शिवसैनिकांच्या आग्रहाचा आदर करून राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा ! – उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना
मुंबई – राष्ट्रपतीपदासाठी शिवसेनेने कधीच कोत्या मनाने विचार केलेला नाही. प्रतिभाताई पाटील यांनाही शिवसेनाप्रमुखांनी पक्षाच्या पलीकडे जाऊन पाठिंबा दिला होता. प्रणव मुखर्जी यांनाही पाठिंबा दिला होता. त्यालाच अनुसरून मी लोकांनी केलेल्या आग्रहाचा आदर करून द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देत आहे, अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी १२ जुलै या दिवशी पत्रकार परिषदेत घोषित केली.
शिवसेनेचा राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा, उद्धव ठाकरेंची घोषणा; कारणही सांगितलं!https://t.co/sLuiKMAvUf
— Lokmat (@lokmat) July 12, 2022
शिवसेनेच्या खासदारांनी ११ जुलै या दिवशी ‘मातोश्री’ येथे झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्याकडे राष्ट्रपतीपदासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी केली होती. संजय राऊत यांनी मात्र संयुक्त पुरोगामी आघाडीचे उमेदवार यशवंत सिंन्हा यांना पाठिंबा देण्याची मागणी केली होती. शिवसेनेची भूमिका लवकरच घोषित करण्यात येईल, असे उद्धव ठाकरे यांनी या वेळी सांगितले होते. याविषयी भूमिका स्पष्ट करतांना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘आदिवासी आणि त्या समाजात काम करणारे शिवसैनिक यांनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची विनंती केली आहे. त्यात ‘एकलव्य संघटने’चे शिवाजीराव ढवळे, आमशा पडवी, निर्मला गावित, पालघरच्या जिल्हा परिषद अध्यक्षा यांचा समावेश आहे. एस्.टी., एस्.सी. समाजातील लोकांनीही ‘आदिवासी समाजातील व्यक्तीला प्रथमच राष्ट्रप्रमुख बनण्याची संधी मिळत असल्यामुळे शिवसेनेने त्यांना पाठिंबा दिला, तर आम्हाला त्याचा आनंद होईल’, असे म्हटले. खरेतर सध्याच्या राजकीय परिस्थितीत मी विरोध करायला हवा होता; परंतु या सगळ्यांचा मान ठेवून शिवसेना द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देत आहे. खासदारांच्या बैठकीत सगळ्यांनी निर्णय माझ्यावर सोपवला होता. कुणीही माझ्यावर दबाव आणलेला नाही.’’