दुभत्या जनावरांची काळजी आणि निगा कशी घ्यावी ?
‘आपण शेतीविषयीचे ध्येय निश्चित केले असेल आणि आपल्याकडे गायी ठेवण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध असेल, तर आपल्या शेतीसाठी गोपालन निश्चितच लाभदायक ठरू शकते. गोपालनामुळे आपल्याला दूध, दही, लोणी, तूप, उत्तम प्रकारचे खत आणि जीवामृत मिळू शकते. प्रतिकूल हवामानामध्ये तग धरून ठेवण्याची क्षमता देशी गोवंशामध्ये असल्यामुळे दुग्ध व्यवसायातून आपल्याला निश्चितच लाभ होऊ शकतो. गोपालनामध्ये विविध कृतींचा समावेश होतो.
१. योग्य गायींची निवड करणे
गोपालनास प्रारंभ करतांना योग्य जातीच्या गायीची निवड महत्त्वाची ठरते. विदेशी वंशावळीच्या गायीपेक्षा देशी गायीच्या संगोपनामुळे अधिक लाभ होतात. विदेशी गोवंशामध्ये होल्स्टिन फ्रिजीयन, जर्सी आणि ब्राऊन स्विस या गायींचा समावेश होतो, तर देशी गोवंशियांमध्ये गीर, साहिवाल, लाल सिंधी, डांगी, कांकरेज, हरियाणा, थारपारकर, अंगोल आणि राठी या गायींच्या जातींचा प्रामुख्याने समावेश होतो. देशी गोवंशियांचा मानवी जीवनास हितकारक असलेल्या जागतिक मान्यताप्राप्त ‘एए२’ गटामध्ये समावेश करण्यात आला आहे. या गायींपासून आरोग्यास सुरक्षित दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, तसेच शेतीसाठी उपकारक जिवाणू असलेले अत्युच्च दर्जाचे शेण अन् बहुमूल्य क्षार असलेले गोमूत्र प्राप्त होते.
२. गायींसाठी योग्य निवारा
इतर प्राण्यांप्रमाणे गोपालनासाठी मुबलक पाणी, चारा, खाद्य, योग्य निवारा आणि फिरण्यासाठी पुरेशी जागा आवश्यक आहे. आपण कोणत्या प्रदेशात निवास करत आहोत, त्यानुसार गोपालनासाठी योग्य निवारा आणि त्यांना लागणारी पुरेशी जागा ठरते. त्यावरून गोपालनाचा बंदिस्त गोठा, अर्ध बंदिस्त गोठा आणि मुक्तसंचार गोठा या संगोपन पद्धतींचा वापर केला जातो.
३. पिण्याचे पाणी
गोपालनासाठी वर्षभर मुबलक आणि पुरेसे पिण्यायोग्य कायम पाणी मिळणे आवश्यक आहे. गायींची जात आणि ऋतुमान यांप्रमाणे पिण्यासाठी प्रतिदिन सरासरी २५ लिटर अन् प्रत्येकी १ लिटर दूध उत्पादनासाठी अतिरिक्त ३ लिटर पाण्याची आवश्यकता असते. यासमवेतच गोठ्याची स्वच्छता आणि अन्य कामांसाठी ५० लिटर पाण्याची आवश्यकता असते. याचाच अर्थ प्रत्येक गायीसाठी प्रतिदिन सरासरी १०० लिटर पाण्याची आवश्यकता असते.
४. दुधाळ जनावरांसाठी खुराक (खाद्य)
शरिराचे पोषण, शरिराची वाढ होण्ो, पुढील गर्भधारणा होऊन गर्भाची योग्य वाढ होणे आणि निरंतर दूध उत्पादनासाठी दुभत्या गायींना योग्य अन् पुरेसा खुराक मिळणे आवश्यक आहे. हा खुराक गायीचे वय, जात, कार्यक्षमता आणि दुधाचे उत्पादन यांनुसार दिला जातो. दुभत्या जनावरांना त्यांच्या शरिराच्या वजनाच्या २ ते साडेतीन टक्के शुष्क खाद्य देणे आवश्यक असते. शुष्क खाद्यापैकी २ भाग वैरण आणि एक भाग पशूखाद्य, म्हणजेच आंबोण देणे आर्थिकदृष्ट्या हितावह ठरते. ज्या संतुलित आहारामुळे गायीला दिलेल्या खाद्याचे रूपांतर अधिकाधिक दूध घटकांमध्ये करू शकेल, असा आहार किफायतशीर मानावा लागेल.
खुराक सकस, स्वस्त, चवदार, भिन्न घटक असलेला बुरशी किंवा इतर हानीकारक पदार्थ नसलेला आणि तंतूमय पदार्थांचा समावेश असलेला असावा. गायींना खुराक नियमित वेळेवर द्यावा आणि त्यामध्ये एकदम पालट करू नये; कारण रवंथ करणार्या जनावरांचे जठर ४ भागांमध्ये विभागलेले आणि मोठे असल्यामुळे त्यांना अधिक प्रमाणात अन् तंतूमय घटकांनी युक्त असा आहार दिला नाही, तर त्यांचे पोट भरत नाही अन् त्यांचे समाधान होत नाही. त्यामुळे त्यांना भरपूर वैरण देणे अत्यावश्यक असते. त्यातून दुधाची गुणवत्ता आणि प्रमाण टिकून रहाते.
४ अ. आंबोण सिद्ध करण्यासाठी लागणार्या घटकांची निवड कशी करावी ?
१. स्थानिक उपलब्धता
२. मूल्य
३. पचनीयता आणि परिवर्तन क्षमता
४. स्वतःच्या शेतातील पिकांपासून प्राप्त होणार्या खाद्यघटकांचा प्रामुख्याने वापर करणे
५. दुभत्या जनावरांना १४ ते १६ टक्के प्रथिने आणि ६५ ते ६८ टक्के एकूण पचनीय अन्नघटक (टी.डी.एन्.) असलेले खाद्य मिश्रण खाऊ घालण्यापूर्वी ४ ते ८ घंटे भिजवून आंबोण खाण्यास द्यावे.
४ आ. आंबोण सिद्ध् करण्यासाठी लागणारे घटक
१. धान्ये : तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन
२. चटणी : हरभरा, तूर, मूग, भुईमूग, उडीद आणि मसूर
३. कोंडा किंवा भुसा : धान्याची टरफले आणि त्यापासून मिळणारा कोंडा
४. पेंड : सरकी, भुईमूग, मोहरी, जवस, तीळ, खोबरे
५. टॅपिओका, गाजरे, मासळीची कुटी, दुधाची भुकटी
४ इ. खाद्यमिश्रण सिद्ध करण्यासाठी लागणार्या घटकांचे प्रमाण
१. धान्य भरड : २५ ते ३५ टक्के
२. चुणी : १५ ते २९ टक्के
३. कोंडा आणि भुस्सा टरफले : १० ते २० टक्के
४. पेंड : २५ ते ३५ टक्के
५. खनिज क्षार : १ टक्का
६. मीठ : २ टक्के
७. आवश्यकतेप्रमाणे : पूरक खाद्य (जीवनसत्त्वे मासळी कुट्टी)
८. क्षार मिश्रण : प्रत्येक गायीला तिच्या शरीर क्रियांच्या नियमनासाठी आणि दुधातून निचरा होऊन जाणार्या क्षारांची भरपाई करण्यासाठी क्षार मिश्रणाची आवश्यकता असते. यामध्ये तांबे, लोह, मॅग्नेशियम, मॅगनीज, कोबाल्ट, सेलेनियम, जस्त, सोडियम, पोटॅशियम, क्लोराईड या खनिज द्रव्यांचा समावेश असलेल्या क्षार मिश्रण किंवा क्षार विटे यांचा वापर गायींच्या आहारामध्ये केला जातो. प्रत्येक दुभत्या गायीला प्रतिदिन तिचे दूध उत्पादन आणि शारीरिक स्थिती यांचा विचार करून ५० ते १०० ग्रॅम क्षार मिश्रण देण्यात यावे.
(क्रमशः)
– पशूवैद्यक बाबूराव लक्ष्मण कडूकर, पशूचिकित्सा विज्ञान आणि पशूसंवर्धन पदवीधर, डी. फार्म, एम्.बी.ए., निवृत्त वरिष्ठ पशूवैद्यकीय अधिकारी (२५.६.२०२२)