दैनंदिन वापरातील वस्तूंमध्ये असलेल्या घातक रसायनांविषयी जागरूकता बाळगा !

‘खरेतर पुरळ आणि खाज हा माझा विषय नाही; पण आमचे रुग्ण आम्हाला सगळ्या प्रकारच्या शंका विचारतातच. चेहर्‍यावरील पुरळ आणि खाज यांच्याविषयी अजून २-३ रुग्णांनीही सांगितले. मग याचा मी थोडा शोध घेतला. तेव्हा लक्षात आले की, रुग्ण वापरत असलेल्या सौंदर्यप्रसाधनांमध्ये ‘पॅराबेन्स’ (सौंदर्यप्रसाधने टिकण्यासाठी वापरण्यात येणारे संरक्षक रसायन) वापरले जात होते.

१. ‘पॅराबेन्स’ असलेली सौंदर्यप्रसाधने टाळा !

आपण दैनंदिन जीवनात वापरत असलेल्या बर्‍याच वस्तूंमध्ये ‘पॅराबेन्स’ हे संरक्षक म्हणून वापरले जाते, उदा. सौंदर्यप्रसाधने, केस आणि ‘शेविंग क्रीम’ यांसाठी लागणारी प्रसाधने, दुर्गंधीनाशक, स्वच्छतेसाठी लागणारी विविध उत्पादने, डिटर्जंट पावडर इत्यादी. ‘पॅराबेन्स’ हे रसायन मानवी शरिरात सहज शोषले जाते. त्यांची रासायनिक रचना मानवी शरिरातील हॉर्मोन्सशी (संप्रेरकाशी) मिळतीजुळती असल्यामुळे ते शरिरातील हॉर्मोन्सचे संतुलन धोक्यात आणू शकतात. त्यांना ‘इंडोक्राईन डिस्रप्टर’ (अंत:स्रावी व्यत्यय) असे नाव असून ते धोकादायक असतात. ते आपल्या शरिरात बराच काळ राहिल्यास आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. यामध्ये जननक्षमतेवर विपरीत परिणाम होणे, त्वचेचे विविध आजार होणे आणि क्वचित् कर्करोग यांचाही समावेश होतो. त्यामुळे आपल्या शरिराच्या संपर्कात येणार्‍या गोष्टींमध्ये ‘पॅराबेन्स’ नाहीत ना, याची निश्चिती करणे आवश्यक आहे. अलीकडे ‘पॅराबेन्स फ्री’ असलेली बरीच सौंदर्यप्रसाधने उपलब्ध आहेत. केवळ खरेदी करतांना ती बारकाईने बघून घेणे महत्त्वाचे ठरते.

२. दैनंदिन वापरायच्या वस्तूंमध्ये त्वचेवर वाईट परिणाम करणारे ‘सोडियम लॉयर्ल सल्फेट’ हे रसायन नाही ना, हे पडताळून बघा !

डॉ. शिल्पा चिटणीस-जोशी

‘पॅराबेन्स’सारखेच दुसरे रसायन, म्हणजे ‘सोडियम लॉयर्ल सल्फेट’ ! हे ‘सरफेक्टंट’ म्हणून आपल्या दैनंदिन जीवनात वापरात असलेल्या बर्‍याच वस्तूंमध्ये असते. पाणी आणि तेल एकत्र करायचे असल्यास ‘सरफेक्टंट’चा वापर आवश्यक असतो. त्यामुळे सिद्ध होणार्‍या पदार्थांना फेस येतो. टूथपेस्ट, शांपू, सौंदर्यप्रसाधने इत्यादी वस्तूंमध्ये ‘सोडियम लॉयर्ल सल्फेट’ सर्रास वापरले जाते. या रसायनामुळे काही जणांच्या त्वचेला खाज येणे, पुरळ उठणे, सूज येणे असे परिणाम दिसू शकतात. ज्यांना असे त्रास होतात, त्यांनी दैनंदिन वापरातील गोष्टी निश्चितपणे पडताळून पहाव्यात. जीवनसत्त्व घेऊनही तोंडाला सतत फोड येत असतील, तर ‘सोडियम लॉयर्ल सल्फेट’ नसलेली टूथपेस्ट वापरून बघायला हरकत नाही.

३. ‘सॅनिटायझर’मधील ‘ट्र्रायक्लोसन’ नावाचे रसायन आरोग्यासाठी धोकादायक असणे आणि त्याच्या वापरामुळे लहान मुलींमध्ये मासिक पाळी वेळेपूर्वी चालू होणे !

गेल्या २ वर्षांत कोरोना महामारीमुळे ‘सॅनिटायझर’ घराघरात पोचले. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण अजूनही ‘सॅनिटायझर’ वापरत आहेत. ‘सॅनिटायझर’ खरेदी करतांनाही ते नीट पारखून घेणे अत्यावश्यक झाले आहे; कारण त्यामध्ये ‘ट्र्रायक्लोसन’ नावाचे रसायन असल्यास ते धोकादायक आहे. ‘ट्र्रायक्लोसन’ हे मानवी शरिरात हॉर्मोन्ससारखे परिणाम करू शकते. तेही ‘इंडोक्राईन डिस्रप्टर’ या श्रेणीत मोडते.

डॉ. वामन खाडिलकर हे पुण्यातील आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणारे हॉर्मोन्सचे तज्ञ आहेत. त्यांनी केलेल्या संशोधनानुसार गेल्या २ वर्षांत कोरोना महामारीच्या काळात लहान मुलींमध्ये मासिक पाळी वेळेपूर्वी चालू होण्याचे प्रमाण लक्षणीय वाढले. याच्या कारणांचा अभ्यास केल्यावर लक्षात आले की, लहान मुली घरात कोंडल्या गेल्यामुळे मानसिक परिणाम, व्यायामाचा अभाव, वाढलेले वजन यांसमवेतच ‘ट्र्रायक्लोसन’ मिसळलेले ‘सॅनिटायझर’ याचाही मोठा परिणाम दिसला. हे धक्कादायक आहे. याविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण होणे अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे ‘सॅनिटायझर’ विकत घेतांना त्यात ‘ट्र्रायक्लोसन’ नाही ना, हे नक्की पडताळून बघा.

४. आरोग्याला धोकादायक असणार्‍या रसायनांविषयी जागरूक राहिल्यासच विविध आजारांपासून रक्षण होईल !

सध्याच्या प्रदूषणग्रस्त वातावरणात अजूनही काही ‘इंडोक्राईन डिस्रप्टर’ स्वतःला हानी पोचवू शकतात. त्यात प्लास्टिकच्या वस्तू, पाण्याच्या बाटल्या, खराब झालेले नॉनस्टिक पॅन आणि कढया यांचा समावेश आहे. नव्या गाड्यांमधील प्लास्टिकची आच्छादने निश्चितपणे काढून टाकावीत. गाडीत उष्ण झालेल्या पाण्याच्या बाटलीतून कधीही पाणी पिऊ नये. एक महत्त्वाचे सूत्र म्हणजे ही रसायने ‘इंडोक्राईन डिस्रप्टर’ म्हणून काम करतात. त्यामुळे त्याचे दुष्परिणाम दिसून येतात. याचा अर्थ ‘हॉर्मोन्स वाईटच असतात’, असा अजिबात नाही. आम्ही स्त्रीरोगतज्ञ बर्‍याच आजारांमध्ये हॉर्मोन्स असलेली औषधे वापरतो; पण ती पूर्णपणे वैद्यकीय संशोधनानुसार असतात आणि आजार बरे करण्यासाठी अत्यावश्यक असतात. हॉर्मोन्स हे केवळ तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच वापरायला हवेत. असे छुपे शत्रू आपल्या आरोग्यावर धोकादायक आक्रमण करायला टपलेले आहेत; पण आपण थोडीशी जागरूकता दाखवली आणि काळजी घेतली, तर आपण स्वत:चे अन् जीवलगांचेही संरक्षण करू शकतो.’

– डॉ. शिल्पा चिटणीस-जोशी, स्त्रीरोग आणि वंध्यत्व तज्ञ, कोथरूड, पुणे.