नवीन संसद भवनाच्या अशोक स्तंभावरील सिंहांच्या चेहर्‍यात पालट केल्याचा विरोधी पक्षांचा आरोप

नवी देहली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ जुलै या दिवशी नवीन संसद भवनाच्या छतावर लावण्यात आलेल्या अशोक स्तंभाचे अनावरण केले; मात्र त्यावरील सिंहांच्या रचनेमध्ये पालट करण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात आहे. विरोधकांचे म्हणणे आहे की, अशोक स्तंभाच्या सिंहांना क्रूर आणि आक्रमक बनवण्यात आले आहे. यासाठी सिंहांचे तोंड उघडे दाखवण्यात आले आहे, तर सारनाथ संग्रहालयात ठेवण्यात आलेल्या मूळ अशोक स्तंभात सिंहांचे तोंड उघडे नाही.

अशोक स्तंभ सिद्ध करण्याच्या प्रक्रियेत सहभागी असलेले सुनील देवरे यांनी सांगितले की, आम्ही कुणाच्या सांगण्यावरून कोणतेही पालट केलेेले नाहीत. सारनाथमध्ये असलेल्या स्तंभाप्रमाणेच यास बनवण्यात आले आहे. मूळ शिल्प आणि प्रतिकृती यांमध्ये दिसणारा भेद केवळ आकार आणि विशिष्ट कोनातून काढलेल्या छायाचित्रांमुळे वाटत आहे. त्यामध्ये दुसरे कोणतेही कारण नाही. जर तुम्ही सारनाथमधील मूळ शिल्प पाहिले, तर ते हुबेहूब नव्या संसदेसमोरच्या प्रतिकृतीसारखेच दिसेल