जीवनावश्यक वस्तूंवरील ‘जी.एस्.टी.’च्या निषेधार्थ व्यापार्‍यांचा लाक्षणिक बंद !

नवी मुंबई, १६ जुलै (वार्ता.) – केंद्र सरकारने जीवनावश्यक खाद्यपदार्थांवर ५ टक्के वस्तू आणि सेवा कर (जी.एस्.टी.)लावण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या विरोधात वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धान्य बाजारपेठेतील व्यापार्‍यांनी एक दिवसाचा बंद पाळला होता. ‘सरकारच्या या निर्णयामुळे देशातील ७ सहस्र ३०० बाजारपेठा आणि १३ सहस्र डाळ गिरण्या, १ सहस्र ६०० तांदूळ गिरण्या, ८ सहस्र पिठाच्या गिरण्यांसह ३ कोटी लहानमोठ्या व्यापार्‍यांना फटका बसणार आहे’, असे धान्य, तांदूळ आणि तेलबिया व्यापारी संघाचे (ग्रोमा) अध्यक्ष शरद मारू यांनी सांगितले.

१८ जुलैपासून याविषयीचा निर्णय देशभरात लागू करण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. त्याला व्यापार्‍यांनी कडाडून विरोध केला आहे. वस्तू आणि सेवा करामुळे महागाई वाढून त्याचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे. त्यामुळे ‘हा कर मागे घ्यावा’, अशी मागणी या वेळी व्यापार्‍यांनी केली.