हिजाबच्या विरोधात इराणमधील महिला रस्त्यांवर !

(हिजाब म्हणजे मुसलमान महिलांनी डोके आणि मान झाकण्यासाठी वापरलेले वस्त्र.)

प्रतीकात्मक छायाचित्र

तेहरान – हिजाबच्या विरोधात १२ जुलै या दिवशी इराणमधील महिला रस्त्यांवर उतरल्या. याविषयीचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित करण्यात आला आहे. या व्हिडिओत इराणी महिला डोक्यावरील हिजाब काढून टाकतांना दिसत आहेत. इराणमध्ये १२ जुलै हा दिवस ‘हिजाब आणि शुद्धतेचा राष्ट्रीय दिवस’ म्हणून साजरा केला जातो. या वेळी सरकारी संस्थांना संपूर्ण आठवडा हिजाबचा प्रचार करण्याची सूचना दिली जाते. त्यामुळे आंदोलकांनी या दिवशी हे आंदोलन केले. इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांनी ‘हिजाब कायद्याला विरोध, हा इस्लामी समाजातील नैतिक भ्रष्टाचार आहे’, असे म्हटले आहे. गेल्या काही मासांंपासून इराणमधील सुरक्षादलांनी इस्लामनुसार वस्त्रे धारण करण्याविषयी कठोर नियम लागू केले आहेत.

इराणमध्ये वर्ष १९७९ पासून महिलांना हिजाबसक्ती करण्यात आली आहे. याविषयीच्या कायद्यानुसार ९ वर्षांवरील मुली आणि महिला यांना सार्वजनिक ठिकाणी डोके झाकणे बंधनकारक आहे. नुकतेच इराणने एका आदेशान्वये हिजाब नसलेल्या महिलांना कार्यालये आणि बँका या ठिकाणी जाण्यास किंवा मेट्रो सेवा वापरण्यास बंदी घातली होती.

संपादकीय भूमिका

कुठे हिजाबला विरोध करण्यासाठी रस्त्यांवर उतरणार्‍या इस्लामी देशातील महिला, तर कुठे हिजाब घालण्यासाठी आंदोलन करणार्‍या भारतातील कट्टरतावादी मुसलमान महिला !