‘कुंकळ्ळीच्या महानायकां’ची माहिती पाठ्यक्रमामध्ये समाविष्ट करण्याला गोवा विधानसभेत मान्यता !
आमदार युरी आलेमाव यांनी मांडला होता ठराव
पणजी – ‘कुंकळ्ळीच्या महानायकांची माहिती शाळा आणि महाविद्यालय यांच्या अभ्यासक्रमांमध्ये समाविष्ट करावी’, अशी मागणी करणारा कुंकळ्ळीचे काँग्रेसचे आमदार युरी आलेमांव यांनी विधानसभेत १५ जुलै या दिवशी मांडलेला खासगी ठराव सर्वानुमते संमत झाला.
याविषयी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘कुंकळ्ळीच्या महानायकांचा विषय अभ्यासक्रमात घेण्याची खासगी विधेयकाद्वारे करण्यात आलेली मागणी सरकार मान्य करणार आहे. १६ महानायकांनी ‘देव, देश आणि धर्म’ यांच्या रक्षणासाठी उठाव केला. पोर्तुगिजांच्या क्रूर राजवटीच्या विरोधात ते लढले. १६ महानायकांपासून आम्ही प्रेरणा घेऊन राज्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी काम करू.’’
कुंकळ्ळी येथे १६ महानायकांच्या हुतात्मा स्मारकाला शासनाच्या वतीने श्रद्धांजली
गोव्यात धर्मांतर खपवून घेणार नाही ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा पुनरुच्चार
मडगाव, १५ जुलै (वार्ता.) – ४३९ वर्षांपूर्वी कुंकळ्ळीवासियांनी धर्मरक्षण, स्वराज्य आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी पोर्तुगीज सत्तेच्या विरोधात दिलेला लढा हा धर्मांतराविरुद्धचाच लढा होता. त्यांच्या लढ्याची जाणीव ठेवत राज्यात यापुढे धर्मांतराचे प्रकार खपवून घेणार नाही, अशी चेतावणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. गोमंतकामध्ये पोर्तुगिजांच्या विरोधातील पहिला उठाव हा कुंकळ्ळीवासियांनी कुंकळ्ळी येथे १५ जुलै १५८३ या दिवशी केला. या ऐतिहासिक दिनाच्या निमित्ताने गोवा शासनाच्या वतीने १५ जुलै या दिवशी कुंकळ्ळी येथे ‘कुंकळ्ळीतील महानायकांच्या स्मृतीदिना’चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या वेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते. या वेळी सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल, समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, आमदार युरी आलेमांव, पोलीस महासंचालक जसपाल सिंह आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्री डॉ. सावंत पुढे म्हणाले, ‘‘धर्मरक्षणासाठी प्राणांची आहुती दिलेले १६ महानायक हे गोवा मुक्ती संग्रामाचे आणि धर्मरक्षण करणारे खरे हिरे आहेत. त्यामुळेच गोवा मुक्तीच्या ६० व्या वर्षी त्यांना राज्यपातळीवर सन्मानित करण्याचे आणि वर्ष १५८३ मधील लढ्याला राष्ट्रीय मान्यता देण्याचे भाग्य आमच्या सरकारला मिळाले आहे. यापुढे गोव्यात धर्मांतराचे प्रकार घडणार नाहीत.’’
या निमित्ताने अन्यत्र झालेले काही महत्त्वाचे कार्यक्रम
१. १६ महानायकांचा हुतात्मा दिनाच्या निमित्ताने केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांनी १५ जुलै या दिवशी गोवा शासनाचे प्रतिनिधी या नात्याने नवी देहली येथे राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या ठिकाणी श्रद्धांजली वाहिली.
२. वाडेनगर येथील विद्यालयातील विद्यार्थ्यांनी कुंकळ्ळी येथे १६ महानायकांच्या हुतात्मा स्मारकाला आदरांजली वाहिली.