अल्पावधीतील श्रीमंती घातक !

‘१५ दिवसांत दुप्पट पैसे परत मिळतील’, असे आमीष दाखवून ८ लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणी कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगूड पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा नोंद झाला. याच प्रकरणी फसवणूक झालेल्या लोकांनी एकत्र येऊन कोल्हापूर येथे पत्रकार पिरषद घेऊन फसवणुकीची रक्कम ४० कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचे सांगितले. हे प्रकरण ताजे असतांनाच सांगली जिल्ह्यातील मिरज शहरात शेअर बाजारात गुंतवणूक प्रकरणी समीर अख्तर हुसेन याने ३ कोटी ३६ लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणी ४७ जणांनी तक्रार दिली आहे.

ही प्रातिनिधिक उदाहरणे असली, तरी अनेक वर्षांपासून गुंतवलेल्या रकमेची दामदुप्पट, एका वर्षात करोडपती, परदेशवारी यांसह असंख्य आमिषे असलेली शेकडो प्रकरणे आहेत. यात फसवले गेल्याची वृत्तेही नियमित प्रसिद्ध होतात. तरीही लोक त्यांचे पैसे अशा आस्थापनांच्या आमिषांना बळी पडून गुंतवतातच ! हा मोह किती घातक आहे, हे लक्षात येत नाही, हे दुर्दैवी आहे. एकीकडे कोणतीही राष्ट्रीयकृत बँक ही ८ ते ९ टक्क्यांहून अधिक व्याज देत नाही, तर मग खासगी आस्थापने १५ ते २५ टक्के व्याज आणि त्याही पलीकडे जाऊन दामदुप्पट पैसे कसे काय देऊ शकतील ? हा प्रश्न पडायला हवा.

कठोर शिक्षेची आवश्यकता !

अशा प्रकारे आर्थिक घोटाळे करणार्‍यांसाठी राज्य सरकारने ‘महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम (एम्.पी.आय.डी.)’ लागू केला आहे; मात्र ‘या कायद्यान्वये गुन्हा नोंद झाला, तरी गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे लगेच परत मिळाले’, असे होत नाही. अशा अनेक प्रकरणांमध्ये प्रत्यक्षात फसवणूक झालेली रक्कम पुष्कळ मोठी असते; मात्र पोलिसांची एकूण वागणूक पहाता प्रत्येक सामान्य गुंतवणूकदार तक्रार देण्यासाठी पुढे येत नाही. ज्या तक्रारी गुंतवणूकदार प्रविष्ट करतात, त्यात मालमत्ता, कागदपत्रे आणि पुरावे मिळवण्यात पोलिसांना अडचणी येतात; कारण आपण कशावर स्वाक्षरी केली आहे, हे गुंतवणूकदारालाही ठाऊक नसते. अशी प्रकरणे थांबवायची असल्यास नागरिकांना सजग व्हावेच लागेल, तसेच अशा प्रकारे घोटाळे करणार्‍यांना अल्पावधीत कठोर शिक्षा झाल्यासच अन्य कुणी पुढे असे घोटाळे करण्याचे धाडस करणार नाही !

– श्री. अजय केळकर, कोल्हापूर