आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा नोंदवण्यासाठी राष्ट्रीय बाल अधिकार आयोगाकडून पोलीस आयुक्तांना नोटीस !
मुंबई – ‘आरे वाचवा’ आंदोलनात लहान मुलांना सहभागी करून घेतल्याप्रकरणी राष्ट्रीय बाल अधिकार आयोगाने शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा नोंद करावा, यासाठी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना नोटीस पाठवली आहे. ठाकरे यांच्यावर गुन्हा नोंदवून त्याविषयीचा अहवाल येत्या ३ दिवसांत सादर करण्याचा आदेश आयोगाने दिला.
आरे येथील जंगलात कारशेड बांधण्याच्या शासनाच्या निर्णयाच्या विरोधात काही पर्यावरणवाद्यांनी काही दिवसांपूर्वी आरे येथे आंदोलन केले होते. या आंदोलनात सहभागी होऊन आदित्य ठाकरे यांनी पर्यावरणवाद्यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दर्शवला होता. महाविकास आघाडीची सत्ता आल्यावर आरे येथील हा प्रकल्प कांजूरमार्ग येथे हलवण्यात आला होता. भाजप-एकनाथ शिंदे समर्थक सत्तेत आल्यावर कारशेड आरे येथे बांधण्याचे घोषित केले आहे.