जलसिंचन मंडळात बनावट वैद्यकीय देयके सादर करणारे ‘रॅकेट’ !
सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप
सातारा, १० जुलै (वार्ता.) – येथील सिंचन मंडळातील २ कर्मचार्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांच्या खोट्या स्वाक्षर्या करून बनावट वैद्यकीय देयके कोषागार कार्यालयास सादर केल्याचे उघड झाले आहे. जिल्हा रुग्णालय आणि सातारा सिंचन मंडळात बनावट वैद्यकीय देयके सिद्ध करून सरकारची फसवणूक करणारे मोठे ‘रॅकेट’ कार्यरत आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. (याविषयी प्रशासन चौकशी करून सत्य जनतेसमोर आणेल का ? – संपादक)
कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या पाठबंधारे कार्यालयात सातारा सिंचन मंडळ कार्यरत आहे. या कार्यालयाकडून वैद्यकीय परिपूर्तीसाठीची देयके कोषागार कार्यालयाकडे दिली जातात. कोषागार कार्यालयाला जिल्हा शल्यचिकित्सकांच्या स्वाक्षर्यांविषयी शंका आल्याने याविषयी चौकशी करण्यात आली. या वेळी स्वाक्षर्यांमधील तफावत लक्षात आली; मात्र तरीही संबंधित कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. सिंचन मंडळातील काहीजण बनावट वैद्यकीय देयकांचे ‘रॅकेट’ चालवत असल्याचे शिपायापासून वरिष्ठ अभियंत्यापर्यंत सर्वांना माहिती आहे; मात्र त्या व्यक्तींवर कारवाई झाली, तर आपल्यालाही चौकशीला सामोरे जावे लागेल, या भीतीने सिंचन मंडळ संबंधितांना पाठीशी घालत आहे. त्यामुळे बनावट वैद्यकीय देयके प्रकरणात जिल्हा रुग्णालयातील संबंधित विभागापासून सिंचन मंडळापर्यंत अभियंते आणि कर्मचारी यांचे मोठे ‘रॅकेट’ कार्यरत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा न्यायालयात जनहित याचिका प्रविष्ट करण्यात येईल, अशी चेतावणी सामाजिक कार्यकर्त्यांनी दिली आहे.