माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या कारकीर्दीचे अन्वेषण करा !

  • भाजपचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांची केंद्र सरकारकडे मागणी

  • पाकिस्तानला गुप्त माहिती पुरवल्याचा आरोप

डावीकडून हमीद अन्सारी, नुसरत मिर्झा

कोल्हापूर, १४ जुलै (वार्ता.) – काँग्रेसने त्यांच्या सत्ताकाळात हमीद अन्सारी यांना उपराष्ट्रपती केले होते. हमीद अन्सारी यांच्याविषयी पाकिस्तानसाठी हेरगिरी करणार्‍या नुसरत मिर्झा या पत्रकाराने केलेला गौप्यस्फोट गंभीर असून त्याचा देशाच्या सुरक्षिततेशी संबंध आहे. त्यामुळे हमीद अन्सारी यांच्या कार्यकाळाची आणि पाकिस्तानी हेराने दिलेल्या माहितीचे केंद्र सरकारने संपूर्ण अन्वेषण करावे, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

१. वर्ष २००७ ते २०१७ या काळात उपराष्ट्रपतीपद भूषवणार्‍या ‘हमीद अन्सारी यांच्या निमंत्रणावरून भारतात पत्रकार म्हणून दौरे करतांना भारतातील महत्त्वाची गोपनीय माहिती हमीद अन्सारी यांच्याकडून मिळवली’, असा गौप्यस्फोट नुसरत मिर्झा या पाकिस्तानी पत्रकाराने केला आहे.

२. अन्सारी यांनी ५ वेळा वेगवेगळ्या निमित्ताने मिर्झा यांना भारतात निमंत्रित केले होते. ‘या भेटीत मिळवलेली माहिती मी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला पुरवत होतो’, असे मिर्झा यांनी म्हटले आहे. ‘भारताच्या प्रत्येक शहरात पाकिस्तानी गुप्तहेरांचे जाळे पसरले’, असेही मिर्झा यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे.

३. अन्सारी यांची उपराष्ट्रपतीपदावर नेमणूक करण्याच्या काँग्रेसच्या निर्णयाचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.