स्थानिक हिंदूंना नोकरीमध्ये ५० टक्के आरक्षण दिले नाही, तर आस्थापन बंद करू !

मानेसर (हरियाणा) येथील ‘हमदर्द’ आस्थापनाला महापंचायतीची चेतावणी

मानेसर (हरियाणा) – येथील ‘हमदर्द’ या औषधनिर्मिती करणार्‍या आस्थापनात स्थानिक हिंदूंना ५० टक्के आरक्षण देण्याची मागणी येथे झालेल्या महापंचायतीत करण्यात आली. ‘जर ही मागणी मान्य करण्यात आली नाही, तर आस्थापन बंद करण्यात येईल’, अशी चेतावणीही महापंचायतीकडून देण्यात आली. या महापंचायतीत ‘हमदर्द’ आस्थापन हिंदूंसमवेत भेदभाव करते’, असा आरोप करण्यात आला. महापंचायतीनंतर ग्रामस्थ आणि काही हिंदु संघटना यांनी स्थानिक प्रशासनाला या मागणीचे निवेदन दिले.

‘हमदर्द’ आस्थापनाचे अधिकारी शैलेश तिवारी यांनी ग्रामस्थांचा आरोप फेटाळून लावत ‘हा प्रसिद्धीसाठी केलेला प्रयत्न आहे’, असा प्रत्यारोप केला. यापूर्वी राज्य सरकारने आस्थापनांमध्ये राज्यातील नागरिकांना ७५ टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली होती.

मानेसरचे माजी सरपंच राम अवतार यांनी सांगितले की, हमदर्द आस्थापनाचा कारखाना स्थानिक शेतकर्‍यांच्या भूमीवर बांधला आहे. या आस्थापनाला न्यासाच्या नावावर अनेक प्रकारची सूट मिळते. असे असतांना या आस्थापनाने स्थानिक हिंदूंना आजपर्यंत नोकरी दिली नाही. ‘या आस्थापनाने आतापर्यंत किती स्थानिक हिंदूंना नोकरी दिली आहे ?’ याची प्रशासनाने चौकशी करावी.