नाशिक-गुजरात सीमेवरील दमणगंगा नदीला पूर !

दावलेश्वर महादेव मंदिर पाण्यात

दावलेश्वर महादेव मंदिर

नाशिक – मागील काही दिवसांपासून मुसळधार बरसणार्‍या पावसामुळे नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यातील अनेक नद्यांना पूर आला आहे. गंगापूर, कश्यपी धरणातील पाणीसाठा वाढला आहे, तर त्र्यंबकेश्वर, हरसूल, सुरगाणा आदी भागांत रस्ते खचले असून अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत. त्र्यंबक तालुक्यातील गुजरात-महाराष्ट्र सीमेवर दमण गंगेच्या काठावर असलेल्या श्री क्षेत्र दावलेश्वर देवस्थान दमणगंगेच्या पुरामध्ये बुडाले आहे. या ठिकाणी असलेल्या ४५ फूट उंचीच्या मूर्तीच्या गुडघ्यापर्यंत पाणी आले आहे.

परिसरात चालू असलेल्या पावसामुळे दमणगंगेला पूर आला आहे. मंदिराच्या काठावर आजूबाजूला भात शेती मोठ्या प्रमाणावर असून पुरामुळे शेतात पाणी घुसले आहे. अनेक ठिकाणी भात लावणी झाली असल्याने रोपांची हानी होण्याची शक्यता आहे.