जिहाद संपवण्याचे कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या भूमीत केले होते, हे लक्षात ठेवा ! – सुरेश चव्हाणके, प्रमुख संपादक, ‘सुदर्शन’ वृत्तवाहिनी
‘सुदर्शन’ वृत्तवाहिनीचे प्रमुख संपादक सुरेश चव्हाणके यांच्या ‘जनसंवाद’ कार्यक्रमाला अमरावती येथे उत्स्फूर्त प्रतिसाद !
अमरावती, १४ जुलै (वार्ता.) – ११ जुलै हा ‘विश्व जनसंख्या दिवस’ असल्याने ‘जनसंवाद’ हा कार्यक्रम आपण येथे घेत आहोत. एकेकाळी हिंदूबहुल असलेल्या अमरावती जिल्ह्याचे आज षड्यंत्रपूर्वक धर्मनिहाय म्हणजेच हिंदु-मुसलमान लोकसंख्येचे गुणोत्तर बदलवले जात आहे. अमरावती शहराला सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा असून प्राचीन काळापासून येथे मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे जाणीवपूर्वक अमरावती शहराला लक्ष्य करण्यात येत आहे. जगभरात सर्वप्रथम जिहाद संपवण्याचे कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या भूमीत केले होते, हे आपण लक्षात ठेवायला हवे, असे मार्गदर्शन ‘सुदर्शन’ वृत्तवाहिनीचे प्रमुख संपादक श्री. सुरेश चव्हाणके यांनी केले. ‘व्यावसायिक उमेश कोल्हे यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी, तसेच अमरावतीमधील हिंदूंचे मत जाणून घेऊन त्यांना इस्लामिक जिहादविषयी जागृत करता यावे’, या उद्देशाने ते येथे आले होते. हॉटेल इम्पेरियल येथे ११ जुलै या दिवशी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण ‘सुदर्शन’ वाहिनीवरून ‘जनसंवाद’ या कार्यक्रमाद्वारे करण्यात आले. या वेळी मंचावर प्राध्यापक दिनेश सूर्यवंशी, भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, सुरेश चव्हाणके, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे सल्लागार वैभव डांगे (देहली), भाजपचे किरण पातुरकर, भाजपचे डॉ. अनिल बोंडे हे मान्यवर उपस्थित होते. या वेळी उपस्थित धर्मप्रेमी हिंदूंनी जनसंवाद कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन त्यांची मते व्यक्त केली.
एकाही हिंदूची हत्या होऊ नये, यासाठी उपाययोजना काढून त्या कार्यवाहीत आणाव्यात ! – मान्यवरांचे आवाहन
‘हिंदूंनी कुणालाही न भिता स्वतःसह धर्माबांधवांचे रक्षण करण्यासाठी सक्षम व्हा. उमेश कोल्हे यांची जशी हत्या झाली, तशी एकही हत्या यापुढे होऊ नये, यासाठी उपाययोजना काढून कार्यवाहीत आणाव्यात’, असे आवाहन मान्यवरांनीही केले.