शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर यांच्यासह कोंढवा पोलिसातील ८ पोलिसांवर गुन्हा नोंद !
पुणे – शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर, माजी नगरसेवक नारायण लोणकर आणि कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगन्नाथ जानकर यांच्यासह ८ पोलीस कर्मचार्यांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. माजी आमदाराने शिवीगाळ केल्यानंतर कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार द्यायला आलेल्या तक्रारदाराला लाथाबुक्याने बेदम मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याचे आदेश पुणे सत्र न्यायालयाने दिले आहेत. (तक्रारदाराला संरक्षण न देता त्यालाच मारहाण करणार्या पोलिसांना जनतेचे सहकार्य कधीतरी लाभेल का ? – संपादक)
काही राजकीय पक्षांनी १० ऑक्टोबर २०२१ या दिवशी ‘भारत बंद’ पुकारला होता. त्याचे पडसाद पुण्यामध्येही उमटले होते. यातच पुण्यातील कोंढवा भागामध्ये महादेव बाबर, नारायण लोणकर आणि काही राजकीय पदाधिकारी अवैधरित्या बाळासाहेब मस्के यांच्या बहिणीच्या दुकानामध्ये घुसून दुकान बंद करण्याचा प्रयत्न करत होते. ‘मासे विक्रीचे दुकान बंद कर’ म्हणत शिवीगाळ करणार्या आमदाराच्या विरोधात तक्रारदार कोंढवा पोलीस ठाण्यात गेले असता राजकीय पुढार्यांनीच पोलीस ठाण्यात येऊन बाळासाहेब मस्के यांना शिवीगाळ केली. शिवीगाळ करणार्या राजकीय पुढार्यांना थांबवण्याऐवजी उलट पोलिसांनी तक्रारदारालाच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच तक्रारदारावरच खोटा गुन्हा नोंद केला होता. या प्रकरणात न्याय न मिळाल्याने तक्रारदाराने पुणे सत्र न्यायालयाकडे धाव घेतली होती.