पावसाळ्यातील सर्दी, खोकला, ताप, तसेच कोरोना यांमध्ये उपयुक्त घरगुती औषधे

औषधे स्वतःच्या मनाने न घेता वैद्यांच्या मार्गदर्शनानुसारच घ्यायला हवीत; परंतु काही वेळा वैद्यांकडे लगेच जाता येण्यासारखी स्थिती नसते. काही वेळा थोडेफार औषधोपचार केल्यावर वैद्यांकडे जाण्याची वेळच येत नाही. ११ जुलै २०२२ या दिवशीच्या लेखात आपण लक्षणांनुसार तयार आयुर्वेदाची औषधे पाहिली.

१. कफयुक्त खोकला

खोकल्यातून कफ पडत असल्यास अडुळशाचा रस मधातून घ्यावा. अडुळशाची २ ते ४ पाने धुऊन तव्यावर किंचित गरम करावीत. नंतर ती खलबत्त्यात कुटून किंवा मिक्सरमध्ये वाटून आवश्यकता असल्यास थोडे पाणी घालून त्यांचा रस काढावा. अडुळशाची पाने गरम न करता कुटली, तर त्यांतून रस येत नाही. एका वेळेस पाव वाटी रस १ चमचा मध घालून प्यावा. अडुळशामुळे कफ सहजपणे सुटण्यास साहाय्य होते. अडुळशाचा मुख्य गुण रक्तातील वाढलेले पित्त न्यून करण्यासाठी होतो. त्यामुळे नाक, गुद किंवा योनीमार्गातून रक्तस्राव होणे, अंगात उष्णता वाटणे, पुरळ उठणे या लक्षणांसाठीही अडुळसा उपयुक्त आहे.

वैद्य मेघराज पराडकर

२. कोरडा खोकला

काही वेळा खोकल्यातून कफ न पडता केवळ कोरडी ढास लागते. पुढील सोप्या उपायाने कोरडा खोकला तात्काळ थांबतो. १ वाटीभर गोडेतेलात थोडी मोहरी, जिरे, लवंग, मिरी यांसारखे उपलब्ध मसाल्याचे पदार्थ घालून तेल गरम करून घ्यावे. असे केल्याने या मसाल्यांचा अंश तेलात उतरेल आणि तेलातील कच्चेपणा निघून जाईल. नंतर हे तेल गाळून थंड झाल्यावर बाटलीत भरून ठेवावे. कोरडा खोकला येतो, तेव्हा अर्धी वाटी गरम पाणी घेऊन त्यात यातील २ चमचे तेल घ्यावे आणि हे कोमट असतांना प्यावे. वर पुन्हा थोडे गरम पाणी प्यावे. हा उपाय केल्यावर घशाला आतून शेक मिळून तात्काळ आराम मिळतो आणि श्वसनमार्गातील वाताचे शमन होऊन कोरडी ढास थांबते.

३. घशात कफ येणे

जेवणावर विड्याचे पान खावे.

४. सर्दी, खोकला आणि ताप येऊ नये; म्हणून किंवा आल्यास लवकर बरा होण्यासाठी

तुळस, गवती चहा, गुळवेल आणि पुनर्नवा यांचा काढा घ्यावा. यातील सर्व घटक न मिळाल्यास मिळतील तेवढे घटक घालून काढा बनवावा. २ ते ४ तुळशीची पाने, एखादे गवती चहाचे पान, वीतभर लांबीचे गुळवेलीचे खोड (ठेचून), वीतभर लांबीचे पुनर्नव्याचे खोड (पानांसहित) २ पेले पाण्यात उकळून १ पेला काढा करावा. अर्धा पेला काढा सकाळी आणि अर्धा पेला काढा सायंकाळी गरम गरम प्यावा. काढ्यात आवश्यकतेनुसार साखर किंवा गूळ घातल्यास चालतो.

५. बद्धकोष्ठता

ताप असतांना बद्धकोष्ठता असेल, तर जेवणापूर्वी अर्धा चमचा मेथीदाणे तोंडात टाकून कोमट पाण्यासह गिळावेत. काहींना मेथीदाणे खाल्ल्याने गुदद्वारी जळजळ किंवा वेदना होणे असे त्रास होतात. अशांनी मेथीदाण्यांऐवजी तूपमिरी (सब्जाचे बी) किंवा आहळीव (हळीव) गिळावेत.

६. आजारातून बरे झाल्यावर आलेला थकवा

सकाळी आणि सायंकाळी गुळवेलीचा काढा तूप घालून घ्यावा. वीतभर गुळवेल ठेचून २ पेले पाण्यात उकळून त्याचा १ पेला काढा करावा. अर्धा पेला काढा सकाळी आणि अर्धा पेला सायंकाळी घ्यावा. काढा शक्यतो गरम किंवा कोमट घ्यावा. प्रत्येक वेळी काढ्यामध्ये १ चमचा तूप घालावे. (या लेखात दिलेल्या औषधी वनस्पती घरोघरी लावण्यास सांगितलेल्या २७ औषधी वनस्पतींपैकी आहेत. या वनस्पती ओळखता येत नसल्यास जाणकारांकडून निश्चिती करून मगच वापराव्यात. अपसमजाने चुकीची वनस्पती वापरल्याने हानी होऊ शकते.)

येथे ‘प्राथमिक उपचार’ म्हणून काही घरगुती आयुर्वेदाची औषधे दिली आहेत. एखाद्या लक्षणासाठी दोन्हीपैकी कोणत्याही एका प्रकारचे औषध घेतल्यास चालते. दोन्ही प्रकारची औषधे घेण्याची आवश्यकता नाही. औषधे घेऊन बरे न वाटल्यास रोग अंगावर न काढता स्थानिक वैद्यांना भेटावे.

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.७.२०२२)