औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ असे नामकरण करण्याचे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न १६ जुलै या दिवशी पूर्ण करणार ! – मुख्यमंत्री
मुंबई – औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ असे नामकरण करणे, हे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न आहे. ते आम्ही १६ जुलै या दिवशी मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये पूर्ण करणार आहोत, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. महाविकास आघाडी सरकारच्या शेवटच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या नामकरणाच्या निर्णयाला विद्यमान सरकारने स्थगिती दिल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.
एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘सरकार अल्पमतात असतांना ठाकरे सरकारने शेवटच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत नामकरणाविषयीचा निर्णय घेतला होता. सरकार अल्पमतात असतांना घेतलेले निर्णय अवैध असतात. त्यामुळे १६ जुलै या दिवशी मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये नामांतराचा निर्णय घेण्यात येणार आहे.’’
संभाजीनगर नामांतराच्या निर्णयाला स्थगिती दिल्याविषयी नागरिकांमध्ये संतापाची लाट !
संभाजीनगर – तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या संभाजीनगर नामांतराच्या निर्णयाला सरकारकडून स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे या निर्णयाच्या विरोधात तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. या निर्णयाने अप्रसन्नता पसरली असून संभाजीनगरच्या समर्थनात पुन्हा एकदा लढा उभारण्याचे संकेत नागरिकांनी दिले आहेत. औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामकरण करण्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १४ जुलै या दिवशी घेतलेल्या बैठकीत स्थगिती दिली.