भारताचे विश्व गुरुत्वाकर्षण !
१३ जुलै २०२२ या दिवशी ‘गुरुपौर्णिमा’ आहे. त्या निमित्ताने…
१. गुरुकृपेने निर्गुण ईश्वराचे दर्शन होत असल्यामुळे सर्व संतांनी गुरूंना ‘देवाहूनही श्रेष्ठ’ समजणे
अ. ध्यानमूलं गुरोर्मूर्तिः पूजामूलं गुरो: पदम् ।
मन्त्रमूलं गुरोर्वाक्यं मोक्षमूलं गुरोः कृपा ।। – गुरुगीता, श्लोक ७६
अर्थ : ध्यानाचे लक्ष्य असावे, ते केवळ गुरूंची मूर्ती ! पूजेचे सुलभ साधन, म्हणजे गुरूंची पाद्यपूजा ! श्रीगुरूंचे प्रत्येक वचन हेच साधकाने जपण्याचे पवित्र मंत्र आणि गुरूंची जन्मोजन्मी अखंड कृपा रहाणे, हाच साधकाचा मोक्षानंद !
या एका श्लोकातून भारतीय संस्कृतीतील ‘गुरु’ या महामानवाला कसे सर्वोच्च आदराने गौरवले जाते, हे लक्षात येते. ब्रह्मा, विष्णु आणि महेश या ३ शक्ती विश्वात उत्पत्ती, स्थिती अन् लय यांचे संतुलन राखतात. सत्त्व, रज आणि तम या त्रिगुणांची त्रिपुटी मानवी जीवनात समतोल राखते. हे तिन्ही गुण परस्परपूरक असतात. तसेच ब्रह्मा, विष्णु आणि महेश हेही परस्परविरोधी नाहीत. या त्रिदेवांचे ऐक्य दाखवणारे समन्वयाचे दैवत म्हणजे गुरु ! गुरु ही व्यक्ती नसून ते विश्वव्यापी तत्त्व आहे. संतांनी गुरूंना देवाहून श्रेष्ठ समजले; कारण केवळ गुरुकृपेनेच त्यांना निर्गुण देवाचे दर्शन झाले. सर्व संतांनी गुरुमहिमा गायिला आहे. ज्ञानेश्वरीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज गुरूंविषयी भरभरून लिहितात,
आ. आत्मरूप गणेशु केलिया स्मरण ।
सकळ विद्यांचें अधिकरण । तेचि वंदूं श्रीचरण । श्रीगुरूंचे ॥
– ज्ञानेश्वरी, अध्याय १३, ओवी १
अर्थ : सर्व विद्यांचे आश्रयस्थान जे आत्मरूप गणेशाचे स्मरण, तेच श्रीगुरूंचे चरण होत. त्यांना नमस्कार करू.
इ. श्रीगुरूंचे पाय । जैं हृदय गिंवसूनि ठाय ।
तैं येवढें भाग्य होय । उन्मेखासी ॥
– ज्ञानेश्वरी, अध्याय १३, ओवी ५
अर्थ : जेव्हा हृदय श्रीगुरूंचे पाय धरून रहाते, तेव्हा ज्ञानाला एवढे दैव प्राप्त होते.
ई. श्री गुरूंचे अवर्णनीयत्व वर्णन करतांना संत ज्ञानेश्वर म्हणतात…
जय जय आचार्या । समस्तसुरवर्या ।
प्रज्ञाप्रभातसूर्या । सुखोदया ॥
– ज्ञानेश्वरी, अध्याय १४, ओवी १
अर्थ : अहो, सर्व देवांमधे श्रेष्ठ (आत्मविषयक) बुद्धीरूपी प्रात:काळ करणारे सूर्य, सुखाचा उदय करणारे श्री गुरुमहाराज, आपला जयजयकार असो !
तू जयांप्रति लपसी । तया विश्व हें दाविसी ।
प्रकट तैं करिसी । आघवेंचि तूं ॥
– ज्ञानेश्वरी, अध्याय १४, ओवी ४
अर्थ : तू ज्यांना लपतोस, त्यांना हे जग दाखवतोस (म्हणजे ज्यांच्यामध्ये तुझ्यासंबंधाने अज्ञान असते, त्यांना तुझे स्वरूप न दिसता जग दिसते) आणि तू ज्यांना प्रकट होतोस, त्या वेळी त्यांना सर्व तूच करतोस. (म्हणजे ज्यांच्यामधे तुझ्या संबंधाने ज्ञान असते, त्यांना जग न दिसता सर्वत्र तूच दिसतोस.)
उ. श्री गुरूंचे पाद्यपूजन करतांना ते म्हणतात,
माझी तनु आणि प्राण । इया दोनी पाउवा लेऊं श्रीगुरुचरण ।
करूं भोगमोक्ष निंबलोण । पायां तयां ॥
– ज्ञानेश्वरी, अध्याय १५, ओवी ८
अर्थ : श्रीगुरूंच्या दोन्ही पायांत माझे शरीर आणि प्राण (स्थूलदेह आणि लिंगदेह) या दोन खडावा करून घालू अन् ऐहिक, तसेच पारत्रिक भोग आणि मोक्ष हे श्रीगुरुचरणांवरून उतारा म्हणून ओवाळून टाकू.
ऊ. श्री व्यासांना वंदन करतांना संत ज्ञानेश्वर म्हणतात…
म्हणौनि श्रीव्यासाचा हा थोरु । विश्वा जाला उपकारु ।
जे श्रीकृष्ण उक्ती आकारु । ग्रंथाचा केला ॥
– ज्ञानेश्वरी, अध्याय १८, ओवी १७०७
अर्थ : म्हणून जगावर व्यासांचा मोठा उपकार झाला की, त्यांनी श्रीकृष्णाच्या बोलण्याला ग्रंथाचा आकार दिला.
आणि तोचि हा मी आतां । श्रीव्यासाचीं पदें पाहतां पाहतां ।
आणिला श्रवणपथा । मर्हाठिया ॥
– ज्ञानेश्वरी, अध्याय १८, ओवी १७०८
अर्थ : आणि तोच हा ग्रंथ व्यासांची पदे पहाता पहाता, मी आता मराठी भाषेच्या योगाने ऐकण्याच्या मार्गाला आणला.
ए. संत ज्ञानेश्वर महाराज एका अभंगात म्हणतात,
गुरु हा संतकुळीचा राजा । गुरु हा प्राणविसांवा माझा ।
गुरुवीण देव दुजा । पाहतां नाहीं त्रिलोकीं ।।
अर्थ : सर्व संतकुळाचा राजा असल्याप्रमाणे भासणारे माझे गुरु हे माझ्या प्राणांचा विसावा आहेत. या त्रैलोक्यात श्रीगुरुंविना अन्य श्रेष्ठ दैवत नाही.
ऐ. संत ज्ञानेश्वर यांच्या नंतरच्या काळात संत एकनाथ यांना देवगिरीत गुरु जनार्दनस्वामी लाभले. तेव्हा संत एकनाथ यांचे अध्यात्म आणि लेखनकार्य यांना गती मिळाली. संत एकनाथ यांनी अनेक प्रकारे गुरुमहिमा गाऊन आपल्याला गुरुसेवेचे धडे दिले आहेत. ते पुढीलप्रमाणे…
श्रीगुरुचें नाममात्र । तेंचि आमुचें वेदशास्त्र ॥ १ ॥
श्रीगुरुंचे तीर्थ मात्र । सकळ तीर्था करी पवित्र ॥ २ ॥
श्रीगुरुंचे चरणरज । तेणें आमुचें जाहलें काज ॥ ३ ॥
श्रीगुरुंची ध्यानमुद्रा । तेंचि आमुचि योगनिद्रा ॥ ४ ॥
एका जनार्दनीं मन । श्रीगुरुचरणीं केलें लीन ॥ ५ ॥
अर्थ : श्रीगुरूंनी दिलेले नाम हेच आमच्यासाठी वेदशास्त्रासमान आहे, त्यांचे चरणतीर्थ सर्व तीर्थांहून पवित्र आहे, श्रीगुरूंची चरणसेवा हेच आमचे कर्म आहे, तर त्यांची ध्यानमुद्रा ही योगनिद्रेसमान आहे. संत एकनाथ महाराज म्हणतात, ‘‘अशा गुरुचरणी मी माझे मन अर्पण केले आहे.’’
ओ. ‘गुरु हाच ईश्वर आहे’, हे बिंबवतांना श्री एकनाथ म्हणतात…
गुरु परमात्मा परेशु । ऐसा ज्याच्या दृढ विश्वासु ॥
देव तयाचा अंकिला । स्वये संचला त्याचे घरा ॥
एका जनार्दनी गुरुदेव । येथे नाहीं बा संशय ॥
अर्थ : संत एकनाथ महाराज म्हणतात, ‘‘गुरु हेच परमात्मा, परमेश्वर आहेत’, असा ज्याला अत्यंत दृढ विश्वास आहे, त्यांच्या घरी भगवंत स्वतः सेवक बनून रहातात, यात जराही संशय नाही.’’
औ. ‘माता-पित्यापेक्षाही परमार्थात गुरूंचे स्थान सर्वोच्च आहे’, हे सांगताना संत एकनाथ म्हणतात…
साधावया परमार्था । साह्य नव्हेती माता-पिता ।।
साह्य नव्हेती व्याही जावुई । आपणा आपण साह्य पाही ।।
साह्य सद्गुरु समर्थ । तेचि करिती स्वहित ।।
एका जनार्दनी शरण । नोहे एकपणा वाचून ।।
अर्थ : संत एकनाथ महाराज म्हणतात, ‘‘परमार्थ साधण्यासाठी आई-वडील, व्याही, जावई यांपैकी कुणाचेही साहाय्य होत नाही. आपणच स्वतःच स्वतःचे साहाय्यकारी असतो. परमार्थात सद्गुरुच समर्थपणे साहाय्य करू शकतात. तेच आपले हित करू शकतात. सद्गुरुचरणी एकनिष्ठेने शरणागत होण्यानेच परमार्थ साधणे शक्य आहे.’’
त्यांच्या पुढील पिढीतील राष्ट्रीय संत समर्थ रामदासस्वामी ‘मनाचे श्लोका’मध्ये म्हणतात, ‘‘परमात्म्याचे दर्शन केवळ गुरुकृपेने होऊ शकते….’’
अं. तिन्ही लोक जेथूनि निर्माण झाले ।
तया देवरायासि कोणी न बोले ।
जयी थोरला देव तो चोरलासे ।
गुरुवीण तो सर्वथाही न दीसे ॥
– मनाचे श्लोक, श्लोक १७९
अर्थ : तिन्ही लोकांची उत्पत्ती ज्याच्यापासून झाली, त्या देवाचे स्वरूप जाणून घेण्याची कुणाचीच इच्छा नसते. जोवर गुरुकृपा तुमच्यावर होत नाही, तोवर त्या देवाचे दर्शन सर्वथा अशक्य आहे.
२. गुरु कसे असावेत ?
समर्थ म्हणतात की, गुरु मुक्तीदाता हवा. गुरु समाजात असलेल्या भोंदूगिरीपासून आपल्याला सावध करतात आणि सद्गुरूंची खरी खूणही सांगतात…
गुरु पाहतां पाहतां लक्ष कोटी ।
बहूसाल मंत्रावळी शक्ति मोठी ।
मनी कामना चेटके धातमाता।
जनी व्यर्थ रे तो नव्हे मुक्तिदाता ॥
– मनाचे श्लोक, श्लोक १८०
अर्थ : स्वतःला गुरु म्हणवणारे समाजात लाखोंच्या संख्येने मिळतील, त्यांच्याजवळ मोठी मंत्रसिद्धीसुद्धा असेल, सकामातील इच्छा पूर्ण करणारे ते जादूटोणाही करतात; परंतु ते सर्व भोंदू असून खरी मुक्ती देऊ शकत नाहीत.
नव्हे चेटकी चाळकु द्रव्यभोंदू ।
नव्हे निंदकु मत्सरु भक्तिमंदू ।
नव्हे उन्मतू वेसनी संगबाधू ।
जनीं ज्ञानिया तोचि साधू अगाधू ॥
– मनाचे श्लोक, श्लोक १८१
अर्थ : काळी जादू, लबाडी, पैशांचा लोभ करणारा, इतरांची निंदा, मत्सर करणारा, भक्तीभाव नसलेला, उर्मट, व्यसनी अशा भोंदू महंतांचा संग साधकासाठी बाधक आहे. त्यामुळे त्यांच्या मागे न लागता नेहमी खर्या ज्ञानी सत्पुरुषांचेच मार्गदर्शन घ्यावे.
(क्रमश:)
– श्री. विवेक सिन्नरकर, वास्तूविशारद, कोथरूड, पुणे.
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/595940.html