मृत्यूशी झुंज देतांना अखेरच्या श्वासापर्यंत परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे स्मरण करणारी नांदगाव, ता. चिपळूण (जि. रत्नागिरी) येथील कै. (कु.) संजीवनी सुशांत शेलार (वय २७ वर्षे) !
‘माझी मामेबहीण कु. संजीवनी सुशांत शेलार (वय २७ वर्षे) हिचे २१.७.२०२१ या दिवशी क्षयरोगाचा (टी.बी.चा) संसर्ग मेंदूपर्यंत गेल्याने निधन झाले. तिच्यावर वर्षभर ३ – ४ वेगवेगळ्या वैद्यांनी उपचार केले; पण कोणत्याही वैद्याकडून प्रथम टप्प्याला तिच्या व्याधीचे निदान होऊ शकले नाही. तिला त्रास असह्य झाल्यावर मुंबई येथील शुश्रुषा रुग्णालयात भरती केले. तेथील वैद्यांनी तिच्या सर्व चाचण्यांचे अहवाल पाहिल्यावर तिच्या व्याधीची तीव्रता त्यांच्या लक्षात आली; पण तोपर्यंत विलंब झाला होता. त्यानंतर १० ते १२ दिवसांतच तिचे निधन झाले. क्षयरोगासारख्या व्याधीचे निदान सर्वसाधारण वैद्यांनाही करता येते; परंतु तिच्यावर ३ – ४ चांगल्या वैद्यांचे उपचार चालू असूनही तिच्या प्रारब्धाचाच भाग म्हणून कि काय, ते तिला वाचवू शकले नाहीत.
१. साधनेला आरंभ
आमच्या बालपणापासूनच आमच्या वाडीत सत्संग चालू आहे. तेव्हापासून संजीवनी साधना करत होती. तिने सत्संग घेणे, दैनिक ‘सनातन प्रभात’ आणि सात्त्विक उत्पादने वितरण करणे, गुरुपौर्णिमा अन् हिंदु राष्ट्र-जागृती सभा, या वेळी प्रसार आणि सूत्रसंचालन करणे, अशा वेगवेगळ्या सेवा केल्या.
२. साधनेची तळमळ
अ. तिचे शिक्षण पूर्ण झाल्यावर ती नोकरीनिमित्त मुंबईला गेली. तिथेही ती साधकांच्या संपर्कात होती. ती दैनिक ‘सनातन प्रभात’ आणि सनातनची सात्त्विक उत्पादने घेणे, सत्संगाला जाणे, भावसत्संग ऐकणे, असे करत होती.
आ. दळणवळण बंदीच्या काळात ती वर्षभर गावी घरी राहून कार्यालयीन काम करत होती. त्या वर्षभरात माझा तिच्याशी भ्रमणभाषवरून संपर्क होत होता. ती साधकांनी आणि मी सांगितल्याप्रमाणे काही साधनेचे प्रयत्न मनापासून करायची.
इ. तिची साधनेची ओढ वाढल्याचे लक्षात येत होते. तिने तिच्या कुटुंबियांची साधना होण्याच्या दृष्टीने चांगले प्रयत्न केले. तिने घरी नियमितपणे वास्तूशुद्धी आणि नामजप करणे चालू केले. त्यामुळे घरातील वातावरणात पालट होत होते.
३. मृत्यूची पूर्वसूचना मिळाल्याप्रमाणे कृती करणे
अ. ‘तिची मायेतील आसक्ती अल्प झाली होती. ती अंतर्मुख आणि शांत झाली होती’, असे मला जाणवत होते.
आ. मुंबई येथे उपचारांसाठी जाण्यापूर्वी तिने कार्यालयाकडून मिळालेला भ्रमणसंगणक आणि कार्यालयाशी संबंधित सर्व वस्तू व्यवस्थित बांधून ठेवल्या होत्या. जणूकाही ‘मी परत येणार नाही’, याची तिला जाणीव झाली होती.
या गोष्टींवरून ‘तिला मृत्यूची पूर्वसूचना मिळाली असावी’, असे मला वाटले.
४. मृत्यूपूर्वी अखंड गुरुस्मरण करणे
तिच्यावर वैद्यकीय उपचार चालू झाल्यापासून तिला संतांनी दिलेले वेगवेगळे उपाय करणेही चालू होते. घरातील व्यक्तीही तिच्यासाठी नामजप करत होत्या. तीही प.पू. भक्तराज महाराज आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सतत स्मरण करत होती. ती त्यांच्याकडे त्रासाशी लढण्यासाठी बळ मागत होती. ‘तिच्याकडून अखेरच्या श्वासापर्यंत श्री गुरूंचे स्मरण होऊ शकले’, ही गुरुदेवांचीच कृपा आहे. अखेर तिचे शरीर उपचारांना प्रतिसाद देईनासे झाले आणि तिचा मृत्यू झाला.
५. संजीवनीच्या निधनानंतर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
५ अ. मृतदेह गावी नेतांना सतत पाऊस असूनही गुरुकृपेमुळे सहज घरी पोचणे : नातेवाईक तिचा मृतदेह गावाला घेऊन जातांना त्या रात्री सतत पाऊस पडत होता. तिची गाडी आणि ९ नातेवाईक सोडून अन्य सर्व नातेवाईक चिपळूणच्या पुढे गेल्यावर चिपळूणमध्ये पाणी भरले आणि नंतर आलेल्या लोकांना पुढे प्रवास करता आला नाही. ही सर्व स्थिती पहाता ‘गुरूंनीच ती काळजी घेतली’, हे माझ्या लक्षात आले.
५ आ. स्थुलातून आणि सूक्ष्मातून आध्यात्मिक उपाय केल्यामुळे लिंगदेहाला होणारा अनिष्ट शक्तींचा त्रास नष्ट होऊन वातावरणातील दाब न्यून होणे
१. तिचा इतक्या अल्प वयात मृत्यू होणे, हे सर्वांनाच धक्कादायक होते. परात्पर गुरु डॉक्टरांनी सूक्ष्मातून सुचवल्याप्रमाणे तिच्या अंत्यसंस्कार विधीतील अनिष्ट शक्तींचे अडथळे दूर होण्यासाठी मी तिच्या तिरडीभोवती मानस मंडल घातले.
२. श्रीगुरूंना प्रार्थना करून मी मानसरित्या स्मशानभूमीत गेले. तिथे त्रास देण्यासाठी जे लिंगदेह आले होते, त्यांना मी सांगितले, ‘ती परात्पर गुरु डॉक्टरांची साधिका आहे. तिला त्रास देण्याचा प्रयत्न केलात, तर खबरदार ! प.पू. डॉक्टरांना तुम्ही ओळखून आहात.’ मी मोठ्याने जयघोष करत तिथे गोमूत्राने शुद्धी केली.
३. मी तिथे सूक्ष्मातून सनातनच्या नामपट्ट्या आणि दत्ताचे चित्र लावले. त्या वेळी ‘तेथील वातावरण शुद्ध झाले’, असे मला जाणवले.
४. मी दादाला विधीच्या वेळी अखंड सात्त्विक उदबत्ती लावून ठेवायला सांगितली. या सर्व उपायांमुळे आणि लहान आवाजात दत्ताचा नामजप लावून ठेवल्याने वातावरणातील दाब न्यून झाला.
६. कै. संजीवनीच्या कुटुंबियांना भेटल्यावर ते स्थिर वाटणे आणि त्यांनी अनेक अनुभूती सांगणे
अ. संजीवनीच्या मृत्यूनंतर ५ मासांनी मी मामाच्या घरी गेले. तेव्हा मामी मला मुलीच्या संदर्भात आलेल्या अनुभूती सांगत होती. आम्ही बोलत असतांना ‘सत्संग चालू आहे’, असे मला वाटत होते.
आ. मामीने सांगितले, ‘‘एकदा मला स्वप्नात दिसले, ‘संजीवनी नऊवारी साडी नेसली आहे. ती आनंदाने ‘मी श्रीकृष्णाकडे जाते. तो माझी वाट पहात आहे. मी लवकर जाते, नाहीतर ताई (मी, सौ. स्वाती शिंदे) रागवेल’, असे सांगून गेली.’ त्यानंतर ती कुणाच्या स्वप्नात आली नाही. मामीने सांगितले, ‘‘तिला पुढची गती चांगली मिळाली.’’ मामीने ही अनुभूती सांगितल्यावर मला पुढील प्रसंग आठवला.
७. पितृपक्ष चालू असतांना परात्पर गुरु डॉक्टरांच्या सत्संगाच्या वेळी ‘साधकांचे पूर्वज सूक्ष्मातून उपस्थित आहेत आणि तेथे सूक्ष्मातून संजीवनीचा लिंगदेह आल्याचे दिसून तो परात्पर गुरु डॉक्टरांच्या दर्शनाने मुक्त झाला आहे’, असे जाणवणे
एकदा परात्पर गुरु डॉक्टरांचा साधकांसाठी सत्संग होता. तेव्हा पितृपक्ष होता. गुरुदेव (परात्पर गुरु डॉक्टर) सत्संगातील साधकांना म्हणाले, ‘‘आज सत्संगासाठी सूक्ष्मातून कोण आले आहे, ते पहा.’’ तेव्हा सर्वांनी सांगितले, ‘‘सत्संगात उपस्थित साधकांचे पूर्वज गुरुदेवांच्या दर्शनासाठी, म्हणजेच मुक्तीसाठी तिथे आले आहेत.’’ तेव्हा मला जाणवले, ‘माझे अन्य कोणी पूर्वज आले नाहीत; पण संजीवनीचा लिंगदेह आला आहे. त्याने गुरुदेवांच्या चरणांजवळ डोके टेकवून नमस्कार केला आणि गुरुदेवांनी त्याला (संजीवनीच्या लिंगदेहाला) मुक्ती दिली.’
‘हे दृश्य मी उघड्या डोळ्यांनी पहात आहे’, असे मला वाटत होते. संजीवनी परात्पर गुरु डॉक्टरांना कधी भेटली नव्हती; पण तिची त्यांच्यावर श्रद्धा होती. तिला त्यांना भेटण्याची इच्छा होती. ‘गुरुदेवांनी मृत्यूनंतर तिला दर्शन देऊन मुक्त केले’, असे मला जाणवले. हे पहातांना माझी पुष्कळ भावजागृती झाली.
८. कृतज्ञता
साधक कितीही दूर असला, तरीही गुरुदेवांची प्रीती त्या प्रत्येक जिवापर्यंत पोचून त्या जिवाचा उद्धार निश्चितपणे होतोच. याची अनुभूती मला या सर्व प्रसंगांतून घेता आली. एवढ्या मोठ्या प्रसंगात ‘गुरुदेवांनी ते क्षणोक्षणी समवेत आहेत’, याची मला अनुभूती दिली. त्यांनी साधनेचे महत्त्व मनावर बिंबवले. ‘साधना करणार्या जिवाचीच नव्हे, तर त्याच्या कुटुंबाची काळजी ते कशी घेतात ?’, हे अनुभवता आल्याने माझी गुरुदेवांप्रती श्रद्धा वाढण्यास साहाय्य झाले. श्रीगुरूंच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. स्वाती शिंदे (आतेबहीण, आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.१.२०२२)
|