मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रपती आणि वरिष्ठ नेते यांची भेट !

पंतप्रधानांसमवेत दीड घंटा चर्चा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देहली येथील पत्रकार परिषद

नवी देहली – महाराष्ट्र सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रथमच देहली येथे जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ९ जुलै या दिवशी ‘लोककल्याण मार्ग’ या त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. या वेळी त्यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित होते. यांच्यात दीड घंटा चर्चा झाली. नवीन शासन स्थापन झाल्यानंतर आशीर्वाद घेण्यासाठी नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याचे शिंदे यांनी सांगितले.

पंतप्रधानांना श्री विठ्ठल-रुक्मिणी यांची मूर्ती भेट देतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय संरक्षणमत्री राजनाथ सिंह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या भेटी घेतल्या. या सर्वांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी यांची मूर्ती भेट दिली. संसदेच्या परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वंदन करून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी या भेटींना प्रारंभ केला.

(सौजन्य : Zee 24 Taas) 

राज्याला चांगले दिवस आणण्याचा प्रयत्न करू ! – मुख्यमंत्री

नवी देहली – आमचे शासन लोकांच्या हिताची जपणूक करणारे आहे. राज्याचा सर्वांगीण विकास करणारे आणि शेतकरी अन् कामगार यांना न्याय देणारे हे सरकार आहे. राज्याला चांगले दिवस आणण्याचा आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू. ज्या राज्याला केंद्रशासनाचा पाठिंबा मिळतो, ते राज्य वेगाने प्रगतीकडे जाते. त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही केंद्रीय नेत्यांच्या सदिच्छा भेटी घेतल्या, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ९ जुलै या दिवशी नवी देहली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित होते.

या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘महाराष्ट्रात घडलेल्या राजकीय घडामोडींची नोंद देशातच नव्हे, तर जगात झाली आहे. त्यामुळे चांगले काम करण्याचे आमचे दायित्व वाढले आहे. यापूर्वी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजप युती म्हणून आम्ही एकत्र लढलो होतो. त्यामुळे हे लोकांच्या मनातील सरकार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत इतर मागासवर्गीय समाजाला आरक्षण मिळावे, ही आमची भूमिका आहे. याविषयी भारताचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांची भेट घेऊन आम्ही त्यांच्याशी चर्चा केली.’’

शासन यशस्वी करणे, ही आमची प्राथमिकता असेल ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

पक्षनेतृत्वाच्या आदेशानंतर उपमुख्यमंत्री पद स्वीकारल्याविषयी पत्रकारांनी विचारणा केली असता त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘माझ्या पक्षानेच मला मुख्यमंत्रीपदापर्यंत पोचवले आहे. पक्षानेच मला मोठे केले आहे. त्यामुळे पक्षाच्या आवश्यकतेनुसार मला उपमुख्यमंत्री पद दिले गेले आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री म्हणून आमचे नेता आहेत. हे सरकार यशस्वी करणे, ही आमची प्राथमिकता असेल.’’