माया आणि अहंकार यांच्या विळख्यातून बाहेर काढून साधकाला परमार्थाच्या प्रगतीपथावर नेणारे एकमेवाद्वितीय सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
मागील ३३ वर्षांपासून मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपाछत्राखाली साधना करत आहे. त्यांनी मला ‘अध्यात्मा’कडे वळवून ते केवळ शिकवले नाही, तर जगायला लावले. महर्षि नारदमुनींनी वाल्या कोळ्याला मायेतून बाहेर काढून तपश्चर्या करायला लावली. त्याप्रमाणे परात्पर गुरु डॉक्टरांनी मला पहिल्या टप्प्यात मायेतून बाहेर काढून साधना करायला लावली. संत मुक्ताबाईंनी चांगदेव महाराजांचा योगसाधनेचा अहंकार घालवून त्यांचा उद्धार केला, त्याप्रमाणे दुसर्या टप्प्यात परात्पर गुरु डॉक्टरांनी माझ्यातील साधनेचा अहंकार घालवण्यासाठी माझ्याकडून स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया करवून घेऊन माझी आध्यात्मिक प्रगती करवून घेतली अन् माझा उद्धार केला.
१. नारदमुनींप्रमाणे साधकाला मायेतून बाहेर काढून अध्यात्म शिकवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
१ अ. नारदमुनींनी मायेत गुरफटलेल्या वाल्या कोळ्याला उपदेश करून नामसाधना करायला लावणे, ती नामसाधना करून वाल्या कोळ्याचा वाल्मीकिऋषि होणे : वाल्या कोळी जंगलामध्ये वाटसरूंची लुटमार करून त्याच्या कुटुंबियांचे पोट भरत होता. एकदा त्याची नारदमुनींशी भेट झाल्यावर त्याने नारदमुनींना धन न दिल्यास ठार मारण्याची धमकी दिली. तेव्हा नारदमुनींनी त्याला विचारले, ‘‘तू लुटमार आणि खून करून धन मिळवून ते तुझ्या कुटुंबाला देत आहेस; पण यामुळे तुझ्या हातून महापाप घडत आहे. ‘तुझे कुटुंबीय तुझ्या या पापाचे वाटेकरी होणार आहेत का ?’, हे कुटुंबियांना विचार.’’ त्याप्रमाणे वाल्या कोळ्याने घरी जाऊन कुटुंबियांना विचारले. कुटुंबीय त्याच्या पापाचे वाटेकरी होण्यास सिद्ध नव्हते. तेव्हा त्याला उपरती झाली. ‘मायेतील लोक केवळ स्वार्थी आहेत’, हे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने लुटमारी करणे बंद करून नारदमुनींनी केलेल्या उपदेशाचे पालन करत कठोर नामसाधना केली. त्यामुळे वाल्या कोळ्याचा ‘वाल्मीकिऋषि’ झाले.
१ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मायेत गुरफटलेल्या साधकाला मायेतून बाहेर काढून अध्यात्म शिकवणे आाणि सर्व सोयी-सुविधा पुरवून साधना करवून घेणे : नारदमुनींनी वाल्या कोळ्याला मायेतून बाहेर काढून नामस्मरण करायला लावले. तसेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मला मायेतून बाहेर काढले अन् ते माझ्याकडून सतत साधना करवून घेत आहेत. मी वाल्या कोळ्यापेक्षाही अधिक मायेत अडकलो होतो. मी वाल्या कोळ्याच्या तुलनेत एक सहस्रांशही तपश्चर्या किंवा साधना करू शकत नाही. नारदमुनी वाल्या कोळ्याला एकदाच भेटले आणि त्यांनी त्याला नामजप करण्यास सांगितले; परंतु परात्पर गुरु डॉक्टर मला मागील ३३ वर्षे सातत्याने साधना शिकवत आहेत आणि पाठपुरावा करून माझ्याकडून साधना करवून घेत आहेत. मला वाल्या कोळ्यासारखी एकट्याने जंगलात राहून तपश्चर्या करावी लागली नाही. परात्पर गुरु डॉक्टरांनी मला सर्व सोयी-सुविधा पुरवल्या आणि ते माझ्याकडून व्यष्टी साधना अन् समष्टी सेवा करवून घेत आहेत. ते मला रात्रंदिवस फुलासारखे जपत आहेत.
परात्पर गुरु डॉक्टरांनी माझ्यासारख्या सहस्रो साधकांना जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून बाहेर काढले आहे. शेकडो साधकांना ‘संत आणि सद्गुरु’ या पदांपर्यंत पोचवले आहे. ‘माझ्या जीवनात परात्पर गुरु डॉक्टरांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे’, याची मला सतत जाणीव असते.
२. संत ज्ञानेश्वरांप्रमाणे साधनेचा अहंकार नष्ट करून आध्यात्मिक प्रगती करवून घेणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
२ अ. साधनेचा अहंभाव निर्माण झालेल्या चांगदेव महाराज यांनी मायना न सुचल्याने ज्ञानेश्वरांना कोरेच पत्र पाठवणे, निवृत्तीनाथांच्या आज्ञेवरून ज्ञानेश्वरांनी पत्राचे उत्तर देणे आणि ते ‘चांगदेव पासष्टी’, या नावाने प्रसिद्ध असणे : एकदा चांगदेव महाराज यांच्या कानावर संत ज्ञानेश्वरांची कीर्ती गेली. तेव्हा त्यांना संत ज्ञानेश्वरांच्या भेटीची उत्कंठा लागली. ‘संत ज्ञानेश्वरांना भेटण्यापूर्वी पत्र पाठवावे’, असा विचार करून त्यांनी संत ज्ञानेश्वरांना पत्र लिहिण्यास घेतले; पण ‘मायना काय लिहावा ?’, या संभ्रमातून त्यांनी संत ज्ञानेश्वरांना कोरेच पत्र पाठवले. ‘योगी असूनही चांगदेव महाराज यांच्यामध्ये आत्मज्ञान आणि गुरुकृपा यांची उणीव आहे’, असे संत निवृत्तीनाथांच्या लक्षात आले. त्यांनी संत ज्ञानेश्वरांना पत्राचे उत्तर लिहिण्यास सांगितले. त्याप्रमाणे संत ज्ञानेश्वरांनी जे उत्तर लिहिले, ते ‘चांगदेव पासष्टी’ या नावाने प्रसिद्ध झाले.
२ अ १. चांगदेव महाराज संत ज्ञानेश्वरांच्या भेटीसाठी वाघावर बसून येणे आणि संत ज्ञानेश्वरादी चारी भावंडे ते बसलेल्या भिंतीवरूनच त्यांना सामोरे जाणे : संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या उत्तराचा अर्थ लक्षात न आल्याने चांगदेव महाराज वाघावर बसून हातात सापाचा चाबूक घेऊन संत ज्ञानदेवांना भेटण्यास निघाले. त्यांच्या समवेत त्यांचे १४०० शिष्यही होते. आपला पशूंवरही अंकुश असल्याचा चांगदेव महाराजांना अहंकार होता. त्या वेळी संत निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, मुक्ताबाई आणि सोपानदेव ही संत भावंडे एका भिंतीवर बसली होती. संत ज्ञानेश्वरांनी त्या भिंतीलाच चांगदेव महाराज यांच्याकडे घेऊन जाण्याची आज्ञा दिली. संत ज्ञानेश्वरांना उडणार्या भिंतीवर बसून येत आहेत, हे पाहून त्यांची योग्यता चांगदेव महाराज यांच्या लक्षात आली.
२ अ २. चांगदेव महाराज यांचा अहंकार गळून पडल्यावर मुक्ताबाईंनी त्यांना शिष्य म्हणून स्वीकारणे : चांगदेव महाराज यांनी संत ज्ञानेश्वरांना पत्राचा अर्थ समजावून देण्याची विनंती केली. तेव्हा संत ज्ञानेश्वर त्यांना म्हणाले, ‘‘यासाठी तुमच्या एका शिष्याचा बळी द्यावा लागेल.’’ चांगदेव महाराज यांना वाटले, ‘आपले इतके शिष्य आहेत. आपल्यासाठी कुणीही शिष्य प्राण देण्यास सिद्ध होईल’; परंतु त्यांनी मागे वळून पाहिल्यावर सर्वच शिष्य प्राण जायच्या भीतीने पळून गेल्याचे त्यांना दिसले. त्यामुळे त्यांचा अहंकार गळून पडला. पुढे संत ज्ञानदेव त्यांना म्हणाले, ‘‘त्या पत्राचा अर्थ आमची मुक्ता तुम्हाला सांगेल.’’ पुढे चांगदेवांनी मुक्ताबाईंना गुरु मानले.
३. संत ज्ञानेश्वरांनी चांगदेव महाराज यांना योगसाधनेच्या अहंकारातून बाहेर काढले, त्याचप्रमाणे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकाकडून स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवून घेऊन साधना करवून घेणे
व्यावहारिक जीवनात मी एक हुशार विद्यार्थी आणि नंतर मोठा अधिकारी होतो. माझ्यामध्ये ‘मला अधिक कळते. मी श्रेष्ठ आहे. मी अधिक शहाणा आहे. मला येते’, असे अहंचे अनेक पैलू पुष्कळ प्रमाणात होते. मी मागील ३३ वर्षांपासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहे. या काळात मला अनेक संत आणि महात्मे यांचा सत्संग लाभला. यामुळे माझा माझ्या साधनेविषयीचा अहं वाढला; पण माझ्या साधनेची स्थिती चांगदेव महाराज यांच्यापेक्षाही फार गंभीर होती. असे असतांना परात्पर गुरु डॉक्टरांनी माझ्याकडून स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवून घेऊन माझ्यातील गुण वाढवले. त्यांनी माझ्यासारख्या सहस्रो साधकांची साधनेतील घसरण थांबवून त्यांची आध्यात्मिक प्रगती करवून घेऊन त्यांचा उद्धार केला आहे.
४. कृतज्ञता
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी माझ्यासारख्या अतीसामान्य आणि अतीक्षुद्र जिवाला माया अन् अहंकार यांच्या विळख्यातून बाहेर काढून परमार्थाच्या मार्गाला लावले आणि नंतर साधनेच्या महाभयंकर अहंकारातूनही बाहेर काढले. परात्पर गुरु डॉक्टरांचे श्रेष्ठत्व, अवतारत्व आणि समर्थ गुरुत्व माझ्यासारख्या सहस्रो साधकांनी अनुभवले आहे. त्यासाठी मी त्यांच्या सुकोमल चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.
– (पू.) श्री. शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (५.५.२०२२)