सर्व घटकांतील लोकांच्या जीवनात सुख आणि समृद्धी येण्यासाठी सर्व अडचणी दूर कर ! – मुख्यमंत्र्यांचे श्री विठ्ठलाच्या चरणी साकडे
आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची सपत्नीक महापूजा
पंढरपूर (जिल्हा सोलापूर), १० जुलै (वार्ता.) – आषाढी एकादशीच्या वारीला शेकडो वर्षांची परंपरा आहे. अनेक वर्षांपासून शिस्तबद्ध पद्धतीने दिंड्या निघतात. त्यामुळे सकारात्मक वातावरण तयार होते. अशा वारीत सहभागी होणार्या सर्व वारकर्यांना सोयी-सुविधा देण्यात राज्यशासन कुठेही कमी पडणार नसल्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. समाजातील सर्व घटकांतील लोकांच्या जीवनात सुख आणि समृद्धी येण्यासाठी राज्यसमोरील कोरोनासह सर्व अडचणी दूर करण्याचे साकडे मुख्यमंत्र्यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी घातले. आषाढी एकादशीला महापूजा करण्याचा सन्मान मिळाल्याने हा दिवस जीवनातील सर्वात महत्त्वाचा दिवस असल्याचे मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले. राज्यातील १२ कोटी जनतेच्या वतीने ही शासकीय महापूजा केली असल्याचे सांगून त्यांनी राज्यातील जनतेला आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या.
१. आषाढी एकादशीनिमित्त एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी सौ. लता शिंदे यांनी बीड जिल्ह्यातील मानाचे वारकरी श्री. मुरली भगवान नवले आणि सौ. जिजाबाई मुरली नवले या दांपत्यासमवेत श्री विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा केली. महापूजेनंतर विठ्ठल मंदिर समितीच्या वतीने आयोजित मानाच्या वारकर्यांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी मुख्यमंत्र्यांचे कुटुंबीय, मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्यासह समितीचे अन्य सदस्य आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा. pic.twitter.com/0E0R0geU9k
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 10, 2022
#आषाढीवारी च्या निमित्ताने प्रदूषणकारी #प्लास्टिक चा वापर टाळूया आणि #पर्यावरण रक्षणाचा संकल्प करूया, असे आवाहन मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी #पंढरपूर येथे आयोजित 'पर्यावरणाची वारी-पंढरीच्या दारी' उपक्रमाच्या समारोपप्रसंगी केले. या स्तुत्य उपक्रमास त्यांनी शुभेच्छा दिल्या. pic.twitter.com/BwjJHZBDxi
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 10, 2022
२. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘गेले २ वर्षे कोरोनाच्या संसर्गामुळे आषाढी वारी होऊ शकली नाही. त्यामुळे या वेळी लाखो वारकरी विठू नामाचा जयघोष करत मोठ्या उत्साहाने पंढरपूर येथे चालत आलेले आहेत. या सर्व वारकर्यांना चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. शासन शेतकरी, वारकरी शेतमजूर आणि कामगार यांच्यासह राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध आहे.’’
राज्याच्या कानाकोपर्यातून १२ लाखांहून अधिक भाविक दर्शनासाठी उपस्थित !कोरोनाच्या संसर्गामुळे मागील २ वर्षे निर्बंधांमध्ये आषाढी वारी पार पडली होती; मात्र यंदा निर्बंधमुक्त वारी मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणात पार पडत आहे. वारीसाठी राज्याच्या कानाकोपर्यातून १२ लाखांहून अधिक भाविक पांडुरंगाच्या दर्शनासाठी आले आहेत. एकादशीसाठी ९ जुलै या दिवशीच मानाच्या सर्व पालख्यांचे पंढरपूर येथे आगमन झाले होते. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर आणि चंद्रभागा नदी परिसर टाळ-मृदंगाच्या गजराने दणाणून गेला आहे. चंद्रभागेचे स्नान करून लाखो भाविकांनी भक्तीरसात भिजल्याचा अनुभव घेतला. |