सकारात्मकता निर्माण करणारे भारतीय साहित्य !
ब्रिटनच्या मुक्त विद्यापिठात इंग्रजी साहित्यातील ‘हॅम्लेट’, ‘गलिव्हर्स ट्रॅव्हल्स’ आणि ‘परस्यूएशन’ या अजरामर कादंबर्यांवर बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. ‘या कादंबर्यांच्या वाचनामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैफल्य, आत्महत्येचे विचार, वंशवाद आणि हिंसाचार वृत्ती निर्माण होते’, असा दावा विद्यापिठाच्या एका समितीने अभ्यासाअंती केला आहे. तिन्ही कादंबर्यांतील ३० प्रकरणांत नकारात्मक उदाहरणे आहेत. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या विचारांवर पडू शकतो. समितीच्या निर्णयामुळे या तिन्ही कादंबर्यांच्या पहिल्या पानावर तशी चेतावणी प्रसिद्ध केली आहे. यातूनच या कांदबर्यांचा दर्जा लक्षात येतो.
प्राचीन भारतीय साहित्याचा अभ्यास केल्यास साहित्य निर्मितीचा विषयही धार्मिक आणि पौराणिक होता. ११ व्या शतकापासून ते १६ व्या शतकापर्यंत मराठी साहित्य ‘ईश्वरकेंद्रित’ दिसते. ब्रिटिशांच्या आगमनामुळे भौतिकवादी विज्ञाननिष्ठ दृष्टीकोनामुळे साहित्यातही आमूलाग्र पालट झाला. अनेक पाश्चात्त्य साहित्य भाषांतरित होऊन व्यापारी आणि राजकीय हेतू पूर्णत्वाला नेण्यासाठी भारतात आले. प्राचीन काळात भारतीय संस्कृतीत ‘महाकाव्य’ हा साहित्यप्रकार अतिशय प्रतिष्ठित मानला गेला. ‘मानवी जीवनाच्या भव्यतेची प्रचीती देणारे, जीवनाचे सांगोपांग दर्शन घडवणारे, नायकप्रधान, सालंकृत असे दीर्घकाव्य म्हणजे ‘महाकाव्य’ होय’, अशी व्याख्या संस्कृत पंडित द.भि. कुलकर्णी यांनी केली आहे. जीवनातील अनेक रंग, वृत्ती-प्रवृत्ती, मानवी विचार, मानवी स्वभाववैशिष्ट्ये प्रतिकात्मक पद्धतीने महाकाव्यातील पात्रे कवी रचत असतो, उदा. कैकयी म्हणजे दुष्टबुद्धी, भरत म्हणजे त्यागबुद्धी, राम म्हणजे सद्बुद्धी आदी. प्लेटो या ग्रीक विचारवंताने आध्यात्मिक नीतीचा पुरस्कार करणार्या साहित्याला आणि असे साहित्य निर्माण करणार्या साहित्यिकाला गौरवले आहे. त्याच्या मते कवी संयमी लोकांचे चित्रण न करता भावविवश माणसांचे चित्रण करतात. अशा चितारलेल्या गोष्टींचा वाईट परिणाम होतोे.
पाश्चात्त्य साहित्यातून प्रेम, वासना, हिंसा, नकारात्मकता प्रक्षेपित होते; तर भारतीय साहित्यातून सत्य, अहिंसा, त्याग, मानवकल्याण, जीवनाकडे पहाण्याचा सकारात्मक दृष्टीकोन हे गुण प्रक्षेपित होतात. भारतीय साहित्याच्या वाचनातून विद्यार्थ्यांवर नकारात्मक संस्कार झाल्याचे एकही उदाहरण नाही. अशा भारतीय साहित्याची श्रेष्ठता लक्षात घेऊन त्याचा वापर जीवन समृद्ध करण्यासाठी करूया !
– श्री. नीलेश पाटील, जळगाव