गोपाळकाल्यासाठी गोपाळपूरनगरी वारकर्यांच्या गजराने दुमदुमून गेली !
गोपाळकाला उत्सवाने आषाढी यात्रेची सांगता !
पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – टाळ मृदंगाच्या गजरात, तसेच संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज यांचा जयघोष करत आषाढी यात्रेसाठी आलेल्या सहस्रो भाविकांनी गोपाळपूर येथील श्रीकृष्ण मंदिरात गोपाळकाल्याचा उत्सव साजरा केला. या वेळी ‘गोपाळकाला गोड झाला’, ‘गोपाळाने गोड केला’, असे म्हणत विविध दिंड्यांनी पंढरपूरमधून आळंदीकडे प्रस्थान केले.
आषाढी एकादशीचा सोहळा पार पडल्यानंतर पौर्णिमेला गोपाळपूर येथे गोपाळकाला होतो. मागील ५ ते ६ दिवसांपासून पंढरपूरमध्ये आलेले भाविक गोपाळकाल्यासाठी उपस्थित होते. दिंडीतील वारकरी सकाळी चंद्रभागेमध्ये स्नान करून शहर प्रदक्षिणा करत गोपाळपूरकडे गेले. गोपाळपूर येथे श्रीकृष्ण मंदिरात अभिषेक करण्यात आला. त्यानंतर सहस्रो भाविकांच्या उपस्थितीत मानाची दहीहंडी फोडण्यात आली. मंदिराला प्रदक्षिणा घालून आलेल्या वारकरी भाविकांनी परतीचा प्रवास करण्यास प्रारंभ केला.