माझे पूर्वज हिंदू होते; मात्र हिंदूंच्या छोट्या समुहाच्या अत्याचारांमुळे त्यांनी इस्लाम स्वीकारला ! – आसामचे खासदार बदरुद्दीन अजमल

आसामचे खासदार बदरुद्दीन अजमल

धुबरी (आसाम) – माझे पूर्वज हिंदू होते. हिंदूंच्या एका छोट्या समुहाकडून झालेल्या अत्याचारांमुळे आमच्या पूर्वजांना इस्लाम स्वीकारावा लागला. त्यासाठी कुणी         आमच्यावर दबाव आणला नाही, अशी स्पष्टोक्ती ‘ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट’ या पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार बदरुद्दीन अजमल यांनी केली. दोन दिवसांपूर्वी अजमल यांनी बकरी ईदच्या दिवशी गोहत्या न करण्याचे आवाहन मुसलमानांना केले होते.

१. अजमल पुढे म्हणाले की, भाजप आणि रा.स्व. संघ यांचा हिंदु राष्ट्राचा अजेंडा (कार्यसूची) केवळ राजकीय नाटक आहे. त्याद्वारे त्यांना हिंदूंची ५ टक्के मते मिळवायची आहेत. हिंदु राष्ट्र हे एक स्वप्नच रहाणार आहे.

२. नूपुर शर्मा प्रकरणी अजमल म्हणाले की, नूपुर शर्मा यांच्या विरोधात काही कट्टरतावादी मुसलमान दायित्वशून्य भूमिका घेत आहेत. शिरच्छेद करण्याच्या धमक्या देणे मूर्खपणाचे आहे. अशा धमक्या देणे इस्लामच्या विरोधात आहे. महंमद पैगंबर यांना दगड मारण्यात आले होते. जर त्या वेळी अल्लाने त्या दगड मारणार्‍यांना ठार केले असते, तर आज इस्लाम इतका वाढला असता का ? आज जगात २०० कोटी मुसलमान आहेत. आमचे पूर्वज हिंदू होते. त्यांनी इस्लाममधील चांगल्या गोष्टींमुळे धर्मांतर केले.