श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे हे सिंगापूरला मार्गस्थ !

२० जुलैला नव्या राष्ट्रपतींची निवड !

श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे

कोलंबो – आर्थिक डबघाईला गेलेल्या श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे १४ जुलै या दिवशी मालदीवहून सिंगापूरला रवाना झाले. श्रीलंकेत राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. सहस्रावधी नागरिक राजधानी कोलंबोच्या रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. नागरिकांमधील संतापाने उग्र रूप धारण करत काही दिवसांपूर्वी आंदोलक थेट राष्ट्राध्यक्षांच्या सरकारी निवासस्थानात शिरले. त्यामुळे राजपक्षे यांनी श्रीलंकेतून पलायन केले.

श्रीलंकेतील सरकारी सूत्रांनी ‘रॉयटर्स’ या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार राजपक्षे सिंगापूरमध्ये थांबणार आहेत. दुसरीकडे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे हे हंगामी राष्ट्रपती म्हणून कार्यभार सांभाळत आहेत.

अस्थिर श्रीलंकेतील महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडी !

१. श्रीलंकेतील उग्र आंदोलनांची वाढती संख्या पहाता कोलंबोसह पश्‍चिम श्रीलंकेत अनिश्‍चितकालीन आणीबाणीची घोषणा करण्यात आली आहे. विक्रमसिंघे यांनी सुरक्षा दलाला दंगल भडकावणार्‍या आंदोलकर्त्यांना अटकेचे आदेश दिले आहेत.

२. गोटाबाया राजपक्षे अद्यापही पदावर असल्याने त्यांना अटकेपासून संरक्षण आहे. त्यामुळेच पदाचे त्यागपत्र देण्याआधी त्यांनी श्रीलंका सोडण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून देशातच स्थानबद्ध होण्याची नामुष्की येणार नाही.

३. राजपक्षे यांनी १३ जुलै या दिवशी मालदीवमध्ये असतांना त्यांच्या पदाचे त्यागपत्र देऊन शांततापूर्ण सत्तेचे हस्तांतरण करण्यास मान्यता दिली.

४. रानिल विक्रमसिंघे म्हणाले की, ‘सर्व पक्षांचे सरकार सत्तेवर आले’ की राजपक्षे पदावरून बाजूला जातील.

५. श्रीलंकेच्या सर्व पक्षांनी पुढे येत सर्वपक्षीय सरकार स्थापन करून २० जुलैला नव्या राष्ट्रपतींची निवड करण्याचा निर्णय घेतला आहे.