श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि मोगरा यांचा दैवी संबंध अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आश्रमात यायच्या कालावधीतच तेथील मोगऱ्याच्या झाडाला भरपूर फुले येणे
‘वर्ष २०१५ पासून श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी’ महर्षींनी नाडीपट्टीत सांगितल्याप्रमाणे भारतभर भ्रमण करत आहेत. त्या महर्षींनी आज्ञा दिल्यावर ५ – ६ मासांनी (महिन्यांनी) १० – १२ दिवसांसाठी गोव्याला रामनाथी आश्रमात येतात. आश्रमात आम्हाला (श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना) रहायला मिळालेल्या खोलीला लागून गच्ची आहे. त्या गच्चीत आम्ही वर्ष २०१५ मध्ये मोगऱ्याचे झाड कुंडीत लावले आहे. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली या पुष्कळ मासांनी रामनाथी आश्रमात येणे आणि तेव्हा गच्चीतील मोगऱ्याच्या झाडाला मोगऱ्याची पुष्कळ फुले येणे, यासंदर्भात मला पुढीलप्रमाणे अनुभूती आल्या.
१. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली रामनाथी आश्रमात येण्याचा जो दिनांक निश्चित ठरायचा, त्याच्या ४ – ५ दिवस आधीपासून मोगऱ्यायाच्या झाडाला कळ्या येऊ लागायच्या. कळ्या इतक्या लागायच्या की, झाडावर कळ्याच कळ्या दिसायच्या. कुंडीतील ते मोगऱ्याचे छोटेसे झुडुप कळ्यांनी बहरायचे. त्या झुडुपाला २०० ते २५० कळ्या असायच्या. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली आश्रमात यायच्या प्रत्येक वेळी मोगऱ्याला कळ्या आलेल्या असायच्या. यावरून साधकांनाही कळायचे की, आता श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली आश्रमात येणार आहेत.
२. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली यांची वर्ष २०१६ मध्ये गुरुपौर्णिमेच्या दिवशी आध्यात्मिक उन्नती होऊन त्या ‘सद्गुरुपदी’ (८१ टक्के आध्यात्मिक पातळीवर) विराजमान झाल्या. त्यानंतर पुढील २ – ३ वर्षे त्या जेव्हा जेव्हा रामनाथी आश्रमात १० दिवसांसाठी आल्या, तेव्हा तेव्हा मोगऱ्याला कळ्या आल्या; पण तेव्हा त्या उमलल्या नाहीत, तर श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली आश्रमातून भ्रमंतीसाठी गेल्यानंतर त्या उमलल्या.
३. वर्ष २०१९ च्या गुरुपौर्णिमेपर्यंत श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली यांची आणखी आध्यात्मिक उन्नती होऊन त्यांची आध्यात्मिक पातळी ८७ टक्के झाली. त्या वर्षी महर्षींनी त्यांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा एक आध्यात्मिक उत्तराधिकारी’ म्हणून घोषित केले. तसेच पुढील वर्षी (वर्ष २०२० मध्ये) महर्षींनी त्यांना ‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली’, असे संबोधून त्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारख्या अवतारी जीव असल्याचे सांगितले. वर्ष २०१९ पासून त्या जेव्हा भ्रमंतीवरून आश्रमात यायच्या, तेव्हा त्यांच्या आश्रमातील वास्तव्याच्या १० – १२ दिवसांच्या कालावधीत मोगऱ्याला भरपूर फुले यायची.
४. त्यानंतर वर्ष २०२१ पासून आतापर्यंत असे लक्षात आले आहे, ‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली आश्रमात यायच्या दिनांकाच्या काही दिवस अगोदरच मोगऱ्याची फुलांचा बहर आलेला असायचा आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली आश्रमात येईपर्यंत सर्व बहर संपून जाऊन केवळ ५ – १० फुलेच झाडावर शिल्लक राहिलेली असायची.’
यावरून लक्षात आले, ‘वर्ष २०१६ पासून वर्ष २०२२ पर्यंत श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली यांची अधिकाधिक आध्यात्मिक उन्नती होऊन त्यांचा प्रवास जसा सगुणाकडून निर्गुणाकडे झाला, तसा मोगऱ्याची फुले उमलण्यामध्येही पालट झाला. प्रथम श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली यांच्या अस्तित्वामुळे मोगऱ्याची फुले उमलायची. तसेच त्यांच्या आगमनासाठी ती झाडावर यायची. जेव्हा श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली अधिक निर्गुण स्तरावर गेल्या, तेव्हा त्या आश्रमात येण्याचा दिनांक निश्चित झाल्यावर त्यांच्या सूक्ष्म अस्तित्वानेच मोगऱ्याची फुले उमलू लागली. महर्षींनी नाडीपट्टीत श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली यांच्यामध्ये ‘देवीतत्त्व’ असल्याचे सांगितले आहे. देवीला मोगरा प्रिय आहे. तसेच ज्ञानेश्वरांनी मुक्ताबाईंना ‘मोगरा फुलला…’ याचा भावार्थ सांगितला, ‘मोगरा हे ‘श्रीचित्शक्ति’चे प्रतीक आहे.’ महर्षींनी सौ. अंजली यांना ‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली’, असे संबोधायला साधकांना सांगितले आहे. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली आणि मोगरा यांचा असा संबंध आहे; म्हणून श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली आश्रमात यायच्या कालावधीतच मोगऱ्याच्या झाडाला भरपूर फुले येतात !’
– सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (११.७.२०२२)
|