‘डोलो ६५०’ गोळ्यांची विक्री वाढवण्यासाठी आधुनिक वैद्यांना सहस्रो कोटी रुपयांच्या भेटवस्तू दिल्याचा प्राप्तीकर विभागाचा दावा : विभागाचे ३६ ठिकाणी छापे
बेंगळुरू – कोरोना महामारीच्या काळात मोठ्या प्रमाणात चर्चेत राहिलेल्या ‘डोलो ६५०’ गोळ्यांच्या विक्रीसाठी निर्मात्यांनी अनैतिक पद्धतीचा अवलंब केल्याचा आरोप केंद्रीय प्राप्तीकर विभागाने केला आहे. विभागाने ६ जुलै या दिवशी शहरातील ‘मायक्रो लॅब्स लिमिटेड’शी संबंधित ९ राज्यांमधील ३६ ठिकाणी छापे टाकल्यावर ‘डोलो ६५०’ गोळ्यांची विक्री वाढवण्यासाठी आधुनिक वैद्यांना सहस्त्रो कोटी रुपयांच्या भेटवस्तू दिल्या असाव्यात’, असाही दावा प्राप्तीकर विभागाने केला आहे. ही कारवाई केल्यावर विभागाने एकूण १ कोटी २० लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली असून १ कोटी ४० लाख रुपयांचे सोन्याचे दागिनेही जप्त केले आहेत. या प्रकरणी अद्याप ‘मायक्रो लॅब्स लिमिटेड’ने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
१. अन्वेषणाच्या कालावधीत कागदपत्रे आणि ‘डिजिटल डेटा’च्या रूपात अनेक भक्कम पुरावे सापडले असून ते जप्त करण्यात आले आहेत. पुराव्यांची छाननी करण्यात आली असता वैद्यकीय व्यावसायिकांना विक्री आणि बढतीच्या नावाखाली भेटवस्तू दिल्याचा उल्लेख आहे.
२. केंद्रीय प्राप्तीकर मंडळाच्या माहितीनुसार आधुनिक वैद्य, तसेच वैद्यकीय व्यावसायिकांना प्रचार, चर्चासत्र-मार्गदर्शन, वैद्यकीय सल्ला अशा शीर्षकांखाली आस्थापनेच्या उत्पादनांची प्रसिद्धी करण्यासाठी प्रवास व्यय, भेटवस्तू दिल्या जात होत्या.
३. विनामूल्य देण्यात आलेल्या या गोष्टींचे मूल्य जवळपास १ सहस्त्र कोटी रुपये आहे. केंद्रीय प्राप्तीकर विभागाच्या निवेदनात या आस्थापनेचा उल्लेख नसला, तरी ‘मायक्रो लॅब्स लिमिटेड’शी संबंधितच हे सूत्र आहे.
४. कोरोना महामारीच्या काळात आधुनिक वैद्य आणि ‘मेडिकल’मध्ये ताप, तसेच वेदना अल्प होण्यासाठी ‘डोलो ६५०’ ची गोळी घेण्याचा सल्ला दिला जात होता. आस्थापनेच्या संकेतस्थळावर फेब्रुवारी मासात प्रसिद्ध झालेल्या लेखानुसार आस्थापनेने वर्ष २०२० मध्ये ३५० कोटी ‘टॅब्लेट्स’ची (‘डोलो ६५०’) विक्री केली. यामधून आस्थापनेने वर्षभरात ४०० कोटी रुपयांचा नफा मिळवला होता, अशी माहिती आस्थापनेचे वरिष्ठ अधिकारी दिलीप सुराना यांनी दिली आहे.