भारत आणि जपान यांच्या मैत्रीपूर्ण संबंधामध्ये शिंजो आबे यांचे योगदान !

१. जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या राजवटीत जपान आणि भारत यांच्यातील संबंध अधिक वृद्धींगत होणे

(निवृत्त) ब्रिगेडिअर हेमंत महाजन

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे हे भारताचे पुष्कळ चांगले मित्र होते. त्यांच्यावर नुकतेच प्राणघातक आक्रमण झाले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. ते वर्ष २००६-०७ आणि वर्ष २०१२ ते २०२० या कालावधीत जपानचे पंतप्रधान होते. या काळात भारत आणि जपान यांच्यातील संबंध अतिशय चांगले झाले होते. यापूर्वी भारताचे जपानशी संबंध ठीकच होते; पण त्यात केवळ चर्चा होत होती. आर्थिक सहकार्य, संरक्षण सहकार्य किंवा स्ट्रॅटेजिक (धोरणात्मक) सहकार्य यांमध्ये आपण प्रगती करू शकलो नव्हतो. याला विविध कारणे होती. आबे हे जपानचे पंतप्रधान बनले, त्यानंतर काही कालावधीनंतर नरेंद्र मोदी हेही भारताचे पंतप्रधान झाले. ज्याप्रमाणे चीन भारताला त्रास देतो, तसाच तो जपानलाही त्रास देतो. ‘आपल्या देशाच्या शत्रूचे शत्रू हे आपले मित्र असतात’, हे लक्षात घेऊन पंतप्रधान मोदी यांनी जपानशी सहकार्य वाढवण्याचा निर्णय घेतला.

जेव्हा हे दोघे जण पंतप्रधान झाले, तेव्हापासून भारत आणि जपान यांच्यामधील संबंध वृद्धींगत झाले. जपानने भारताला अतिशय अल्प व्याजाने कर्ज दिले आहे. यासमवेतच भारत-जपान यांच्यात नौदल आणि गुप्तचर यांच्याविषयीचे सहकार्य वाढत आहे. आबे पंतप्रधान पदावरून पायउतार झाल्यानंतरही जपानच्या नवीन पंतप्रधानांनी भारताविषयी आबे यांचेच धोरण चालू ठेवले. निवृत्त झाल्यावरही आबे यांचे जपानचे संरक्षण आणि परराष्ट्र या धोरणांवर नियंत्रण होते. त्याप्रमाणे आताही जपानचे काम चालू आहे.

२. शिंजो आबे यांच्याविषयी भारत नेहमीच कृतज्ञ राहील !

भारत आणि जपान केवळ चांगले मित्रच झाले नाहीत, तर त्यांनी अनेक क्षेत्रांमध्ये एकमेकांना सहकार्य केले आहे. चतुर्भूज सहकार्य (क्वाड्रिलॅटरल को-ऑपरेशन) हे याचे उदाहरण आहे. त्यात भारत, ऑस्ट्रेलिया, अमेरिका यांच्यासमवेत जपान सहभागी आहे. सर्वांना ठाऊक आहे की, हे चीनच्या विरोधातील सहकार्य आहे. आबे यांच्या नेतृत्वात जपानचे संरक्षणाविषयीचे धोरण पालटण्यात आले. दुसर्या महायुद्धानंतर जपानने विशेष धोरण अवलंबले होते. ‘संरक्षण अंदाजपत्रक (बजेट) वाढवणार नाही, अण्वस्त्रे बनवणार नाही, नौदल आणि वायूदल यांना अधिक बलवान करणार नाही’, अशा स्वरूपाचे बचावात्मक धोरण जपानने अवलंबले होते. तो संरक्षणात्मक सहकार्यासाठी अमेरिकेवर अवलंबून होता. आबे हे जपानचे पंतप्रधान झाल्यावर त्यांनी चीनकडून जपानवर होत असलेले आक्रमण पाहिले. त्यानंतर त्यांनी जपानचे संरक्षण अंदाजपत्रक वाढवणे चालू केले. जपानचे भारताशी नौदल आणि वायूदल यांच्याविषयीचे, तसेच आर्थिक सहकार्य वाढत आहे.

चतुर्भूज सहकार्यही चालू आहे. या सर्वांचे शिंजो आबे हे शिल्पकार होते. ते भारताचे अतिशय चांगले मित्र होते आणि चीनच्या विरोधात आघाडी करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.

३. शिंजो आबे यांच्यामुळे भारताची सुरक्षा अधिक बलवान होण्यास साहाय्य !

केवळ तेच भारताच्या बाजूने आले नाहीत, तर दक्षिण आशियातील व्हिएतनाम, मलेशिया, इंडोनेशिया हे देशही हळूहळू भारताच्या बाजूने येत आहेत; कारण त्यांनाही चीन विविध प्रकारे त्रास देत आहे. या पार्श्वभूमीवर आबे यांचे योगदान अतिशय महत्त्वाचे होते. त्यांच्यामुळे भारताची सुरक्षा अधिक बलवान होण्यास साहाय्य झाले. त्यामुळे आबे यांच्याविषयी भारताने कृतज्ञ रहिले पाहिजे. आशा आहे की, यापुढेही भारत आणि जपान यांच्यातील सहकार्य असेच पुढे चालू राहील. त्यामुळे भारत चीनच्या विरोधात अधिक चांगल्या प्रकारे लढू शकेल.’

– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे.