कोल्हापूर, सांगलीतील पुराचे पाणी मराठवाड्याकडे वळवण्यावर चर्चा !
आराखडा सिद्ध करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात सध्या चालू असलेल्या, तसेच इतर प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. या बैठकीत कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांतील महापूर, तसेच अतीवृष्टीचे पाणी मराठवाड्याकडे वळवण्यासाठीच्या योजनेवर चर्चा करण्यात आली. या योजनेचा आराखडा सिद्ध करावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना दिली.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, ‘‘मागील काळात सांगली आणि कोल्हापूर येथे पूर आला होता. प्रत्येक वर्षी असाच पूर आला, तर काय करायचे यावर आपण अभ्यास केला होता. जागतिक बँकेच्या साहाय्याने आपण एक संमती घेतली होती, यात बंधारे आणि ‘टनेल सिस्टीम’च्या माध्यमातून पाणी मराठवाड्याकडे वळवता येईल का ? यावर अभ्यास करण्यात आला. वाहून जाणारे जे पाणी आहे, ते गोदावरीच्या खोर्यात नेण्याच्या संदर्भात याआधी कार्यवाही केली होती. ती कार्यवाही पुन्हा चालू करण्याविषयी आम्ही आढावा घेतला.’’