परात्पर गुरु डॉ. आठवले हे द्रष्टे संत केवळ ‘हिंदु राष्ट्र येणार’ हे सांगत नसून ते साकार होण्यासाठीही प्रयत्नरत आहेत !
‘भारतातील विविध राज्यांतील लोकांची भाषा, वेष आदी भिन्न असूनही सर्व लोक हिंदु धर्मीय असल्याने एकमेकांशी जोडले गेले आहेत आणि त्यांच्यामध्ये एकसूत्रता आहे; पण निधर्मी शासनकर्ते हिंदु धर्माचे महत्त्व जाणत नसल्याने त्यांनी स्वातंत्र्याला ७५ वर्षे होत आली असूनही भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित केलेले नाही. वस्तूतः या काळात भारताला सर्वधर्म समभावाचा फुकटचा डंका पिटणारेच शासनकर्ते लाभल्याने येथील बहुसंख्य जनताही ‘आपण हिंदु आहोत’, हेच विसरली आहे. त्यामुळे कुणी स्वतःचा तसा उल्लेखही करत नाही.
सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वर्ष २०१२ मध्ये प्रथम ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची आवश्यकता का आहे ?’, हे सांगितले. त्यांनी ‘हिंदु राष्ट्र’ म्हणजे केवळ हिंदूंचे राष्ट्र नव्हे, तर ‘धर्माचरणी, नीतीमान आणि राष्ट्रहितदक्ष प्रजा अन् शासनकर्ते असलेले राज्य’, अशी संकल्पना मांडली. थोडक्यात ‘हिंदु राष्ट्र हे रामराज्यासारखेच असेल’, असे सांगितले. त्यानंतर आता १० वर्षांनी हिंदुत्वनिष्ठ नेते आणि भविष्यकर्ते ‘वर्ष २०३० मध्ये हिंदु राष्ट्र येणार आहे’, असे सांगत आहेत; पण ते ‘हिंदु राष्ट्र येण्यासाठी काय करायचे ?’ हे मात्र सांगत नाहीत. याउलट परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वर्ष २०१२ मध्ये हिंदु राष्ट्राविषयी केवळ सांगितले नाही, तर त्यांनी ‘त्यासाठी काय प्रयत्न करायचे ?’ हेही सांगितले आणि तसे प्रयत्न ते पुढीलप्रमाणे करवून घेत आहेत.
१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने भारतभर शेकडो ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’ होऊन लोक जागृत आणि संघटित झाले.
२. वर्ष २०१२ पासून प्रतिवर्षी ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ भरवले जात आहे. त्यानंतर ठिकठिकाणी प्रांतीय हिंदू अधिवेशनेही होत आहेत.
३. संत-महंत, हिंदुत्वनिष्ठ, वकील, उद्योगपती अशा सर्वांनाच त्यांनी संघटित केले आणि त्यांना एका दिशेने प्रयत्न करण्यास प्रेरित केले.
४. ‘शक्तीच्या बळावर नव्हे, तर दैवी सामर्थ्याच्या बळावरच धर्मसंस्थापना होऊ शकते’, हे एकत्र झालेल्यांना पटवून देऊन त्यांना धर्माचरण आणि साधना करण्यास प्रवृत्त केले.
५. लोकांना सहज घेता येतील असे आणि वाचायला सुटसुटीत असे राष्ट्र, धर्म आणि अध्यात्म या विषयांवरील ग्रंथ प्रसिद्ध केले.
६. एवढेच नव्हे, तर त्यांनी ८ – १० वर्षांपासूनच्या बालसाधकांनाही हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या दृष्टीने घडवायला आरंभ केले आहे. हीच िपढी पुढे हिंदु राष्ट्र सांभाळेल.
७. अध्यात्माचा प्रसार त्यांनी केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात केला. त्यामुळे जगभरातील विविध जातीधर्मांमधील जिज्ञासूंनी साधनेला आरंभ केला आहे.
परात्पर गुरु डॉ. आठवले म्हणतात, ‘हिंदु राष्ट्र येणार, हे ईश्वरनियोजितच आहे आणि तोच त्यासाठी प्रयत्न करवून घेत आहे !’
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (६.४.२०२२)