दुभत्या जनावरांची काळजी आणि निगा कशी घ्यावी ?
१५ जुलै २०२२ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘योग्य गायींची निवड करणे, गायींसाठी योग्य निवारा, पिण्याचे पाणी, दुधाळ जनावरांसाठी खुराक (खाद्य)’, यांविषयीची माहिती वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.
५. गायींच्या निवार्याची आदर्श व्यवस्था
गायींचे ऊन, पाऊस, वारा यांपासून संरक्षण होण्यासमवेतच शेण, मूत्र आणि पाणी यांचा योग्य निचरा होण्यासाठी योग्य भूमी, खेळती हवा अन् पुरेसा सूर्यप्रकाश यांची सोय असणारा आरामदायी निवारा आवश्यक आहे. गायींचा गोठा कोरडा रहाण्यासाठी गोठ्यामध्ये पुरेसा सूर्यप्रकाश येणे आणि धान्यांचा भुसा पसरून गोठ्यातील निसरडेपणा टाळणे आवश्यक असते. प्रत्येक दुभत्या गायीला गव्हाणीची जागा ३ फूट, बंदिस्त जागा ३० ते ४० चौरस फूट आणि अर्ध बंदिस्त गोठ्यामध्ये फिरण्यासाठी मोकळी जागा २५० चौरस फूट आवश्यक असते. अर्ध बंदिस्त गोठा किंवा मुक्त संचार गोठ्याभोवती योग्य प्रकारचे कुंपण असणे आवश्यक आहे. योग्य आणि सुरक्षित कुंपणामुळे बाहेरील इतर घुसखोर किंवा हिंस्र जनावरांपासून गायींचे संरक्षण होते. कुंपण व्यवस्थित असल्याची निश्चिती नियमितपणे प्रत्येक आठवड्याला करावी.
६. आरोग्यरक्षण
आपला गोवंश आजारी असल्यास त्याला वेगळे करून त्याची विशेष काळजी घ्यावी. तसेच त्याला योग्य पशूवैद्यकीय सेवा, खाणे पिणे आणि फिरणे यांसाठी वेगळे ठेवावे.
६ अ. गोठा स्वच्छता आणि खरारा करणे (ग्रूमिंग) : स्वच्छ दूधनिर्मिती आणि गायींचे आरोग्य उत्तम रहाणे यांसाठी त्यांना नियमितपणे खरारा करणे (ग्रूमिंग) आवश्यक आहे. यामुळे त्यांच्या त्वचेला लागलेली घाण आणि गळणारे केस निघून जातात. नियमित खरारा केल्यामुळे गायींच्या त्वचेची स्वच्छता रहाते आणि त्यांच्या त्वचेला योग्य प्रमाणात रक्तपुरवठा होतो.
६ आ. व्यायाम : गायींना पुरेसा व्यायाम मिळण्यासाठी त्यांना प्रतिदिन काही काळ मुक्तपणे फिरू देणे आवश्यक आहे.
६ रोग नियंत्रण : रोगाचा प्रतिबंध होण्यासाठी आणि जंतांचा संसर्ग टाळण्यासाठी योग्य उपाययोजना केल्यास गायींचा कळप निरोगी राहू शकतो. हे साध्य होण्यासाठी गोठ्याचे नियमितपणे निर्जंतुकीकरण करून रोगांना प्रतिबंध करणे शक्य आहे. तसेच गोठ्यातील सर्व गायींचे आरोग्य रक्षण होण्यासाठी निर्धारित केलेल्या वेळेत लसीकरण आणि जंतनिर्मूलन करणे महत्त्वाचे आहे.
६ ई. लसीकरणाचे वेळापत्रक : किफायतशीर दुग्ध व्यवसायासाठी रोगांचा प्रतिबंध हाच उत्तम पर्याय आहे. आरोग्यरक्षणाची झूल म्हणून पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यानंतर पशूधनाचे विविध रोगांपासून रक्षण होण्यासाठी लसीकरण आणि जंतनिर्मूलन करणे हितावह ठरते.
६ उ. लसीकरण : पायलाग किंवा तोंडखुरी आणि पायखुरी (एफ्.एम्.डी.) बुळकांडी, घटसर्प फर्या आणि सांसर्गिक गर्भपात (Cotagious aortion ) या रोगांची लस शासकीय पशूवैद्यकीय चिकित्सालयात विनामूल्य उपलब्ध असते.
६ ऊ. जंतनिर्मूलन : जंतांमुळे पशूधनाची मोठ्या प्रमाणात हानी होते. गायींचे दूध उत्पादन अल्प होणे, आरोग्याच्या तक्रारी निर्माण होणे, वाढ खुंटणे, त्वचा किंवा इतर अवयवांचे आजार होणे, असे प्रकार होतात. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यानंतर गोठ्यातील सर्व गायींचे जंतनिर्मूलन करण्यात यावे.
७. ऋतूमानानुसार योग्य आणि पुरेसा आहार नियंत्रण
गायींना ऋतूमानानुसार योग्य चारा आणि पशूखाद्य देण्याचे नियोजन महत्त्वाचे असते. गायींना देण्यात येणारा चारा सर्व ऋतूंमध्ये सकस असणे आवश्यक आहे. हिवाळ्यामध्ये गायींचे आरोग्य आणि दूध उत्पादन स्थिर रहाण्यासाठी विशेष काळजी घेण्यात यावी. पावसाळ्यामध्ये पोटफुगी टाळण्यासाठी हिरवा चारा अधिक प्रमाणात देऊ नये. प्रत्येक गायीस व्यायल्यानंतर (वासरू दिल्यानंतर) वेण्याचा ताण अल्प होणे, पुढील दूध उत्पादन क्षमता टिकून रहाणे, दूध देण्यातील अनियमितपणा टाळणे, गर्भाशयातील स्राव बाहेर टाकणे आणि गर्भाशय लवकर पूर्वस्थितीत येऊन पुढील गर्भधारणा निर्धारित वेळेत होणे या शरीरक्रियांचे संतुलन रहाण्यासाठी १ किलो शिजवलेली बाजरी, एका नारळातील खोबरे, १०० ग्रॅम मेथी, १०० ग्रॅम शेपू, १०० ग्रॅम आळिव आणि १०० ग्रॅम गोडेतेल देण्यात यावे.
८. पुनरुत्पादनाचे नियोजन
गायीच्या जीवनामध्ये अधिक वेत संख्या (वासरांची संख्या) होण्यासाठी आणि दूध मिळण्यासाठी पुनरुत्पादनाचे योग्य नियोजन असावे. २ वेतांमधील काळ ३ मासांहून अधिक असू नये. यासाठी गाय व्यायल्यानंतर ४५ ते ९० दिवसांमध्ये ती पुन्हा गाभण रहाण्यासाठी प्रयत्न करावेत. ती व्यायल्यानंतर गर्भाशयाचे आरोग्य योग्य रहाण्यासाठी तज्ञ पशूवैद्यकाकडून पडताळणी करून घ्यावी. गायीच्या ऋतूचक्राचा कालावधी २१ दिवसांचा असतो. पुनरुत्पादनासाठी सर्वसाधारणपणे नैसर्गिक किंवा कृत्रिम पद्धतीने रेतन करण्याच्या पद्धती अवलंबल्या जातात. नैसर्गिक रेतनासाठी गोठ्यामध्ये वळू असणे आवश्यक आहे. कृत्रिम रेतनासाठी शासकीय कृत्रिम रेतन केंद्रांची पशूसंवर्धन केंद्रामध्ये सोय उपलब्ध असते.
९. गाभण कालावधीमध्ये दूध देणार् या गायीची काळजी कशी घ्यावी ?
गर्भधारणेनंतर सर्वसाधारणपणे गायी ६ मास दूध देतात. त्यांचा गाभण कालावधी २८० दिवसांचा असतो. वेण्यापूर्वी न्यूनतम २ मास गायीचे दूध बंद होणे आवश्यक आहे. गाभण कालावधीच्या शेवटच्या २ मासांमध्ये वासरांची वाढ अधिक गतीने होत असल्यामुळे गायीचे दूध देणे पद्धतशीरपणे बंद करण्यात यावे. गाभण कालावधीमध्ये गर्भाशयातील वासराची वाढ योग्य प्रकारे होण्यासाठी आणि पुढील वेतामधील दुधाचे उत्पादन स्थिर रहाण्यासाठी गाभण कालावधीच्या शेवटच्या ३ मासांमध्ये शरीर पोषणासाठी आवश्यक आहारासह विशेष आहार देण्यात यावा. तासांमध्ये त्यांच्या वजनाच्या १० टक्के चिकाचे दूध देण्याची व्यवस्था करावी. (गाय व्यायल्यानंतर पहिल्या २१ घंट्यांमध्ये मिळणार् या दुधाला ‘चीक’ असे म्हणतात.) जन्मानंतर ३ मासांनी हळूहळू देण्यात येणार् या दुधाचे प्रमाण अल्प करावे. तसेच वासरांना कोवळा चारा देऊन त्यांच्या कोठीपोटाची वाढ योग्य आणि जलद गतीने होण्यासाठी साहाय्य करावे. या कालावधीमध्ये वासरांचे कुपोषण टाळण्यासाठी त्यांना बाळ पशूखाद्याचा विशेष आहार देण्यात यावा. वासराचे वय ६ मास झाल्यानंतर त्याला आईचे दूध देणे बंद करावे.
१०. दूध दोहण्याचे (काढण्याचे) नियम
दुभत्या गायींचे ठरल्या वेळी सकाळ-सायंकाळ दोहन करण्यात यावे. दूध काढण्यापूर्वी गायींना पशूखाद्याची योग्य मात्रा देण्यात यावी. गायीची कास स्वच्छ करून कोरडी करावी आणि त्यानंतर दूध काढण्यात यावे. त्यामुळे स्वच्छ दूध निर्मितीला साहाय्य होते. शास्त्रानुसार पशू शरिराचा दोहन कालावधी ७ मिनिटांचा असतो. या कालावधीमध्ये कासेतील संपूर्ण दूध काढण्यात यावे, अन्यथा दूध देण्यासाठी मेंदूकडून निर्माण झालेला स्राव प्रभावहीन होतो.
११. दुग्धव्यवसायाची पंचसूत्री
गोपालन व्यवसायाचा विस्तार पहाता काही सूत्रे गोपालकाने त्याच्या मनावर वारंवार बिंबवणे महत्त्वाचे आहे. या सर्व सूत्रांपैकी ५ प्रमुख सूत्रे अत्यंत महत्त्वाची आहेत. यामध्ये मुबलक पिण्यायोग्य पाणी, सकस कुट्टी केलेला चारा, मीठ, क्षार मिश्रण आणि खाण्याचा सोडा यांचा समावेश होतो. यालाच ‘दुग्धव्यवसायाची पंचसूत्री’ असे म्हणतात.
११ अ. पाणी : प्रत्येक गायीला २४ घंटे पिण्यायोग्य मुबलक पाणी मिळणे आवश्यक आहे. पाण्यामुळे पचन झालेले अन्नघटक सर्व शरीरभर पसरून कासेपर्यंत आणले जातात. तसेच रक्ताचा प्रवाहीपणा वाढतो. प्रत्येक लिटर दूध उत्पादनासाठी ४ लिटर अतिरिक्त पाण्याची आवश्यकता असते.
११ आ. चार् याची कुट्टी करणे : चार्याच्या बुडक्याकडील भागात अधिकाधिक अन्नघटक असतात; पण गायींना शेंड्याकडील भाग खाणे आवडते. अधिक अन्नघटक असलेला चारा वाया जातो. त्यामुळे असा अधिक अन्नघटक असलेला चार्याचा भाग जनावरांच्या आहारामधून पोटात जाणे आवश्यक असते. यासाठी चार्याची एक ते दीड इंच लांबीची कुट्टी होणे आवश्यक आहे. याहून चार्याची अधिक लांबीची कुट्टी झाल्यास गायीचे दूध उत्पादन घटते किंवा याहून अल्प लांबीची कुट्टी झाल्यास दुधातील तुपाचे प्रमाण अल्प होते.
११. मीठ : मिठामुळे रक्ताची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. त्यामुळे अधिकाधिक अन्नघटक असलेले रक्त कासेपर्यंत
वाहून नेण्यास साहाय्य होते. परिणामी दुधाचे प्रमाण वाढते.
११ ई. क्षार मिश्रण : गायींच्या शरिरातील सर्व रासायनिक क्रिया, नैसर्गिक स्रावांची निर्मिती, आरोग्य रक्षण, दूध उत्पादनातील सातत्य, पुनरुत्पादन क्षमता टिकून रहाणे आणि दुधातून प्रतिदिन शरिराबाहेर टाकल्या जाणार्या क्षारांचे प्रमाण संतुलित रहाणे या क्रियांसाठी विविध क्षारांची आवश्यकता असते. यासाठी प्रत्येक गायीला प्रतिदिन तिच्या दुधाची उत्पादन क्षमता आणि गाभण कालावधी यांनुसार ५० ते १०० ग्राम क्षार मिश्रण मिळणे आवश्यक असते.
११ उ. खाण्याचा सोडा : एकाच प्रकारचा चारा अधिक काळ देण्यात आल्यास आणि गायीच्या आहारातील सुक्या चार्याचे प्रमाण अल्प असल्यास गायीच्या कोठी पोटाची आम्लता (ॲसिडिटी) वाढते. निरोगी गायीच्या कोठी पोटातील द्रवाची आम्लता ६.५ ते ७ असणे आवश्यक आहे. रवंथ करणार्या प्राण्यांमध्ये खाल्लेल्या अन्नाचे पचन उपकारक सूक्ष्म जिवांद्वारे केले जाते. यामध्ये उपकारक जिवाणू, एक पेशीय
जीव आणि शेवाळवर्गीय जीव यांचा समावेश होतो. गायीच्या कोठी पोटाची आम्लता वाढल्यास या सूक्ष्म जिवांची संख्या अल्प होते. परिणामी बहुमूल्य असणारा सकस चारा शेणाच्या वाटे शरिराबाहेर टाकला जातो. त्यामुळे दुधाचे उत्पादन घटते आणि गायींच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. हा परिणाम टाळण्यासाठी प्रत्येक गायीला प्रतिदिन २५ ग्रॅम खाण्याचा सोडा कोरड्या आहारातून दिला जावा.’
(समाप्त)
– पशूवैद्यक बाबूराव लक्ष्मण कडूकर, पशूचिकित्सा विज्ञान आणि पशूसंवर्धन पदवीधर, डी. फार्म, एम्.बी.ए., निवृत्त
वरिष्ठ पशूवैद्यकीय अधिकारी (२५.६.२०२२)