ईदच्या दिवशी दुर्गाडी गडावर आरतीसाठी प्रवेश नाकारल्याने हिंदू आणि शिवसेना यांच्याकडून निषेध !
|
ठाणे, १२ जुलै (वार्ता.) – कल्याण येथील दुर्गाडी गडावर देवीचे मंदिर आहे. त्याच्या शेजारी मुसलमानांनी त्यांचे प्रार्थनास्थळ असल्याचा दावा केला असून हा वाद न्यायप्रविष्ट आहे. बकरी ईदच्या निमित्ताने दोन्ही समाजांमध्ये वाद होऊ नयेत; म्हणून येथे ईदनिमित्त नमाजपठण होत असतांना आरती आणि घंटानाद करण्यासाठी हिंदूंना प्रवेशबंदी केली जाते. याचा निषेध म्हणून वर्ष १९८६ पासून येथे शिवसेनेच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात येते. यंदाही शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी लालचौकी परिसरात घोषणाबाजी अन् आरती करत घंटानाद आंदोलन केले. त्या वेळी कोणताही अनूचित प्रकार घडू नये; म्हणून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
(सौजन्य : Zee 24 Taas)
दुर्गाडी गडावर नमाजपठणाच्या वेळी घातलेली बंदी झुगारण्यासाठी शिवसेनेचे तत्कालीन ठाणे जिल्हाप्रमुख दिवंगत आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली वर्ष १९८६ मध्ये हे आंदोलन चालू झाले होते. ते अजूनही चालू आहे.
सरकार हिंदुत्ववादी आहे तर, दुर्गाडी देवीचे मंदिर उघडायला हवे होते – विजय साळवी https://t.co/9CxmSixWnB
— LoksattaLive (@LoksattaLive) July 10, 2022
शिवसेनेचे कल्याण-डोंबिवली महानगरप्रमुख विजय साळवी यांच्या नेतृत्वाखाली शिवसनेचे शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी दुर्गाडीच्या दिशेने गेले; मात्र लालचौकी येथे पोलिसांकडून त्यांना अडवण्यात आले. त्या वेळी शिवसैनिकांनी प्रचंड घोषणा दिल्या. या वेळी आरती करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी आंदोलक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना कह्यात घेतले.