अनधिकृत वृक्षतोडप्रकरणी आकुर्डी येथील आस्थापनाला ४५ लाख रुपयांचा दंड !
आकुर्डी – येथील मे. फॉरमायका आस्थापनाने वेगवेगळ्या प्रजातीचे ९० वृक्ष अनधिकृतपणे काढल्याने महापालिकेच्या उद्यान विभागाने या आस्थापनाला दंडाची नोटीस दिली आहे. पिंपरी महापालिका कार्यक्षेत्रामध्ये झाडांचे संरक्षण आणि जतन अधिनियम १९७५ लागू आहे. त्यामुळे महापालिका कार्यक्षेत्रातील कोणत्याही वृक्षांचा विस्तार अल्प करणे, वृक्षतोड करणे, वृक्ष पुनर्राेपण करणे यांसाठी पालिकेच्या उद्यान आणि वृक्ष संवर्धन विभागाची अनुमती घेणे आवश्यक असते; मात्र आकुर्डीतील या आस्थापनाने जेसीबीच्या साहाय्याने वेगवेगळ्या प्रजातीचे ९० वृक्ष काढल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले आहे. (९० वृक्षे तोडेपर्यंत महापालिका प्रशासन काय करत होते ? असा प्रश्न कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ? – संपादक) त्यामुळे प्रत्येक वृक्षासाठी ५० सहस्र रुपये याप्रमाणे या आस्थापनाला ४५ लाख रुपये दंड भरण्याची नोटीस दिली आहे. ‘आस्थापनाकडून खुलासा प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल’, असे महापालिकेच्या उद्यान विभागाने सांगितले आहे.
संपादकीय भूमिकालाखो रुपयांचा दंड केला तरी वृक्षतोडीमुळे होणारी हानी कधीही भरून निघणार नाही, तसेच पुन्हा वृक्ष वाढवण्यासाठी केले जाणारे कष्ट कसे भरून काढणार ? |