस्थितीत जीवन जगत आहे, त्याचे कारण म्हणजे आताही अनेक ज्ञात-अज्ञात संत हे समष्टीसाठी साधना करत आहेत. हिमालयातील ऋषीमुनीही साधना करत असल्याने भारताचे रज-तमाच्या प्रकोपापासून रक्षण होत आहे; परंतु दुर्दैवाने सध्याच्या जनतेला याची जाणीवच नाही. या सर्वांविषयी सर्वसामान्य जनता अनभिज्ञ असते.
४ ई. वाईट शक्ती मानवावर अखंड आक्रमणे करत असतात; परंतु मानवाला सूक्ष्मातील ज्ञान नसल्याने ते कळत नाही. त्यामुळे याविषयी तो पूर्णतः अनभिज्ञ असतो; परंतु हिमालयस्थित संत आणि भारतात असलेले खरे संत अन् गुरु हे या शक्तींशी अखंडपणे लढत असल्यामुळे मानवाचे प्रत्येक क्षणाक्षणाला रक्षण होत असते. याविषयी प्रत्येक क्षणाक्षणाला कृतज्ञता व्यक्त केली, तरी अल्पच राहील; कारण वाईट शक्तींशी लढण्याचे यत्किंचित्ही सामर्थ्य मानवामध्ये नाही. समाजाने यासाठी ऋषीमुनी आणि संत यांच्या प्रती सदैव कृतज्ञ असले पाहिजे !
५. यज्ञयागादी साधनांद्वारे वाईट शक्तींपासून समाजाचे रक्षण करणाऱ्या द्रष्ट्या संतांप्रती कृतज्ञता !
५ अ. प्राचीन काळापासून ऋषीमुनी यज्ञयागादी साधना करत असत. त्याचा लाभ संपूर्ण सृष्टीला होत असे. त्यामुळे तत्कालीन प्रजा आणि राजा यांना त्यांच्याविषयी कृतज्ञता वाटत असे.
५ आ. सनातनच्या रामनाथी आश्रमात अनेक प्रकारचे याग करण्यात येत आहेत. त्यांचा लाभ साधकांसमवेत संपूर्ण समाजालाही होत आहे. यामध्ये वाईट शक्तींची आक्रमणे न्यून होणे, पूर्वजांचे त्रास न्यून होणे आदी लाभ समाजाला होऊन सर्वांनाच सुखी, समाधानी जीवन प्राप्त होणार आहे.
५ इ. देव, संत किंवा गुरु सामान्यांसाठी काय काय करतात, हे स्थुलातून कळणेही कठीण आहे, तर त्यांचे सूक्ष्मातील कार्य आपल्याला कसे कळणार ? ‘देव माझ्यासाठी किती करत आहे’, असा विचार सातत्याने करून कृतज्ञता व्यक्त करूया !
६. सामान्य माणसाला साधनेचा मार्ग दाखवून त्याच्यात देवत्व प्रकट करणाऱ्या गुरूंविषयी कृतज्ञता !
मानवामध्ये देवत्व प्रकट करण्याचा मार्ग संत आणि गुरु दाखवतात. ‘नराचा नारायण’ म्हणजे प्रत्यक्षात देव बनवण्याचे सामर्थ्य त्यांच्यामध्ये असते. साधना केल्याने सामान्य माणसात देवत्व येते. असा मार्ग दाखवणाऱ्या गुरूंविषयी सामान्य माणसाने कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी अल्पच नव्हे का ?
७. जगात केवळ ५ टक्के जनतेने साधना केली, तरीही सात्त्विक समाजाची निर्मिती होऊ शकते. हे ज्ञान गुरूंविना कोण देऊ शकतो ? साधनेचा हा मार्ग दाखवणाऱ्या गुरूंविषयी कृतज्ञता !
८. भगवंताने अत्यंत प्रीतीमय अंतःकरणाने मानवाला सर्व काही देऊन पाठवले आहे !
भगवंताने मानवाला आनंदी आयुष्य जगण्यासाठी सर्व काही देऊन पाठवले आहे. त्याला आनंदी आणि समाधानी जीवन जगता यावे, यासाठी शास्त्रशुद्ध माहिती देणारे ‘धर्माचरण’ कसे करावे, हे त्याने धर्मग्रंथांच्या माध्यमातून सांगितले आहे. त्यानुसार आचरण करून तो आनंदी होऊ शकतो. मानवाच्या कल्याणासाठी आवश्यक ते सर्व ज्ञान या धर्मग्रंथांच्या माध्यमातून भगवंताने देऊन ठेवले आहे. मानवाला त्यासाठी काहीच करायला नको. आताच्या मानवाची स्वतःच्या कल्याणासाठी काही करण्याची क्षमताही नाही. संत, ऋषीमुनी आणि देवता यांनी हे सर्व अत्यंत प्रीतीमय अंतःकरणाने मानवाला दिले आहे. त्यासाठी त्यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती संपणार नाही !
९. अफाट क्षमतेने ब्रह्मांडाचा व्याप सुनियोजितरित्या सांभाळणाऱ्या परमेश्वराच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !
सामान्य माणसाला कुटुंब सांभाळतांनाही नाकीनऊ येतात. परमेश्वर तर ब्रह्मांडाचा व्याप सुनियोजितरित्या सांभाळत आहे. त्याची किती अफाट क्षमता असेल, याची आपण कल्पनाही करू शकत नाही ! अशा या महान परमेश्वराच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !
– (सद्गुरु) राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
|