सनातनच्या फोंडा (गोवा) येथील संत पू. (श्रीमती) सुमन नाईक यांनी साधकांना केलेल्या मार्गदर्शनातून त्यांची ‘साधकांनी घडावे’ या संदर्भात दिसून असलेली तळमळ !
१३ जुलै २०२२ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा होती, त्या निमित्ताने…
१३ जुलै २०२२ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आणि गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या या दिवशी गुरुतत्त्व सहस्र पटींनी कार्यरत असते. या गुरुपौर्णिमेचा साधकांना अधिकाधिक लाभ व्हावा, या दृष्टीने गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या संतांविषयी लिखाण प्रकाशित करत आहोत.
१२.७.२०२० या दिवशी आपण फोंडा (गोवा) येथील संत पू. (श्रीमती) सुमन नाईक (सुमनमावशी) यांनी साधकांना केलेल्या मार्गदर्शनातील काही भाग पाहिला. आज उर्वरित भाग पाहू.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/595946.html
२. ‘मी’ कुठेच नको !
२ अ. ‘मी’च्या ऐवजी ‘देव सर्व करवून घेतो’, याची जाणीव ठेवायला हवी !
१. एकदा एका साधकाने मला सांगितले, ‘‘सेवा करतांना मला माझ्या दुखण्याची जाणीव होत नाही. सेवा संपल्यावर जाणीव होते. सेवा करतांना चैतन्य मिळत असते.’’ तेव्हा मी त्याला सांगितले, ‘‘मी करतो’, असे म्हटले, तर शरिराला त्रास जाणवतो; पण ‘देव माझ्याकडून सगळे करवून घेत आहे’, असा भाव असेल, तर दुखण्याचे काहीच वाटत नाही.’’
२. ईश्वराच्या कृपेमुळेच मी इथे नामजपाला बसू शकते. आपल्याला आपले जरा कौतुक झाले की, आपल्या मनात लगेच ‘मी केले’, असे येते आणि आपले मन सुखावते. तसे व्हायला नको. ईश्वरच सर्व करवून घेतो, तर आपल्याला अहं कशाला ? आपल्याला ‘चालता, बसता किंवा जेवता येते’, अशा प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञता वाटायला हवी. आपण देवाविना काही करू शकत नाही. ‘मी’ कुठेच नाही आणि ‘मी’ कुठे नकोच. शरिराच्या अवयवांना नावे दिलेली आहेत. ‘मी’ असे कुठे नाव आहे का ?
३. मला मराठी दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचता येत नव्हते. मला इंग्रजी अंकही कळत नाहीत. मी केवळ पहिलीपर्यंत शिकले आहे. मी केवळ गुरूंचे आज्ञापालन केले. त्यांनीच माझ्याकडून ते करवून घेतले. हातात कधीही ‘माईक’ न धरणारी मी तुमच्यासमोर २ घंटे कशी बोलू शकेन ? आपल्याला भीती वाटत असतांना देवाला प्रार्थना करायची, ‘मला बोलता येऊ दे.’ देवाला शरण जायचे आणि बोलायचे. गुरुच माझ्याकडून बोलवून घेत आहेत.
४. एकदा एका साधिकेला निराशा आली होती. तेव्हा ती साधिका मला म्हणाली, ‘‘मला मार्गदर्शन करा.’’ तिच्याकडून साधनेचे काही प्रयत्न होत नाही; म्हणून तिला निराशा आली होती. साधना करतांना बुद्धीचा अडथळा नको; पण आवश्यक तेथे बुद्धीचा वापर करायला हवा.
५. ‘व्यवहारातील लोक मायेतील गोष्टींसाठी रडतात. साधक साधना नीट होत नाही; म्हणून रडतात.’
६.‘साधनेत असतांना निराशा का येते ? ‘मी करते’ या कर्तेपणामुळे : ‘देवा, तुम्हीच करवून घ्या’, असे म्हणायचे आणि त्याला शरण जायचे, म्हणजे निराशा जाते.’
२ आ. देहभान विसरून आणि भाव ठेवून सेवा करणे आवश्यक आहे ! : तुम्ही देहभान विसरून सेवा करतांना ‘देवच करवून घेतो’, या विचारामुळे थकवा येत नाही. आपण केवळ निमित्तमात्र आहोत. सेवा आपल्या प्रगतीसाठी आहे. त्यामुळे ‘साधकांचा सेवेप्रती भाव कसा आहे ?’, हे महत्त्वाचे आहे. सेवेप्रती कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच असणार आहे.
२ आ १. कृती व्यवस्थित झाली, तरच ती गुरुचरणांशी पोचणार आहे; म्हणून भाव ठेवून कृती करायची.
२ इ. सर्व साधक देवाचे असल्यामुळे साधकांबद्दल विकल्प नको ! : कुठल्याही साधकाविषयी अन्य साधकांकडे बोलू नये. त्यामुळे आपली साधना खर्च होते. देवा, तुम्हीच मला लेखणी धरायला शिकवले. तुम्ही मला लेखणी आणि बसायला आसंदी दिलीत. आश्रमातील साधकांना कशाचीही चिंता नसल्याने त्यांच्या मनात विकल्प यायला नकोत. आपण इथे साधनेसाठी आलो आहोत. सर्व साधक देवाचे आहेत. त्यामुळे त्यांच्याप्रती प्रेम आणि भाव वाढवायचा.
३. देवाशी बोलावे !
मी व्यवहार आणि अध्यात्म यांतील सर्वकाही देवाला सांगते. मी देवाविना अजून कोणाला सांगणार ?
४. गुरूंनी आपल्याला ‘भावजागृती आणि स्वभावदोष अन् अहं निर्मूलन प्रक्रिया’ यांविषयी शिकवले, त्याबद्दल आपल्याला कृतज्ञता वाटायला हवी !
एकदा मी प्रार्थना केली. तेव्हा मला माझ्या गुरूंचे दर्शन झाले आणि माझ्या डोळ्यांतून भावाश्रू आले. अन्य संप्रदायातील साधकांना भावजागृतीविषयी ठाऊक नसल्याने त्यांनी विचारले, ‘‘या का रडत आहेत ?’’ अन्य संप्रदायांतील साधकांना ‘भावजागृती, स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन’ यांविषयी काही ठाऊक नाही. गुरूंनी आपल्याला सर्व शिकवले आहे. त्यासाठीही आपल्याला कृतज्ञता वाटायला हवी.
५. साधकांनी साधनेचे प्रयत्न झोकून देऊन करायला हवेत !
पुढे आपत्काळात व्यष्टी साधनेचा आढावा घेणारा कोणीही नसेल. आता एखाद्या साधकाचे प्रयत्न होत नाहीत; म्हणून त्याचा आढावा बंद केल्यास तो साधक नंतर आढावा देतच नाही. त्याला जाणीवच नसते. साधकांनी साधनेचे प्रयत्न झोकून देऊन करावेत.
६. साधकांना अनिष्ट शक्तींचा त्रास असल्यास त्यांनी देवाला शरण जायचे आणि ‘मला लढायला शिकवा’, असे सांगायचे.
– (पू.) श्रीमती सुमन नाईक, फोंडा, गोवा. (५.६.२०२१)
(समाप्त)