भारताच्या संरक्षण क्षेत्रातील निर्यातीत ५ वर्षांत ८ पटींनी वाढ
नवी देहली – संरक्षण क्षेत्रात भारताला ‘आत्मनिर्भर’ बनवण्याच्या प्रयत्नांना सातत्याने यश मिळत आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षात भारताची संरक्षण क्षेत्रातील निर्यात ही १३ सहस्र कोटी रुपयांवर पोचली. ही आकडेवारी आर्थिक वर्ष २०२०-२१ च्या तुलनेत (८ सहस्र ४३४ कोटी रुपये) ५४.१ टक्के अधिक आहे. या निर्यातीपैकी ७० टक्के निर्यात ही खासगी क्षेत्रातून, तर केवळ ३० टक्के निर्यात ही सरकारी आस्थापनांकडून करण्यात आली. गेल्या ५ वर्षांचा विचार केला, तर निर्यातीचा दर ८ पटींनी वाढला आहे.
संरक्षण उत्पादन विभागाने दिलेल्या माहितीनुसार ही निर्यात प्रामुख्याने अमेरिका, फिलीपीन्स, दक्षिण पूर्व आशियातील अन्य देश, मध्यपूर्वेतील देश, तसेच आफ्रिका खंड येथे करण्यात आली. या वर्षीच्या आरंभी भारताने फिलीपीन्सशी ‘ब्राह्मोस’ ही ‘सुपरसॉनिक’ क्षेपणास्त्रे देण्याचा २ सहस्र ७७० कोटी रुपयांचा करार केला.
‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्राचे महत्त्व
ब्रह्मोस क्षेपणास्त्र पाणबुडी, युद्धनौका आणि लढाऊ विमाने आदींवर बसवून डागले जाऊ शकते. हे क्षेपणास्त्र ध्वनीच्या गतीपेक्षा ३ पटींनी अधिक गतीमान आहे. या क्षेपणास्त्राची २९० किमीपर्यंत मारा करण्याची क्षमता आहे.