नेहमी आनंदी आणि ईश्वराच्या अनुसंधानात असणाऱ्या पुणे येथील श्रीमती प्रभावती चंद्रकांत मेहता (वय ९१ वर्षे) यांनी गाठली ६५ टक्के आध्यात्मिक पातळी !
पुणे, १५ जुलै (वार्ता.) – नेहमी आनंदी आणि ईश्वराच्या अनुसंधानात असणाऱ्या पुणे येथील श्रीमती प्रभावती चंद्रकांत मेहता (वय ९१ वर्षे) यांनी ६५ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आहे. एका अनौपचारिक भेटीच्या वेळी पुणे जिल्ह्याच्या जिल्हासेविका सौ. मनीषा महेश पाठक (आध्यात्मिक पातळी ६९ टक्के) यांनी ही घोषणा केली. सद्गुरु स्वाती खाडये यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे छायाचित्र आणि खाऊ भेट देऊन श्रीमती प्रभावती मेहता यांचा सत्कार केला. या वेळी उपस्थित नातेवाइकांची भावजागृती झाली. सर्वांनी आजींची गुणवैशिष्ट्ये सांगितली. या वेळी दैवी बालिका कु. प्रार्थना पाठक (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) ही उपस्थित होती.
मेहता आजी या रामनाथी आश्रमातील पूर्णवेळ साधक होमिओपॅथी डॉ. प्रवीण चंद्रकांत मेहता आणि पुणे येथील साधिका सौ. अंजली सुरेशचंद्र मेहता यांच्या आई, तसेच पुणे येथील साधक श्री. अमोल सुरेशचंद्र मेहता यांच्या आजी आहेत.
नातेवाइकांचे मनोगत
आध्यात्मिक पातळी घोषित केल्यानंतर पुष्कळ कृतज्ञता वाटली ! – होमिओपॅथी वैद्य प्रवीण मेहता (श्रीमती प्रभावती मेहता यांचा मोठा मुलगा)
काही मासांपासून आईमध्ये पालट जाणवल्यावर आईची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाली असेल, असे वाटत होते. प्रत्यक्षात जेव्हा ही घोषणा केली, त्या वेळी पुष्कळ कृतज्ञता वाटली. ‘आईने तिच्या जीवनात पुष्कळ कष्ट केले. त्याचे सार्थक झाले’, असे वाटले.
आई घरी आलेल्या सर्वांचे हसतमुखाने आदरातिथ्य करते ! – विश्वास चंद्रकांत मेहता (श्रीमती प्रभावती मेहता यांचा धाकटा मुलगा)
आई नेहमी आनंदी असते. घरी आलेल्या सर्वांचे ती हसतमुखाने आदरातिथ्य करत असे. आताही या वयात तिला शारीरिक कष्टाची कामे होत नाहीत, तसेच विस्मरणही होते. तरीही ती आलेल्या प्रत्येकाला ‘खाऊन जा, मी करते’, असे म्हणते. त्या व्यक्तीने ‘खाल्ले ना’, असेही आवर्जून विचारते.
सौ. अंजली सुरेशचंद्र मेहता (श्रीमती प्रभावती मेहता यांची मुलगी)
आईने संपूर्ण कुटुंबासाठी पुष्कळ केले आहे. आता या क्षणाला देवाने आईला जवळ घेतले, यासाठी पुष्कळ कृतज्ञता वाटली.
सासूबाईंमध्ये व्यवस्थितपणा आणि नीटनेटकेपणा हे गुण आहेत ! – सौ. माधुरी प्रवीण मेहता (श्रीमती प्रभावती मेहता यांच्या मोठ्या सूनबाई)
लग्नानंतर सासूबाईंकडून पुष्कळ शिकायला मिळाले. त्यांच्यात व्यवस्थितपणा, नीटनेटकेपणा हे गुण आहेत. त्यांचे वय ९१ वर्षे असूनही त्या अजूनही कपड्यांच्या घड्या व्यवस्थित घालतात. गादीवरील बेडशीटवर घडी पडली असेल, तर ती त्या हाताने लगेच व्यवस्थित करतात.
श्री. अमोल सुरेशचंद्र मेहता (श्रीमती प्रभावती मेहता आजींचा नातू)
आजीचे आम्हा नातवंडांवर पुष्कळ प्रेम आहे. तिची आम्हा सर्वांवर एकसारखी माया आहे. आजीची आध्यात्मिक पातळी घोषित केल्यावर कृतज्ञता वाटली.
सौ. नेहा अमोल मेहता (श्रीमती प्रभावती मेहता आजींची नातसून)
आजींच्या बोलण्यात कधीही कुणाविषयी तक्रार नसते. जे आहे, जसे आहे, ते त्या स्वीकारतात.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |