कधीच अंगार विझणार नाही, हिंदुत्वाविना विचार नाही ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
मुंबई, १३ जुलै (वार्ता.) – ‘बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच. विझणार कधीच अंगार नाही, हिंदुत्वाविना विचार नाही’, गुरुपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरील शब्दांत त्यांचे राजकीय गुरु बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करत हिंदुत्वाचा अंगीकार केल्याचा पुनरुच्चार केला. गुरुपौर्णिमेनिमित्त दादर येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाच्या ठिकाणी जाऊन अभिवादन केले.
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाच्या ठिकाणी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘बाळासाहेबांनी शिवसैनिकांना ताठ मानेने जगण्याची दिशा दिली. युतीचे सरकार चांगले काम करेल. राज्याचा विकास, शेतकर्यांचा विकास आणि गोरगरिबांचे कल्याण करण्यासाठी आम्ही काम करणार आहोत. बाळासाहेबांचे आशीर्वाद आमच्यासमवेत आहेत. राज्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला जात आहे. संपूर्ण पूरस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. प्रत्येक जिल्ह्याधिकार्यांना आदेश दिले आहेत. पूरग्रस्त भागांत अतिरिक्त साहाय्य पोचवण्याचीही सूचना देण्यात आली आहे.’’
राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सामान्य कार्यकर्ता म्हणून कार्यरत ! – मुख्यमंत्री
ठाणे – राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी काम करत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय आनंद दिघे यांच्या शिकवणीनुसार आम्ही काम करत आहोत. यामुळे सामान्य नागरिकांच्या जीवनात पालट घडून येईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे येथे व्यक्त केला. गुरुपौर्णिमेनिमित्त १३ जुलै या दिवशी मुख्यमंत्री शिंदे येथील टेंभी नाक्यावरील आनंदाश्रमामध्ये आले होते. त्या वेळी त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे पूजन करत त्यांना अभिवादन केले.