पहिले पाढे पंचावन्न !

पावसाळ्यापूर्वी आपण ‘ये रे ये रे पावसा’ असे म्हणत पावसाला निमंत्रण देत असतो. केवळ शेतकरीच नव्हे, तर सर्वच समाजघटक पावसाच्या पाण्यावर उणे-अधिक प्रमाणात अवलंबून असतात. पावसाच्या आगमनानंतर मात्र काही दिवसांनी सर्वसामान्यांचा हिरमोड झालेला दिसतो; कारण त्यांना तोंड द्याव्या लागणार्‍या जीवघेण्या समस्यांमुळे. पावसाळ्यात नद्यांना येणारे पूर, भरून वहाणारे ओढे, नाले, तलाव, रस्त्यांत पडणारे खड्डे, त्यांत साचणारे पाणी, साचणारा चिखल, त्यामुळे पसरणारे घाणीचे साम्राज्य आदींचा सामना करतांना सर्वसामान्यांच्या नाकात दम येतो. पावसाला निमंत्रण देतांनाच नागरिकांच्या उत्साहाचे रूपांतर सरकारी यंत्रणांप्रतीच्या रागात झालेले असते. प्रत्येक पावसाळ्यात आपल्याकडे हेच चित्र वर्षानुवर्षे पहायला मिळते; परंतु आपण सरकारी यंत्रणांच्या नावाने बोटे मोडण्यापलीकडे काहीही करत नाही. असे करता करता पावसाळा संपतो आणि पुढच्या वर्षी पुन्हा ‘पहिले पाढे पंचावन्न’ असतात. हे चित्र कुठेतरी पालटले पाहिजे.

महापूर

हे अस्मानी संकट नव्हे !

पावसामुळे उद्भवणार्‍या समस्या आणि नागरिकांची होणारी तारांबळ यांचे खापर वरूणराजावर फोडून चालणार नाही. सर्वत्र ‘सिमेंट काँक्रीट’चे जंगल निर्माण झाल्यामुळे पावसाचे पाणी मुरण्यास वाव रहात नाही आणि ‘पाणीच पाणी चहूकडे’ अशी स्थिती निर्माण होते. तरी बरे पावसाळा चालू होण्याआधी सरकारी यंत्रणांकडून नालेसफाईचे काम केले जाते, नद्यांमधील गाळ उपसला जातो, राडारोडा काढला जातो, शहरात पाणी तुंबणार नाही, याची दक्षता घेतली जाते. त्यासाठी शेकडो कोटी रुपये व्यय (खर्च) केले जातात; परंतु प्रत्येक वर्षी व्हायचे तेच होते. प्रत्येक वेळी सरकारी यंत्रणांचे दावे फोल ठरतात आणि नद्या, नाले, ओढे आदी भरून वाहून त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतो. पहिल्या पावसात त्यांचे आपत्ती व्यवस्थापनच वाहून जाते. ‘नेमेचि येतो मग पावसाळा’, या वाक्याऐवजी ‘नेमेचि येतो मग पूर’, असा वाक्प्रचार प्रचलित व्हावा, अशी स्थिती सर्वत्र निर्माण होते. पूरस्थिती निर्माण होण्यामागे ‘पाऊस अधिक पडतो’, हे कारण नाही, तर शहरीकरणाच्या वेगामुळे आहे तो सर्वसाधारण पाऊसही अधिक वाटू लागतो. उणे-अधिक प्रमाणात संपूर्ण देशात अशीच स्थिती आहे. ओढे आणि नाले बुजवून सर्रास केली जाणारी बांधकामे, बांधण्यात येणारी मोठमोठी धरणे, नद्यांचे वळवण्यात येणारे प्रवाह आदी घटक प्रामुख्याने यास कारणीभूत आहेत. निसर्गचक्रात मानवाने सतत अक्षम्य ढवळाढवळ केल्याने प्रत्येक वर्षी परिस्थिती हाताबाहेर जाते. मुळात नाले, ओढे बुजवून बांधकामे होत असतांना सरकारी यंत्रणा झोपा काढत असतात का ? अशा बांधकामांना अनुमती मिळतेच कशी ? संबंधित बांधकाम व्यवसायिक आणि सरकारी यंत्रणांतील काही अधिकारी यांचे साटेलोटे असल्याविना अशा अनुमती मिळणे शक्य नाही. सर्वप्रथम पाणी मुरते ते येथे ! पाण्याचा नैसर्गिक प्रवाह रोखणारे दोषी ते हेच ! अशांमुळेच अनेक ठिकाणच्या नद्या आज चक्क गायब झाल्या आहेत. अशात पावसाळ्यात अधिक पाऊस पडल्यास पाणी जाणार कुठे ? मग ते नागरिकांच्या घरांत, इमारतींत, दुकानांत घुसते आणि मग वर म्हटल्याप्रमाणे आपण निसर्गावर खापर फोडून मोकळे होतो. असाच प्रकार रस्ते बांधकामाच्या संदर्भातही पहायला मिळतो. सहस्रो-कोटी रुपये खर्च करून मोठमोठे रस्ते बांधले जातात. राजकारणी त्यांचे थाटात उद्घाटन करतात, वर्तमानपत्रांत त्यांची छायाचित्रे झळकतात आणि पुढच्याच पावसात ‘रस्त्यात खड्डे कि खड्ड्यांत रस्ता ?’, अशी या रस्त्यांची अवस्था होते. दुसरे पाणी मुरते ते येथे. निकृष्ट दर्जाचे बांधकाम करणार्‍यांवर त्यांचे कंत्राट काढून घेण्यापलीकडे विशेष कारवाई होतांना दिसत नाही. खरे तर जोवर अशांना आजन्म कारागृहात डांबले जात नाही, तोपर्यंत असे पाणी मुरणारे प्रकार थांबणार नाहीत.

दायित्वशून्य नागरिकही उत्तरदायी !

पूरस्थिती ओढवण्याला जितके सरकारी बाबू उत्तरदायी आहेत, तितके दायित्वशून्य नागरिकही कारणीभूत आहेत. फिरायला गेल्यावर प्लास्टिकच्या पिशव्या, डबे, बाटल्या आदी कुठेही फेकून देणारा एक मोठा वर्ग समाजात आहे. ओढे, नाले, तलाव, नदी, समुद्रकिनारे आदी ठिकाणी कचरा टाकला जातो. प्लास्टिकचे पूर्णपणे विघटन होत नसल्याने हा सर्व कचरा कुठे ना कुठे अडकून बसतो आणि त्याचा फटका प्रतिवर्षी पावसाळ्यात बसतो. नद्या प्रदूषित करण्यास तर सर्वाधिक उत्तरदायी असलेला घटक कोण असेल, तर औद्योगिक क्षेत्र ! हे लोक त्यांच्या उद्योगांचा सर्व कचरा, मैलापाणी आदी सर्रास नद्यांमध्ये सोडतात. याची अनेक छायाचित्रे वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध होत असतात; परंतु सरकारी बाबू याकडे ‘अर्थपूर्ण’ कानाडोळा करतात. अशांनाही जोपर्यंत आजन्म कारागृहात टाकले जात नाही, तोपर्यंत असे प्रकार घडत रहातील. तथापि जेथे वर्तमानपत्रांतून छायाचित्रे प्रसिद्ध होऊनही त्याची नोंदही घेतली जात नाही, तेथे दोषींवर कारवाई होणे फार दूरचे आहे. ही स्थिती लज्जास्पद आहे.

निसर्गपूजक व्हा !

आपली संस्कृती निसर्गाची पूजा करायला शिकवते; पण आपण बेधुंद वागून निसर्गाचा र्‍हास करतो. आपल्याला जर निसर्गाचे संवर्धन करता येत नसेल, तर निदान त्याची नासधूस तरी करू नये. निसर्गाशी छेडछाड केली, तर तो त्याची सव्याज परतफेड करतो, हे आपण वेळोवेळी अनुभवले आहे. तरीही आपण सुधारत नाही, हे विशेष. पंचमहाभूते सर्वशक्तीमान असतात. ‘आगामी काळात त्यांचे तांडव पहायला मिळू शकते’, असे अनेक संतांनी सांगितले आहे. याची छोटीशी झलक आपण यंदाच्या पावसाळ्यातही अनुभवली. त्याचे रौद्ररूप पहाण्याची वेळ ओढवून घेण्यापेक्षा वेळीच जागे होण्यातच शहाणपण आहे. निसर्गरक्षणाचा संकल्प करून कृती केली, तर निसर्गदेवही आशीर्वाद दिल्याविना रहाणार नाही !

निसर्गाच्या हानीला सर्वाधिक कारणीभूत असलेल्या घटकांवर कठोर कारवाई करणे आवश्यक !