फोंडा (गोवा) येथील सनातनच्या संत पू. (श्रीमती) सुमन नाईक यांनी साधकांना केलेल्या मार्गदर्शनातून त्यांची ‘साधकांनी घडावे’ या संदर्भात दिसून असलेली तळमळ !

१३ जुलै २०२२ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे, त्या निमित्ताने…

१३ जुलै २०२२ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे. गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या या दिवशी गुरुतत्त्व सहस्र पटींनी कार्यरत असते. या गुरुपौर्णिमेचा साधकांना अधिकाधिक लाभ व्हावा, या दृष्टीने गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या संतांविषयी लिखाण प्रकाशित करत आहोत.

आज आपण फोंडा (गोवा) येथील संत पू. (श्रीमती) सुमन नाईक (सुमनमावशी) यांनी साधकांना केलेले मार्गदर्शन पाहूया.

एका साधिकेने पू. सुमनमावशींना सांगितले, ‘‘मला ‘व्यष्टी साधना आणि सेवा’ या दोन्हींची सांगड घालता येत नाही. मला साधनेसाठी वेळ देता येत नाही.’’ तेव्हा पू. सुमनमावशींनी साधकांना पुढील मार्गदर्शन केले. सर्व साधकांना शिकण्यासाठी ते येथे दिले आहे.

पू. (श्रीमती) सुमन नाईक

१. ‘व्यष्टी साधना आणि सेवा’ यांची सांगड घालण्यासाठी करायचे प्रयत्न

१ अ. तळमळ वाढवून साधना करणे आवश्यक : ‘साधकांनी ‘वेळ नाही’, असे म्हणायचे नाही. साधनेची तळमळ पाहिजे. ‘आज माझा नामजप झाला नाही, स्वभावदोष आणि अहंचे पैलू यांचे लिखाण झाले नाही’, असे साधक किती वर्षे सांगणार ? साधकांनी ‘मन कशात अडकले आहे ?’, त्याचे निरीक्षण करावे. आपली प्रकृती ठीक नसतांना आधुनिक वैद्यांनी सांगितलेली औषधे आपण सकाळ, दुपार आणि संध्याकाळ आठवणीने घेतोच ना ! तळमळ वाढली की, ‘व्यष्टी साधना करायलाच पाहिजे’, असे वाटेल आणि मग त्या दृष्टीने प्रयत्न होऊन साधकांची साधना होईल.

१ आ. साधकांनी साधनेसाठी वेळ काढला नाही, तर ईश्वराने त्यांचे रक्षण का करावे ? : साधकांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे आज्ञापालन करून साधना करायला हवी. ते आपल्याला अनेक वर्षे शिकवत आहेत. त्यांनी आपल्याला सर्वकाही सांगितले आहे. मी काही साधकांच्या साधनेचा आढावा घेते. त्या वेळी माझ्या लक्षात येते, ‘साधक १ आठवडा चांगले प्रयत्न करतात. नंतर ते प्रयत्नच करत नाहीत आणि ते न करण्यामागील स्पष्टीकरणे देतात. जी गोष्ट करायला २ मिनिटेही लागत नाही, ‘ती का केली नाही ?’, हे सांगण्यासाठी साधक अनावश्यक स्पष्टीकरणे देतात. आपण २ मिनिटेही वेळ काढू शकत नसल्यास आपण कसली साधना करतो ? परात्पर गुरु डॉ. आठवले सातत्याने आपल्या मनावर ‘आपत्काळ जवळ आला आहे’, हे बिंबवत आहेत, तरीही साधकांना त्याविषयी काहीच वाटत नाही. ते आढावा देत नाहीत किंवा प्रयत्नही करत नाहीत.’ मग ईश्वर आपले रक्षण कसे करणार ? साधना आपण स्वतःच्या प्रगतीसाठी करत आहोत. ती करून आपण ईश्वरावर उपकार करत नाही.

१ इ. गुरूंचे आज्ञापालन करणे आणि त्यांना शरण जाणे आवश्यक आहे ! : साधक स्वतःहून व्यष्टी साधनेचा आढावा देत नाहीत; म्हणून मी साधकांचे भ्रमणभाष क्रमांक मिळवून त्यांना संपर्क करते. तेव्हा साधक ‘आज मला वेळ नाही. मी उद्या आढावा देते’, असे सांगतात. हे ते कधी स्वतःहून कळवत नाहीत. आपल्याला असे गुरु भेटले आहेत की, जे आपल्या तोंडाजवळ घास आणून देत आहेत; पण आपण तो खात नाही. त्यांनी आणखी काय करायला हवे ? गुरुदेवांचे आज्ञापालन करणे महत्त्वाचे आहे. साधकांनी ‘देवा, तुम्ही मला किती वर्षे शिकवत आहात; पण अजूनही मी कोरडा पाषाण आहे’, असे म्हणून त्यांना शरण जायला हवे. आपल्या साधनेच्या प्रयत्नांत सातत्य हवे. ‘आज माझा २ घंटे नामजप झाला नाही, लिखाण झाले नाही, तर मी कुठे न्यून पडले ?’, असा विचार करून त्यावर लगेच उपाययोजना काढता यायला हवी.

१ ई. परिस्थिती स्वीकारून साधना करायला हवी ! : एकदा एका साधकाने मला सांगितले, ‘‘मी मुंबईला गेलो असतांना तेथे मोठ्या आवाजात दूरचित्रवाणीवर कार्यक्रम लावले होते. त्यामुळे माझा नामजप झाला नाही.’’ त्या वेळी त्यांना कानात ‘इयरफोन’ घालून नामजप करायला सुचले नाही. आमच्या घरीही मुले दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम लावतात. मी त्यांना ‘ते लावू नका’, असे कधी सांगत नाही. त्यांनी कितीही मोठ्या आवाजात दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम लावले, तरी मी स्वतःची साधना चालू ठेवायचे ठरवले आहे.

१ उ. सर्वत्र भगवंताला अनुभवून साधकांनी स्वतःची साधना होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत ! : ‘साधकांनी प्रत्येक क्षणी साधना कशी होईल ?’, हे पहायला हवे. आपण कुठेही गेलो, तरी अडचण न सांगता साधना केली पाहिजे. जसे जमेल, तसे प्रयत्न करायला हवेत. साधनेत सातत्य नाही, म्हणजे आपण गुरूंचे आज्ञापालन करत नाही. पूर्वी मी प्रसारसेवेला जायचे. तेव्हा इथे घरोघरी मासे खात असल्याने घरात सर्वत्र त्याचा वास असायचा. माझ्या समवेत असणारे साधक ‘अशा घरांत जायला नको’, असे म्हणायचे. मला वाटायचे, ‘मी तिथे गेले नाही, तर त्यांच्यामध्ये साधना करायची जाणीव कशी निर्माण होणार ?’ त्यामुळे मी त्यांच्या घरी जाऊन त्यांना साधना सांगायचे. सर्वत्र भगवंताला पहाता यायला हवे.

१ ऊ. तळमळीने नामजप करायला हवा ! : समजा आपण २ घंटे नामजप करायला बसलो आणि मधेच २ मिनिटे अन्यत्र कुठे गेलो, तर ती २ मिनिटे अधिक वेळ बसून नामजप करायला हवा. आपल्यात ‘ती २ मिनिटे माझा नामजप झाला नाही’, याची खंत असायला हवी, तरच आपला नामजप पूर्ण होईल.

१ ए. परात्पर गुरु डॉ. आठवले सर्व साधकांवर प्रेम करत असल्याने साधकांनीही ‘साधकांवर प्रेम कसे करायचे ?’, ते शिकायला हवे ! : एकदा एका साधिकेची प्रकृती ठीक नव्हती. मीही त्याच खोलीत होते. त्या रुग्णाईत साधिकेला ‘काही हवे-नको’, असे कोणी विचारत का नाही ?’, असे मला वाटायचे. नंतर मी सर्वांना एकत्र बोलावले आणि विचारले, ‘‘तुम्ही रुग्णाईत साधिकेची काळजी का घेत नाही ?’’ तेव्हा अन्य साधिका त्या संदर्भात अडचणी सांगू लागल्या. गुरुदेवांनी आपल्याला हे शिकवले आहे का ?

एका साधिकेच्या मनात अन्य साधिकेविषयी विकल्प यायचे. ते ती मनात ठेवायची. त्यामुळे साधिकेची साधना व्यय होत असे. आपण एका कुटुंबातील आहोत, तर आपल्याला असे विकल्प का येतात ? आपल्याला सर्व साधक आपले का वाटत नाहीत ? परात्पर गुरु डॉक्टर जगभरातील साधकांवर प्रेम करतात. त्यांनी जगभरातील साधकांना ‘माझे’ म्हणून जवळ केले आहे. त्यातून ‘आपण साधकांवर प्रेम कसे करायचे ?’, ते शिकायला हवे.

१ ऐ. साधकांनी लहान लहान कृती त्वरित सुधारून स्वतःमध्ये गुणवृद्धी करायला हवी ! : चप्पल व्यवस्थित ठेवली नाही, ही कृतीच्या स्तरावरील चूक आहे. त्यावर स्वयंसूचना कशाला घ्यायला हवी ? अशा लहान लहान कृती त्वरित सुधारून साधकांनी स्वतःमध्ये गुणवृद्धी करायला हवी. आपल्यात स्वतःला पालटण्याची जिद्द हवी. मी व्यष्टी साधनेच्या आढाव्यातून प्रीती आणि सकारात्मक विचार करायला शिकले.

१ ओ. ‘सर्व ईश्वर करतो’, हा भाव हवा ! : आपण प्रतिक्रिया आणि चुका केवळ सारणीत लिहितो; पण त्यावर कृतीच्या स्तरावर पालट करत नाही. मग आपल्यात पालट कसा होणार ? त्याने आपल्याला हात दिले; म्हणून आपल्याला लेखणी धरता येते. कुठेही कर्तेपणा नको. प्रत्येक गोष्टीत कृतज्ञता वाटली, तर अहं रहाणार नाही. ‘सर्व ईश्वर करतो’, हा भाव हवा. पूर्वी मला शौचाला बसतांना कधी कृतज्ञता वाटायची नाही. नंतर त्रासामुळे मला खाली बसणे शक्य होत नव्हते; म्हणून आसंदीवर (कमोडसारखी सुविधा असलेली आसंदी) बसावे लागले. तेव्हा माझी तिकडेही प्रार्थना होऊ लागली, ‘देवा, तुम्हीच ही सुविधा मला उपलब्ध करून दिलीत.’ इतकी वर्षे मी यासाठी कधी प्रार्थना केली नव्हती. आपल्याला एखादी कृती सहजतेने करता येते; त्या वेळी कृतज्ञता वाटत नाही. जमत नाही, तेव्हा आपल्याला देव आठवतो आणि त्यासाठी प्रार्थना करावीशी वाटते.

१ औ. गुरूंप्रती भाव आणि श्रद्धा हवी ! : मी साधकांसाठी नामजप करतांना आसंदीत बसल्यावर प्रार्थना करते, ‘गुरुदेवा, मी एक लहान मुंगी आहे. मला तुमच्या चरणांखाली ठेवा.’ त्यांनी सूक्ष्मातून चरण ठेवले की, ‘नामजप करतांना १ घंटा कधी झाला ?’, ते माझ्या लक्षातही येत नाही. मी काहीच करत नाही. साधकांच्या मनात ‘आपल्या गुरूंना त्रास व्हायला नको’, असा विचार हवा. आपल्याला लाभले, तसे गुरु (परात्पर गुरु डॉ. आठवले) कुठेच भेटणार नाहीत. गुरुच आपले सर्वस्व आहेत. आपल्या मनात गुरूंप्रती भाव आणि श्रद्धा हवी.’’

१ अं. साधकांनी स्वयंसूचनांची सत्रे भावपूर्ण करायला हवीत. ‘स्वभावदोष उफाळून यायला नको’, यासाठी पुनःपुन्हा भगवंताला शरण जायचे.

– (पू.) श्रीमती सुमन नाईक, फोंडा, गोवा. (५.६.२०२१)


या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/596434.html