पन्हाळा गडाच्या दुरुस्तीसाठी भरीव तरतूद करा आणि अनधिकृत बांधकामांवर कारवाई करा !
‘शिवदुर्ग संवर्धन आंदोलना’ची केंद्रीय पुरातत्व विभागाकडे मागणी
कोल्हापूर, १५ जुलै (वार्ता.) – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पन्हाळा गड येथे ४ दिवसांपूर्वी चार दरवाजा जवळील तटबंदी आणि बुरूज ढासळला आहे. तीन दरवाजांचीही हीच स्थिती असून हा दरवाजाही कधी ढासळेल, याची आम्हा शिवभक्तांना भीती वाटते. पन्हाळा हा गड केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारित येत असल्याने याच्या दुरुस्तीसाठी भरीव तरतूद करावी, तसेच येथे जी अनधिकृत बांधकामे झाली आहेत, त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन ‘शिवदुर्ग संवर्धन आंदोलना’च्या वतीने पन्हाळा येथे भारतीय पुरातत्व विभागाला देण्यात आले. या प्रसंगी सर्वश्री हर्षल सुर्वे, प्रदीप हांडे, संकेत खोत, अर्जुन कदम यांसह अन्य उपस्थित होते. (पन्हाळा गडाच्या दुरुस्तीसाठी तरतूद करा, अशी मागणी का करावी लागते ? इतकी पडझड होईपर्यंत पुरातत्व विभाग काय करतो ?, तसेच गडावर होणारी अतिक्रमणे विभागाला दिसत नाहीत का ? हिंदूंच्या अस्मितांप्रती संवेदनशून्यता दाखवणारे विभाग आता विसर्जित करावेत, अशी मागणी शिवप्रेमींनी केल्यास चूक ते काय ? – संपादक)
या निवेदनात म्हटले आहे की, पुरातत्व विभागाकडून जर ढासळेल्या तटबंदी आणि बुरुज यांची दुरुस्ती करण्यासाठी आर्थिक तरतूद नसेल, तर आम्ही शिवभक्त लोकवर्गणी काढून याची उभारणी करू. आम्ही मागणी केलेल्या प्रश्नांची लेखी उत्तरे ८ दिवसांत न मिळाल्यास आम्हाला पुरातत्व विभागाच्या विरोधात आंदोलन करावे लागले.