भारताचे विश्व गुरुत्वाकर्षण !
१३ जुलै २०२२ या दिवशी ‘गुरुपौर्णिमा’ आहे. त्या निमित्ताने…
११ जुलै २०२२ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘गुरुकृपेने निर्गुण ईश्वराचे दर्शन होत असल्यामुळे सर्व संतांनी गुरूंना ‘देवाहूनही श्रेष्ठ’ समजणे’, याविषयी वाचले. आज त्या पुढचा भाग येथे देत आहोत.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/595731.html
२. गुरु कसे असावेत ?
जनी भक्त ज्ञानी विवेकी विरागी ।
कृपाळु मनस्वी क्षमावंत योगी।
प्रभु दक्ष व्युत्पन्न चातुर्य जाणे ।
तयाचेनि योगे समाधान बाणे ॥
– मनाचे श्लोक, श्लोक १८३
अर्थ : जो भक्त, ज्ञानी, विवेकी, अनासक्त, कृपाळू, मनोनिग्रही, क्षमाशील असा योगी आहे, जो कुशल, चतुर, शास्त्र जाणणारा आहे, अशा सत्पुरुषाजवळच खरे समाधान मिळू शकते.
३. कोणत्या गुरूला भजावे ?
हे सांगतांना समर्थ म्हणतात…
अ. सुखदायक गायक नेमक साधक तो असावा ।
हरिभक्त विरक्त संयुक्त विवेकी तो भजावा ॥
आ. ‘पूजामूलं गुरोः पदम् ।’ म्हणजे ‘पूजेचे सुलभ साधन म्हणजे गुरूंची पाद्यपूजा’, हे तत्त्व शिकवतांना समर्थ रामदास म्हणतात….
त्रिविध तापहारक हे गुरुपाय । भवसिंधूसि तारक हे गुरुपाय ।।
स्वात्मसुखाचें बीज हे गुरुपाय । ज्ञानाचे निजगुज हे गुरुपाय ।।
भक्तिपंथासि लाविती हे गुरुपाय । नयनीं श्रीराम दाविती हे गुरुपाय ।।
सहज शांतीचें आगर हे गुरुपाय । पूर्ण कृपेचे सागर हे गुरुपाय ।।
रामदासाचें जीवन हे गुरुपाय । सकल जीवासाठी पावन हे गुरुपाय ।।
इ. दासबोधाच्या पाचव्या दशकात समर्थ रामदासस्वामी सद्गुरु वचनाचे महत्त्व पुढीलप्रमाणे सांगतात,
जैसे नेत्रीं घालतां अंजन । पडे दृष्टीस निधान ।
तैसे सद्गुरुवचनें ज्ञान । प्रकाश होये ॥
– दासबोध, दशक ५, समास १, ओवी ३८
अर्थ : जसे नेत्रांत अंजन घातले की, भूमीतील गुप्त द्रव्य दृष्टीस पडते, त्याप्रमाणे सद्गुरुवचन श्रवणी पडले की, ज्ञानाचा प्रकाश पसरतो.
ई. शब्दज्ञानाची भांडारे फोडून देणार्या गुरूंविषयी समर्थ म्हणतात,…
फोडूनि शब्दांचे अंतर । वस्तु दाखवी निजसार ।
तोचि गुरु माहेर । अनाथांचे ॥
– दासबोध, दशक ५, समास २, ओवी १५
अर्थ : सद्गुरु वेदातील शब्दाचे अंतरंग दाखवून देऊन स्वस्वरूपानुभव करून देतात, ते सद्गुरु हे अनाथांचे माहेर असते.
जें वेदांचे अभ्यंतरी । ते काढूनी अपत्यापरी ।
शिष्यश्रवणीं कवळ भरी । उद्गारवचने ॥
– दासबोध, दशक ५, समास २, ओवी १७
अर्थ : वेदांचे अभ्यंतरी असणारे गुह्य असे जे ब्रह्मज्ञान ते वेदांतून काढून आई ज्याप्रमाणे आपल्या अपत्याला छोटे छोटे घास भरवते, त्याप्रमाणे सद्गुरुमाऊली अत्यंत वात्सल्याने आपल्या शिष्याच्या कानांत आपल्या शब्दांनी हळूहळू आत्मज्ञानाची गूढ रहस्ये ऐकवते.
उ. सद्गुरूंना ‘देवाहून थोर’ संबोधून समर्थ म्हणतात…
सद्गुरुहून देव मोठा । जयास वाटे तो करंटा ।
सुटला वैभवाचा फांटा । सामर्थ्यपिसें ॥
– दासबोध, दशक ५, समास ३, ओवी ४०
अर्थ : ‘सद्गुरुहून देव मोठा’, असे ज्या शिष्याला वाटते, तो शिष्य खरोखर अभागीच समजावा. वैभवाच्या लोभाने किंवा सामर्थ्याच्या वेडाने त्याच्या ठिकाणी असा भ्रम उत्पन्न झालेला असतो.
ऊ. जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांना त्यांचे गुरु श्री बाबाजी महाराज यांनी स्वप्नात गुरुपदेश केला आणि त्यांना ‘रामकृष्णहरि ।’ हा गुरुमंत्र दिला. संत नामदेवांनी स्वप्नात विठ्ठलासमवेत येवून अभंग लिहिण्याची आज्ञा केली. असे संत तुकाराम गुरूंनाच ‘देव’ म्हणून गौरवतात…
सद्गुरुवांचूनी सांपडेना सोय । धरावे ते पाय आधी आधी ॥
आपणासारिखे करितीं तात्काळ । नाही काळ वेळ तयां लागी ॥
लोह परिसाची न साहे उपमा । सद्गुरुमहिमा अगाधचि ॥
तुका म्हणे कैसे आंधळे हे जन । गेले विसरून खर्या देवां ॥
४. समष्टीसाठीची तळमळ साधकाला गुरुतत्त्वाकडे घेऊन जाते !
परीस लोखंडाचे सोने करू शकतो; पण लोखंडाला परीस बनवता येत नाही. याउलट सद्गुरु सत्शिष्याला त्यांच्यासारखे गुरुत्व बहाल करतात. गुरूंचे हे मोठेपण संत सांगतात. कलियुगामध्ये हरिहरामध्ये अभेद पहाणे, सद्वर्तनी रहाणे, नाममंत्राची देवाणघेवाण करणे, मातापित्याची सेवा करणे, गुरुजन आणि वडीलधारी मंडळी यांचा आदर करणे, जातीपंथ भेद न मानणे अन् या समरसतेतून ‘शिवो भूत्वा शिवं यजेत्’ (अर्थ : शिव होऊनच शिवाची पूजा करा.) या स्वामी विवेकानंदांच्या उक्तीप्रमाणे नारायणाची सेवा करणे, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांप्रमाणे विश्व कल्याणासाठी पसायदान मागणे किंवा समर्थ रामदासांप्रमाणे ‘चिंता करितो विश्वाची’ असे तळमळणे, हे सर्व आपल्याला गुरुत्वाकडे घेऊन जाईल.
५. परमेश्वराचे सगुण रूप असलेल्या महात्म्यांनी कर्मकांड, भक्तीकांड आणि ज्ञानकांड यांचे यज्ञ प्रज्वलित ठेवणे
भारत आणि भारतीय यांमध्ये गुरुतत्त्वाचे अंगीभूत गुण आहेत. त्यामुळे भारताच्या कणाकणांतून संत, सद्गुरु, महागुरु, ऋषिमुनी, महात्मे, अवलिये, सिद्ध, योगी, त्यागी, संन्यासी, राजर्षी, देवर्षि, महर्षि, सिद्धारूढ, तपस्वी, तत्त्वज्ञ, कर्मयोगी, ज्ञानयोगी, भक्तीयोगी, आर्त जिज्ञासू, अर्थार्थी, ज्ञानी भक्त, आचार्य, स्वामीभक्त, योगारूढ, ध्यानयोगी, योद्धे, शासनकर्ते, कवी, लेखक, तत्त्वज्ञानी अशा सहस्रो व्यक्तींनी प्रत्येक शतकात जन्म घेऊन वैदिक संस्कृतीची ध्वजा उंचावलेली दिसते. ते सर्व महात्मे परमेश्वराच्या तेजस्वी विभूतीच होत ! निर्गुण ईश्वराचे हे सर्व सज्जन सगुण रूपच जणू अवतरले ! अशा महामानवांनी भेदाभेद मिटवून कर्मकांड, भक्तीकांड आणि ज्ञानकांड यांचे यज्ञ जगभर प्रज्वलित ठेवले. ईश्वराची प्रतिष्ठापना पुन्हा पुन्हा करून धर्माचा विवेकदीप तेजाळत ठेवला.
६. महर्षि वेदव्यास यांनी धर्मग्रंथांच्या माध्यमातून आजही मार्गदर्शन करणे
‘आम्ही वैकुंठवासी । आलो याचि कारणासि ।’ असे या सर्व गुरुवर्यांच्या वतीने संत तुकाराम महाराज म्हणतात. गुरुपदाला पोचलेल्या या सर्वांनी भारतभूमीला विश्वगुरुपदावर नेऊन ठेवले. या गुरूंनी भारताला कर्मभूमी आणि देवभूमी म्हणून गौरवले. जग भारताला विश्वगुरु मानते, ते या संतपरंपरेमुळेच ! या सर्व गुरु परंपरेने विश्वामध्ये देव, देश आणि धर्म टिकवला अन् वाढवला. व्यासपौर्णिमेला ‘गुरुपौर्णिमा’ म्हणून व्यासांची पूजा होते. वेदव्यासांनी वेद, उपनिषदे, ब्रह्मसूत्रे, पुराणे, श्रीमद्भगवद्गीता, महाभारत, श्रीमद्भागवत यांच्या माध्यमातून आपल्याला सनातन वैदिक संस्कृतीचे ज्ञानभांडार दिले.
महर्षि वेदव्यास हे दीपस्तंभाप्रमाणे आजही मार्गदर्शन करतात. त्या अर्थाने विश्वगुरुपदाचा मान त्यांना प्रथम मिळतो. ‘व्यासोच्छिष्टं जगत्सर्वम् ।’ म्हणजे जगात अध्यात्म आणि तत्त्वज्ञान यांविषयी जे काही बोलले जाते, लिहिले जाते, ते सर्व व्यासांनी आधीच सांगून ठेवलेले असते. या उक्तीने श्री व्यासांच्या प्रतिभेचा गौरव केला जातो. त्यांनी मानवी जीवनातील सर्व रस आणि रंग यांची वाङ्मयीन उधळण करून सर्वांचे जीवन समृद्ध केले. त्यांची पदे पहात पहातच आजपर्यंतचे संत देवत्वाकडे जाऊ शकले, हे सत्य आहे.
अचतुर्वदनो ब्रह्मा द्विबाहुरपरो हरि: ।
अभाललोचन: शम्भुः भगवान् बादरायण: ॥
अर्थ : भगवान वेदव्यास चार मुखे नसतांनाही ब्रह्मदेवस्वरूप आहेत. दोन बाहू धारण केलेले भगवान विष्णु आहेत आणि ललाटी तृतीय नेत्र नसूनही शिवरूप आहेत.
७. विश्वगुरु व्यासप्रणित वैश्विक शांती आणि समन्वय यांच्या भूमिकेमुळे अमेरिकेत स्वामी विवेकानंदांचा अभूतपूर्व गौरव होणे
जगात समन्वय, शांती आणि परस्पर प्रेम वाढावे, तसेच परस्परांमध्ये वेगळ्या विचारांची मतभिन्नता न रहाता त्यांच्यामध्ये ‘एकं सत् विप्रा बहुधा वदन्ति ।’ (ऋग्वेद, मण्डल १, सूक्त १६४, ऋचा ४६) म्हणजे ‘जे वस्तुतः एकच आहे, तरी ज्ञानी त्याला पुष्कळ प्रकारची नावे देतात.’ या न्यायाने वैश्विक सत्यनारायणाचे सर्व मंगलकारी, कल्याणकारी अन् लोकमंगलवर्धक सामगान गायले जावे, ही आपली भारतीय परंपरा आहे. त्यामुळेच भारतीय विचारांचा जगाच्या व्यासपिठावर कायमच गौरव करण्यात आला आहे. पारतंत्र्याच्या काळातही दरिद्री म्हणून हिणवल्या गेलेल्या भारत देशातून अमेरिकेत गेलेल्या स्वामी विवेकानंद यांचा अभूतपूर्व गौरव होतो, तो त्यांच्या याच विश्वगुरु व्यासप्रणित वैश्विक शांती आणि समन्वय यांच्या भूमिकेमुळे !
८. भयंकर रक्तरंजित हिंसाचाराने अपवित्र झालेल्या धरतीवर पुन्हा मानवतेचा अंकुर फुलवण्यासाठी जगद्गुरु महर्षि व्यास यांनी ‘श्रीमद्भागवत’ ग्रंथ रचून विश्वशांतीचे महत्त्व विषद करणे
जेव्हा प्रगत देश आधुनिक शस्त्रास्त्रांच्या स्पर्धेमागे लागून विश्वयुद्धाची किंवा अणूयुद्धाची सतत दर्पोक्ती करत असतात, तेव्हा मात्र भारत विश्वशांतीचा ‘वसुधैव कुटुम्बकम् ।’ म्हणजे ‘संपूर्ण पृथ्वी हेच कुटुंब आहे’, हा विश्वकल्याणाचा मंत्र वैश्विक व्यासपिठावर सतत मांडत असतो. अशा वेळी बहुतेक देश किंवा बरेचसे भारतीयही भारताला पळपुटे वा दुबळे समजून भारताच्या चेतावणीवजा शांतीमंत्राकडे दुर्लक्ष करतात, ते अज्ञानामुळे ! जगाने जे अर्वाचीन महायुद्धांमध्ये पाहिले नसेल, त्याहून दाहक अनुभव महाभारत युद्धामध्ये भारताने सहस्रो वर्षांपूर्वी अनुभवले आहेत. त्यापूर्वीही राक्षसांचा आतंकवाद येथील ज्ञानमार्गी देवनिष्ठ साधू समाजाने रामायणकाळी अनुभवला आहे. त्याहीपूर्वी हिरण्यकश्यपूचा आतंकवादही या भूमीने पाहिला आहे. त्या आतंकवादी, धर्मविरोधी, तामसी आणि आसुरी आतंकवाद्यांचा बीमोड करण्यासाठी भारताने लाखो वर्षांपासून बलीदान दिले आहे. तरीही द्वापरयुगात महाभारत युद्धाची ठिणगी पडलीच. त्यातून वैश्विक नरसंहार झाला. संस्कृतीची वस्त्रे भर राजसभेत खेचली गेली. झोपलेल्या पांडवपुत्रांची मुंडकी भेकडपणे धडावेगळी झाली. अधर्म शिगेला पोचला. ते जणू अलीकडेच घडले कि काय ? इतके आजही भयावह वाटते.
महाभारतामध्ये १८ अक्षौहिणी सैन्य १८ दिवसांमध्ये मारले गेले. महाभारतातील त्या सर्व ज्ञात आणि अज्ञात योद्ध्यांच्या वीरमरणाच्या दुःखाच्या जखमा भरेपर्यंत यादव वंशियांमध्ये यादवी माजून लक्षावधी यादव मेले, तसेच परागंदा झाले. त्या पाठोपाठ श्रीकृष्णाच्या अवताराची समाप्ती झाली. कालयवनाचे भारतावर आक्रमण होऊन अजेय अर्जुनालाही पराजय पहावा लागला. कलियुगाचा प्रारंभ झाला. हा सर्व भयंकर रक्तरंजित हिंसाचार आणि दिव्य अस्त्रे यांचा आगडोंब यांमधून पुन्हा मानवतेचा अंकुर फुलवण्यासाठी जगद्गुरु महर्षि व्यास यांनी ‘श्रीमद्भागवत’ ग्रंथ रचून श्रीकृष्णांच्या पूर्णावतारी आदर्श जीवनाच्या अनुषंगाने विश्वशांतीचे गीत गायले. त्यांनी भागवत ग्रंथातील श्लोकांच्या पवित्र जलाने रक्त, मांस आणि अश्रू यांनी भिजलेली भारतभूमी अन् पृथ्वी स्वच्छ धुवून टाकली. विश्वाला परमसुख आणि ईश्वरी सत्तेची जाणीव करून देत शांतीचा उद्घोष केला. तसेच सहिष्णु भागवत धर्माची गुढी उभारली. समानता, सहिष्णुता आणि समरसता याचे प्रतीक असलेले गुरुतत्त्व जगाला दिले. म्हणूनच भारताने जगाला दिलेली शांती आणि प्रेमाची वैश्विक हाक विश्वगुरुपदाला शोभणारी असते.
९. विश्वगुरु व्यासांच्या नावावरूनच ‘व्यासपीठ’ हे नाव पडणे
भारताने त्याच व्यासप्रणित विशाल मानवतेचा प्रत्यय (पाश्चात्त्य कालगणनेनुसार) गेल्या २ सहस्र वर्षांत जगाला दिला. सर्व उपासनापद्धतींच्या परकियांनाही प्रेमाने भारतात सामावून घेतले. आज भारतामध्ये लाखो मंदिरांच्या दीपमाळांसमवेतच सर्व उपासनापद्धतींची प्रार्थनास्थळे सुरक्षित आहेत. त्याच समवेतच गेल्या २ सहस्र वर्षांत जगाच्या कानाकोपर्यांत हिंदु धर्माची तत्त्वे अनामिक अज्ञात लाखो प्रवासी भारतियांकडून रुजवली गेली. त्यामुळेच आजही भारत हे विश्वरूपी विस्तारित कुटुंबाचे वैश्विक देवघर म्हणून सन्मानित केले जाते. भारत हे शांतीचे व्यासपीठ आहे. विश्वगुरु व्यासांच्या नावावरूनच ‘व्यासपीठ’ हे नाव पडले. ‘सत्यं ज्ञानमनन्तं ब्रह्म ।’ (तैत्तिरीयोपनिषद्, ब्रह्मवल्ली, अनुवाक १) म्हणजे ‘ब्रह्म हे सत्य, ज्ञानरूप आणि अनंत आहे.’ हेच कुठल्याही विषयात व्यासपिठावरून बोलावे, हा वैश्विक संकेत आहे.
१०. संकटाच्या वेळी भारताचे विश्व गुरुत्वाकर्षण जगाला नैतिकतेच्या धाग्याने बांधून ठेवेल !
धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिं ।
सत्सङ्गाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिम् ।
भावशक्तिं चाखिलानन्दमूर्ते ।
घोरकष्टाद् उद्धरास्मान् नमस्ते ॥
– घोर कष्टोद्धारण स्तोत्र, श्लोक ५
अर्थ : हे आनंदमूर्ती गुरुमाऊली, आपल्याला वंदन असो. आपण आम्हाला धर्माविषयी प्रेम, सन्मती, भक्ती, सत्संग, सुखोपभोग, मुक्ती, परमेश्वराविषयी भाव आणि शक्ती प्रदान करा अन् सर्व कष्ट दूर करून आमचा उद्धार करा !
प.प. वासुदेवानंद सरस्वती महाराजांचे श्री दत्तगुरूंकडे केलेले मागणे लोकमंगलवर्धक ठरावे. सहस्रो वर्षांपासूनची सत्तापिपासा, आतंकवाद, अधर्म, हिंसाचार, सत्तासंघर्ष आणि शस्त्र स्पर्धा यांतून मानवता अन् सत्धर्म यांचा र्हास होत आहे. अणूयुद्धाची गडद छाया
जगाला घाबरवत आहे. अशा वेळी भारताचे विश्व गुरुत्वाकर्षण जगाला नैतिकतेच्या धाग्याने बांधून ठेवेल. संत ज्ञानेश्वर महाराजांचे पसायदान विश्वाला शांतीरसाने न्हाऊ घालून पुन्हा स्वधर्माच्या पाळण्यात झोके देऊन सुखानुभव देईल.
– श्री. विवेक सिन्नरकर, वास्तूविशारद, कोथरूड, पुणे.