गव्हानंतर आता गव्हाच्या पिठावरही निर्यातबंदी
१२ जुलैपासून कार्यवाही होणार
नवी देहली – केंद्र सरकारने गव्हाच्या पिठाची मुक्त निर्यात करण्यावर बंदी घातली आहे. ही निर्यातबंदी १२ जुलैपासून अस्तित्वात येणार असून गव्हाच्या पिठासह मैदा, रवा आदी पदार्थांच्या निर्यातीवरही बंदी असेल. या पुढे निर्यातीसाठी केंद्र सरकारची अनुमती आवश्यक असल्याची माहिती परकीय व्यापार महासंचालनालयाने दिली.
रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक बाजारात गव्हाचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे भारताहून गव्हाची निर्यात मोठ्या प्रमाणात वाढली. परिणामी भारताला गहू अपूर्ण पडू नये, यासाठी केंद्र सरकारने १३ मे २०२२ या दिवशी गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली. याचा परिणाम असा झाला की, गव्हाच्या पिठाच्या निर्यातीमध्ये अनेक पटींनी वाढ झाली. आतापर्यंत भारतातून प्रतिमास ७ ते ८ सहस्र टन गव्हाचे पीठ निर्यात केले जात होते; परंतु गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातल्यापासून हे प्रमाण १ लाख टनांवर गेले. ही परिस्थिती पाहून केंद्र सरकारने गव्हाच्या पिठावरही निर्यातीबंदी घातली.