पुराच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात ! – शिवसेनेचे महापालिका प्रशासनास निवेदन
कोल्हापूर, १४ जुलै (वार्ता.) – गतवर्षी आलेल्या महापुराच्या काळात रंकाळा परिसर, पंचगंगा नदी परिसर येथून बाहेर गेलेले नागरिक आत जाऊ शकत नव्हते आणि आत आलेले बाहेर येऊ शकत नव्हते. महापुराच्या काळात नागरिकांना वेळेवर औषधोपचार मिळाले नाहीत, अन्न पुरवठा, तसेच दैनंदिन गरजू वस्तू यांचाही तुटवडा भासला. शहरातील वयोवृद्धांना रुग्णालयात भरती करणे अत्यंत अडचणीचे झाले होते. तरी यंदाही संभाव्य पूरस्थिती पहाता प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, या मागणीचे निवेदन शिवसेनेच्या वतीने महापालिका अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांना देण्यात आले. या वेळी शहरप्रमुख रविकिरण इंगवले, सुनील मोदी, युवा सेना जिल्हाप्रमुख मंजित माने यांच्यासह अन्य उपस्थित होते.
महापालिका प्रशासनास दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गतवेळी नालेसफाई न झाल्यामुळे, तसेच ओढे-नाले यांवर बांधकामास अनुमती दिल्याने पूरस्थिती गंभीर बनली होती. यंदाही पूरस्थिती निर्माण झाल्यास आम्ही नागरिकांना बाहेर काढणे, अन्नपुरवठा करणे यांसह औषधे पुरवण्याचे काम विनामूल्य करू. यासाठी शिवसेनेच्या वतीने आम्ही २ बोटींची व्यवस्था केली आहे.